Maharashtra Politics Live Update : 'काही राजकारणी आहेत जे जातीपातीचे राजकारण करतात...'; नाना पाटेकरांचा गंभीर आरोप

Marathi Politics Headlines Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार असून यावेळी ते या मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवणार आहेत. यासह मंगळवार 25 नोव्हेंबर 2025 रोजीच्या राज्यासह देशभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Nana Patekar
Nana PatekarSarkarnama
Published on
Updated on

'काही राजकारणी आहेत जे जातीपातीचे राजकारण करतात...'; नाना पाटेकरांचा गंभीर आरोप 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘काही राजकारणी आहेत जे जातीपातीचे राजकारण करतात, तू हा आहे, तू तो आहे असे म्हणून भेद करतात. मी कधी जातपात मानली नाही, पण आपल्याकडे जातीचे राजकारण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हे जातीपातीचे राजकारण कोण करतोय आणि कसे करत आहे हे सर्वांना माहीत असून अशांना मतदानातून उत्तर द्यायचं. बदलाव तरुण बदलाव आणू शकतात, असा सल्लाही पाटेकरांनी दिला.

उद्धव ठाकरेंनी दिली खासदार संजय राऊतांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट

माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊतांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट दिली आहे. ते म्हणाले, मी संजय राऊतांना खूप दिवसांपासून भेटायचं होतं, आज ती भेट झाली. ते आज खूप फ्रेश दिसले. पुन्हा एकदा लवकरच संजय राऊत तलवार घेऊन मैदानात दिसतील असंही ठाकरे यांनी म्हटलं.

 '...तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही!'; CM फडणवीसांचं मोठं विधान  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील प्रचारसभेत बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं. मी मुख्यमंत्री असेपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

Beed News : अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने धडक दिलेल्या अपघाताली जखमी महिलेचा मृत्यू

Summary

उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुसुम विष्णु सुदे (वय 30) असं मृत महिलेचं नाव आहे. अजित पवार यांचा ताफा  तेलगाव–धारूर महामार्गावरून जात असताना धूनकवड फाटा येथे ही दुर्घटना घडली होती. यात सुदे पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या होत्या. यामध्ये आज उपचारादरम्यान कुसुम विष्णू सुदे यांचा मृत्यू झाला. 

Pandharpur : पंढरपूर नगरपालिकेच्या चिन्ह वाटपावरून गोंधळ, प्रशासन भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत उद्या चिन्हाचे वाटप होणार आहे. त्यापूर्वीच आज विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नगराध्यक्ष व नगरसेवकांना एकच चिन्ह देण्यात यावे या मागणीसाठी अभूतपूर्व गोंधळ घातला. प्रशासन भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप भालके गटाकडून करण्यात आला आहे. नियमाप्रमाणे या आघाडीने अर्ज भरण्यापूर्वी तीन दिवस आधी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून चिन्ह गोठवणे गरजेचे होते. त्यांनी तसे न केल्याने त्यांना अपक्ष धरले जाते असा पवित्रा  निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घेतला आहे. याबाबतचा निर्णय उद्याच चिन्ह वाटपाचे वेळी होईल असेही त्यांनी सांगितले होते. मात्र यावर समाधान न झाल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ येथे दिसून आला. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली. मात्र, या मतदार यादीत मोठा घोळ असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. दुबार मतदार हाही या याद्यांमधील महत्त्वाचा मुद्दा असून आता विरोधी पक्षांच्या आरोपानंतर दुबार मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे.

Nirmala Gavit :  निर्मला गावित यांना उडवलेल्या कारचा थरारक व्हिडिओ आला समोर

माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात झाला असून घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. पाठीमागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावित यांना उडविले. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात गावित यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल सोमवारी झालेल्या अपघातातील या घटनेचा थरारक व्हिडिओ आज समोर आला.

उडत असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात निवडणुकांवर टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे.  ओबीसी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणूक घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल ही विनंती न्यायालय मान्य करेल, अशी अपेक्षा आहे. निवडणुका सुरू झालेल्या आहेत, सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या 2 तारखेला मतदान होणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल ही विनंती सर्वोच्च न्यायालय मान्य करेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

तिजोरीच्या चाव्या कुणाकडे याला महत्व नाही, त्या कुणाकडे... ; विखे पाटलांचा अजित पवारांसह रुपाली चाकणारांना टोला

पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्याच्या तिजोरीच्या चाव्यांचा मुद्दा पुढे केला जात आहे आहे.. याच विषयावरून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, गैरसमज दूर करावा लागेल असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रुपाली चाकणार यांना टोला लगावला आहे.. चाव्या कुणाकडे आहेत याला महत्व नाही तर चाव्या कुणाकडे द्यायच्या हे मुख्यमंत्री ठरवतात असं विखे पाटील म्हणाले...

दोनच दिवसात भाजपच्या महिला शहराध्यक्षा शिवसेनेतून पुन्हा भाजपात….

गेल्याच आठवड्यात भाजपला धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजपच्या महिला शहर अध्यक्ष दमयंती पवार यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. काही गोष्टींबद्दल वाईट वाटल्याने तडकाफडकी निर्णय घेतला होता, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तर भाजपची हीच खरी संस्कृती असून आपल्या लोकांना सामावून घेण्याची संस्कृती इतर कुठेही नाही, असे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. मात्र दोनच दिवसात त्यांची घरवापसी झालीय.

'धमकी देऊन कोणीही विकासाचे राजकारण करू नये', बावनकुळे यांचा मकरंद पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून वाई नगरपालिका निवडणुकीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार सभेसाठी हजेरी लावली. यावेळी बावनकुळे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे. धमकीला आम्ही कधीही घाबरत नाही, आपले सरकार हे सौजन्याने वागणारे सरकार आहे. सरकार धमक्या देणाऱ्यांना घाबरत नाही. आता काळ बदललेला आहे, असं काही जाणवल्यास एक मेसेज मला आणि शिवेंद्रराजे भोसले यांना करा. मी नागपुरात जरी असलो तरी आपलं सरकार आहे धमकी देऊन कोणीही राजकारण करू नये, अशी टीका मंत्री मकरंद पाटील यांचे नाव घेता त्यांनी केली आहे.

निवडणुका आल्या की जाती जाती मध्ये भांडण लावने, आरोप करणं आणि रडणं हाच भांबळेचा धंदा; पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची टीका

परभणी जिल्ह्यात सात नगरपालिकाच्या निवडणुका होत आहेत. परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांनी यावेळेस जनताच भाजपला कौल देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच जिंतूरमध्ये विकासाला लोक प्राधान्य देखील आणखी काम विजय होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महत्वाचा म्हणजे राष्ट्रवादी आमदार विजय भांबळे यांचा चांगला समाचार त्यांनी घेतला आहे. निवडणुका आल्या की यांना जाती जाती मध्ये भांडण लावणे हाच धंदा आहे त्यामुळे त्यांच्याकडे लोक लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तुम्ही फक्त सत्ता द्या, मी भरघोस निधी देतो... : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला : स्थानिक नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली असून आज त्यांनी अकोल्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी, आजचा दिवस वेगळ्या अर्थाने महत्वाचा असून अयोध्येत मंदिर झाल्यानंतर आज कळस आणि धर्मध्वजाचं अनावरण झाले आहे. मंदिराचं काम पूर्ण झालं तेंव्हाच समजलं जातं जेंव्हा कळसाचं काम पूर्ण होतं. अयोध्येच्या मंदिरावर जसा भगवा फडकला तसाच भगवा हिवरखेड, तेल्हारा आणि अकोट नगरपालिकेवर भगवा फडकवा, असेही ते म्हणाले. तर काही जण सांगायचे लाडकी बहीण योजना बंद होणार. पण त्यांना एकच सांगतो जोपर्यत तुमचा 'देवा भाऊ' आहे, तोपर्यत 'लाडकी बहीण योजना' बंद होऊ देणार नाही. शेतकऱ्यांनाही मोफत विज देणार.

साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र, निष्ठावंत कार्यकर्त्यांची तारांबळ; फोटो वापरणाऱ्या उमेदवारांना मंत्री शिवेंद्रराजेंचा थेट इशारा

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट निर्माण झाला असून खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन झाले आहे. दोघांनीही भाजपच्या चिन्हावर आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे दोन्ही राजेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची तारांबळ झाली आहे. अनेक प्रभागात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने दोन्ही महाराजांची चिंता वाढली आहे. सध्या 75 अपक्ष उमेदवारांना शांत करण्यात दोन्ही राजेंना यश आले असले तरी 35 अपक्ष उमेदवारांनी दोन्ही राजेंचा फोटो वापरत प्रचाराचा नारळ फोडला आहे. यामुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट अपक्षांना इशारा देत बॅनर वरचे फोटो काढावेत अन्यथा निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा दिला आहे. भाजपचे उमेदवार हेच दोन्ही राजेंकडून अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Aaditya Thackeray : निवडणूक आयोग म्हणजे सर्कस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यांनी कालच आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत प्रारूप मतदारयाद्यांवर हरकती घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. आयोगाने ही मुदत न वाढविल्यास भाजप आणि निवडणूक आयोगाने एकत्रितपणे ही निवडणूक फिक्स केली आहे, असे म्हणावे लागेल.

Voter List : मतदारयाद्यांवर हरकतींसाठी मुदतवाढ देण्याची मागणी

राज्य निवडणूक आयोगाकडून नुकत्याच महापालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदारयाद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यावर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. ही मुदत १५ दिवसांनी वाढवून देण्याची मागणी काँग्रेसने आयोगाकडे केली आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनीही मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

मला संधी द्या, बीडचा विकास बारामतीसारखा करतो - अजित पवार यांचे आश्वासन

माझ्या भागात काम करून दाखवलं, त्यावेळी अंबाजोगाईला येऊन सांगतोय, आपण पण असं करा. बरेच पुढारी येतात अन् सांगतात, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. त्यांची शहर मात्र एकदम घाण असतात. बारामती बघा कसं स्वच्छ आणि देखणं केलं आहे. अंबाजोगाईचाही असाच विकास करायचा आहे, असे म्हणत त्यांनी नगरपालिका निवडणुकीत बारामतीसारखा विकास करण्याचे आश्वासन दिले.

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे पोहचले संजय राऊतांच्या निवासस्थानी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली आहे. सध्या ते भांडूपमधील निवासस्थानी असून डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची भेट घेण्यासाठी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

धक्कादायक: उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचे निधन

नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक १०-अ मधील उमेदवार आणि गायकवाड चौक परिसरातील रहिवासी नितीन वाघमारे (वय अंदाजे ५०) यांचे सोमवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नितीन वाघमारे हे मनमाडमधील ज्येष्ठ आणि सक्रिय शिवसैनिक म्हणून परिचित होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या अचानक जाण्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

PM Modi News: विजय सत्याचाच होतो, असत्याचा नाही : मोदी

विजय सत्याचाच होतो, असत्याचा होत नाही. राम मंदिरासांठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

50 टक्के आरक्षणाबाबत आता शुक्रवारी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी 50 टक्के आरक्षणाबाबत आता पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी होणार आहे.

ठाकरे कुटुंबिय आज संजय राऊतांची भेट घेणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे सहकुटुंब पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना भेटायला त्यांच्या भांडुप येथील घरी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जाणार आहे.

Narendra Modi Live: नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण

अयोध्येत आज राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राम मंदिराच्या शिखरावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिखरावर फडकविण्यात आले. हा भगवा ध्वज तब्बल ११ फूट रूंद आणि २२ फूट लांबीचा आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Shiv Sena Vs NCP : धनंजय मुंडे यांच्या पुतळ्याचं राहुरी इथं शिवसेनेकडून दहन

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या पुतळ्याचं राहुरी इथं दहन करण्यात आलं. राहुरी तालुक्यातील टाकळीमियां इथं हे आंदोलन करण्यात आलं. परळी इथं वाल्मिक कराडबाबत केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. 10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे, आज इथं एक माणूस नाही, असे धनंजय मुंडे यांनी विधान केलं होतं. शिंदे शिवसेना पक्षाच्या शेतकरी आघाडीचे रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.

Gold Rate : सोन्या अन् चांदीच्या दरात मोठी वाढ

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात 2 हजार, तर चांदीच्या भावात 4 हजार 500 रुपयांची झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 28 हजार 750 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे, तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 228 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

Nagpur News : काँग्रेस सोडून भाजपच्या उमेदवाराचं काम करत असल्याच्या रागातून एकाला मारहाण

नागपूरमधील कळमेश्वर नगरपरिषदेत काँग्रेस उमेदवाराचे काम का करत नाही? भाजपवाल्यांना साथ का देतो? या रागातून आरिफ नावाच्या एका व्यक्तीला काँग्रेसचे नागपुरातील स्थानिक नेते आणि मावळत्या महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या पाच ते सहा सहकार्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. गंभीर जखमी झालेल्या आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरिफने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाण, असे गंभीर गुन्हे दाखल केले होते.

Nashik News : शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचं निधन

Nitin Waghmare
Nitin WaghmareSarkarnama

नाशिकच्या मनमाड शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीतून एक दुःखद घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 10 (अ) मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनमाड परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Girish Mahajan Vs Rohit Pawar : मंत्री महाजन यांच्यावर आमदार पवार यांची टीका

भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. आपल्याला आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास होता, तर गुंडगिरी करून समोरच्या उमेदवारांना पकडून आणून बळजबरीने अर्ज मागे का घ्यायला लावले? विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याची हिम्मत का दाखवली नाही? असा प्रश्न केला आहे. एवढं मोठं मंत्रिपद असूनही आपण उत्तर महाराष्ट्र, तर सोडा जळगावसाठी काय केलं, एकतरी उद्योग आणला का? जळगाव आपलं घर असताना आपलं सगळं चित्त फक्त नाशिककडंच का? असा सवाल देखील केला आहे.

Karad Politics Update : यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीला प्रशासन अन् राजकीय पदाधिकाऱ्यांची उदासीनता; सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार

यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीला प्रशासन अन् राजकीय पदाधिकारी उपस्थित नसल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. सुप्रिया सुळे या याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नव्हे देशाचे नेते होते. हिमालय अडचणीत असताना देशासाठी यशवंतराव चव्हाण हा सह्याद्री धावून गेला होता, हा इतिहास आहे. सरकार कोणाचाही असो, यशवंतराव चव्हाण यांचा मानसन्मान पाळलाच पाहिजे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.

Crime Update : कल्याणातील बारवर पोलिसांचा छापा; 15 बारबालासह एकूण 28 जणांवर गुन्हा

कल्याणच्या पश्चिम भागातील लेडीज सर्व्हिस बारवर परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष पथकाने ताल बारवर मध्यरात्री छापा घातला. बार नियमांचे उल्लघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, कारवाईत 15 बारबालासह 28 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Solapur Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात आयटी पार्कची घोषणा

देशातील तिसरे मोठे आयटी पार्क सोलापुरात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. दक्षिण सोलापुरातील होटगी गावानजीक 50 एकरावर हे आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. येत्या 18 महिन्यांमध्ये हे आयटी पार्क उभा करण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात आयटी पार्क करणार असल्याची घोषणा केली होती.

स्थानिकच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पण या निवडणुकीत काही ठिकाणी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आल्याच्या विरोधात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सगळ्याचं राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातून 2 किलोमीटर पायपीट

पालघरमधील मोखाडा तालुक्यात एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालक गावाच्या दोन किलोमीटर मागेच अर्ध्या रस्त्यात सोडून गेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिका चालकाच्या या मुजोरपणामुळे सविता बांबरे या प्रसूत महिलेला अवघ्या दोन दिवसाच्या बाळाला हातात घेऊन घनदाट जंगलातून दोन किलोमीटर पायपीट करावी लागली आहे.

पालघर जिल्ह्यातील संतापजनक घटना, प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं

पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका पाड्यावरली गर्भवती महिलेला रुग्णावाहिका चालक घनदाट जंगलात सोडून निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा दौऱ्यावर

भंडारा जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा दौऱ्यावर जाणार आहेत.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार असून यावेळी ते राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवणार आहेत. शिवाय राम दरबार गर्भगृहात दर्शन आणि पूजा देखील पंतप्रधान करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com