नाशिकमध्ये ऐन निवडणुकांच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्यासह माजी नगरसेवक आशा तडवी यांनीही राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंगळवारी (ता.23) भेट घेतली आहे. या भेटीमागं माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिलेल्या क्रीडा खात्यासाठी पाटील हे आग्रही असल्याचं बोललं जातंय. पुन्हा मंत्रिपद मिळावं,यासाठीच ही भेट असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या ते क्रीडा मंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.
अर्जुन खोतकर यांनी एका 'सीसीआय' केंद्रावरील कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांच्या अडचणींवरून सुनावले. रात्री शेतकऱ्यांना इंग्रजीमध्ये आलेल्या मेसेजमुळे, पिक खरेदी रद्द झाल्याचे त्यांना समजले नाही. त्यामुळे, शेतमाल वाहतुकीसाठी आणलेल्या ट्रॅक्टरचे भाडे त्यांना विनाकारण भरावे लागले, यावर खोतकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले. वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर हत्या, खंडणी, अपहरण या गुन्ह्यासोबत मकोका कायद्यांतर्गत हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या वेळी न्यायाधीशांनी सर्व आरोपींना गुन्हे आणि आरोप वाचून दाखवले. त्या वेळी कराडसह सर्व आरोपींना हे गुन्हे मान्य नाहीत अशी विचारणाही न्यायाधीशांनी केली.
बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी दुतावासासमोर हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी काही हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
पुण्यात आघाडी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मला फोन आला होता, असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. पण आमची महाविकास आघाडीला पसंती राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
नगरपालिका निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला यश न आल्याने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षनेतृत्वाला जबाबदार धरताना गटबाजीला प्रोत्साहन मिळावं, असं आमच्या पक्षाचं धोरण दिसतंय. आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली, असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी राज्यात दौरा काढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही नेत्यांना भेटणार असल्याचे सांगून तो विषय आता संपला, असे जाहीर केले आहे. मात्र भाजपचे आशिष देशमुख यांनी मुनगंटीवार यांची वाटचाल एकनाथ खडसे यांच्या मार्गावर चालले आहेत का, अशी वक्तव्ये त्यांच्याकडून होत आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवावा, असा सल्लाही देशमुखांनी मुनगंटीवार यांना दिला आहे.
महायुतीत आम्हाला छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सन्मानजनक जागा दिल्या नाही तर आम्ही कोणासोबतही युती करू शकतो. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांशी आम्ही बोलणी करू शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका व रणनीतीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता 40 स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनीक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनिल केदार, आमदार अमित देशमुख, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार भाई जगताप यांचा यादीत समावेश आहे.
अमरावती महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होत असून, एकूण 22 प्रभागातून 87 नगरसेवकांची निवड होणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुपारपर्यंत अमरावतीमध्ये 100 इच्छुकांनी उमेदवारी अर्जांची उचल केली आहे. मात्र एकाही उमेदवारांनी अर्ज पहिल्या दिवशी भरलेला नाही. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'पैलवान गडी असल्याने फार खोलात जाऊन ते अभ्यास करत नाहीत. सत्तेत असताना पराभव का झालं याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पंढरपूर, सांगोला पराभूत का झालो, यांचा विचार त्यांनी केलेला नाही,' अशा शब्दात लक्ष्मण ढोबळे यांनी मंत्री गोरे यांच्यावर निशाणा साधला.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने एकनाथ शिंदे शिवसेना-भाजप युती करू नये, अशी भूमिका माजी नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे व्यक्त केली आहे. गणेश नाईक यांनी मॅरेथॉन बैठका घेत असून, प्रत्येक माजी नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला कोकणात कमी यश मिळाले, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच बरोबर उभ्या महाराष्ट्राला कळतं आहे की, नाना तऱ्हेने उद्धव ठाकरे यांचा पक्ष तोडण्याचा, त्यांची माणसे विकत घेण्याचा, धाक दपटशाही दाखवून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न होत आहेत. असे असून सुद्धा यश कमी मिळू दे, पण यश मिळाले आहे. आमचे लोक या प्रचंड दादागिरीसमोर, धनशक्तीसमोर लढू शकले, याचा अर्थ शिवसेनाप्रमुखांची पुण्याई कोकणात आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे, असे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे यांच्या अपहरण व मारहाण प्रकरणी 7 आरोपी ताब्यात घेतले असून, जीवन घोंगरे यांच्या आरोपानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे व आमदार चिखलकर यांचा मुलगा प्रवीण चिखलीकर यांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली. जीवन घोंगरे यांचे आपण करून मारहाण करणारा आरोपींना अटक केली आहे. सात आरोपी अटक करून स्कार्पिओ जप्त केली आहे.
'मुंबई महापालिकेत आमची वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणूक लढण्याची बोलणी जवळपास झालेली आहे. समविचारी पक्षासोबत आघाडी करण्याचे आमचे धोरण आहे. मनसे हा पक्ष आमच्या विचारधारेच्या विपरीत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही प्रांतीय, भाषीय भेदाभेद करू शकत नाही,' अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली.
वर्धा इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्टोर रूमला भीषण आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोन इथल्या दुसऱ्या मजल्यावर आग पोहोचली होती. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज असून, यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. वर्धा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून, अचानक आग लागल्याने सामान्य रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे. स्टोअर रूमच्या बाजूला बालरोग विभाग आहे. पण तो संपूर्ण रिकामा करण्यात आला आहे. रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
जालना महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी रावसाहेब दानवे यांची नियुक्ती केल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचे बोललं जात आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे.
मजबुरीचं नाव जनाब उद्धव ठाकरे झाले आहे. नगरपालिका अन् नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी बाहेर निघाले नाही. त्यांच्यासोबत कोणीही आलं तरी, त्यांची परिस्थिती महाराष्ट्रात नगरपालिका अन् नगरपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा बेकार परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे. महापालिकेवर भगवा आणि कमळचा झेंडा लागणार, असा विश्वास भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा बुधवारी दुपारी १२ वाजता होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. सर्वच पक्षाच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. उमेदवारांची पडताळणी केली जात आहे. उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने याकरिता अनुभवी आणि निष्ठावंतांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आजघडीला ४५७ इच्छुकांनी उद्धव ठाकरे सेनेकडे उमेदवारी मागितली आहे. यातून निष्ठावंत कोण? हे निवडण्याचे अवघड काम समितीला करावे लागणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसचे कॅम्पेनचा नवा लुक
शहरातील विविध ठिकाणी लागले फलक
आज काँग्रेस कडून आमदार सतेज पाटील खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते नव्या कॅम्पेन चे उद्घाटन
कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं
काँग्रेसकडून निवडणुकीची नवी टॅगलाईन
मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुक महायुती म्हणून लढण्यावर वर्षा बंगल्यावरील बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. शिंदेसेना आणि भाजपचं जागावाटप आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. 29 महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राहुल कलाटेंनी शरद पवारांची साथ सोडली आहे. आज ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप आणि बापू काटे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा धक्का मानला जातोय. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया आज पुण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्या पुण्यात येऊन अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. शिवाय जर गुन्हा दाखल झाला नाही तर त्या कोर्टात धाव घेणार आहेत.
सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील अजित पवारांच्या भेटीला आले आहेत. या भेटीत ते सोलापूर महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवण्याबाबत चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील दोन महिलांना आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंडू आंदेकर यांच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर या तिघांना निवडणूक रिंगणात उतरण्यास न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर आता आंदेकर टोळीने हत्या केलेल्या आयुष कोमकर यांच्या आईने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे.
यामध्ये संजीवनी कोमकर म्हणाल्या, सर्व पक्ष नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे जर आम्हाला न्याय देता येत नसेल तर आमच्यावरती अन्याय तर करू नका. अंधेकरांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका आणि कोणत्याही पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास मी त्यांच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत इंडिया आघाडीत फूट. आम आदमी पक्षाकडून स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा विचार. या आघाडीत समाधानकारक जागा मिळत नसल्याने एकला चलो चा नारा.
आज आम आदमीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई करणार घोषणा.
इंडिया आघाडीत आम आदमी पक्षाला एक- दोन जागेवर बोळवण होत असल्याची माहिती.
कार्यकर्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ न देण्यासाठी स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. महाविकास आघाडीचा निर्णय आज होणार.
कामठी नगरपरिषद निकालाच्या विरोधात काँग्रेसने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. कामठीमधून भाजपाचे निर्वाचित नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी शेवटच्या तीन फेऱ्यात आघाडी घेतली. मात्र काँग्रेसचे पराभूत उमेदवार शकूर नागरी यांनी शेवटल्या तीन फेऱ्यांची फेरमोजणीची मागणी केली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली. या विरोधात काँग्रेस नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत असणार आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.