

वरळीत महायुतीच्या प्रचार सभेत मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय काही लोकं घेत आहेत असा आरोप त्यांनी केला.
14 -15 तारीख ही संक्रमणाची तारीख आहे, या दिवशी आपल्याला चमत्कार घडवायचा आहे.
ही निवडणूक मुंबईच चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलण्याची आहे.
मी मुंबईमध्ये आलो तेव्हा मुंबई कुठे गेली का? कुठे सरकली का हे पाहत होतो. परंतू मुंबई कुठे गेलेली नाही. मुंबई सरकतही नाही, निवडणूक आली की काही लोकांना वाटतं मुंबई उत्तरेकडे सरकते. मुंबई नाही तर तुमची बुद्धी सरकत आहे.
आमदार रईस शेख यांनी राज्यात पार्टीमध्ये सुरु असलेल्या गोंधळाबाबत अखिलेश यादव यांना पत्र पाठवले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु आझमी यांनी राज्यात पार्टीला स्वत:ची जहागीर बनवले असून महानगरपालिका निवडणुकीत मनमानी पद्धतीने उमेदवारी वाटप केली आहे. परिणामी, सपाच्या अनेक कार्यकर्त्यांना नाईलाजाने इतर पक्षाची उमेदवारी घ्यावी लागली असून पक्षात अविश्वास, संघर्ष आणि धुसफूस आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी मग्न त्यानी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज चिन्ह वाटप झालं. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला. ही निवडणूक लढवण्याची भूमिका तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. मागील जवळपास 9 वर्षामध्ये आम्ही विरोधी पक्षात होतो. भाजप सत्तेत होता. भाजप सत्तेत असताना जो काही कारभार झाला त्याची माहिती पुणेकरांना समजली पाहिजे, त्यात निष्क्रियता आली. शिथीलता आली. प्रशासकाच्या काळातील समस्यांचा लेखाजोखा लोकांसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे, असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसने छुपी युती केल्याचे समोर आले आहे. आम्ही घाबरलो म्हणून हे सांगत नाही. आता तुम्ही काँग्रेसला मतदान केलं तर शिवसेना आणि शिवसेनेला केले तर काँग्रेसला जाणार आहे. मग हे हिंदुत्वादी म्हणत होते, ते कोठे गेले. ज्या ठिकाणी काँग्रेस प्रबळ आहे, त्या ठिकाणचे सर्व फार्म शिवसेनेने माघारी घेतले आहेत, तर शिवसेना प्रबळ असलेल्या ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने माघारी घेतले आहेत, असा आरोप नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे विधान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच, बिनविरोधच्या मुद्यावर बोलताना निवडणूक घ्यायची गरजच नाही, असा टोलाही आव्हाडांनी बिनविरोधच्या मुद्यावरून युतीला लगावला.
दमात घेऊ नका, मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही आमच्याकडे आहेत आणि हलक्यातही घेऊ नका. अतिशय चांगले, मेहनतीने राबणारे कार्यकर्ते आम्ही उमेदवार म्हणून दिलेले आहेत. या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जे कोणी दमदाटी करणारे असतील, रात्री बेरात्री आपण फडणवीस यांना फोन करूया. मी पालकमंत्री आहे, मीच पुरेसा आहे. नाही भागलं तर फडणवीसांना फोन करूया. हुशारा करणाऱ्यांनी, दमबाजी करणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं, असं आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
आपल्याला टीका करायची कायच आवश्यकता नाही. आपलं सर्व काम अजितदादा करत आहेत. हे आपण बघितलं असेल. समोरच्यांनी आपल्यावर टीका केली तरी आपण टीका करायची नाही. कारण आपण एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत. एकनाथ शिंदे यांचं एक ब्रीदवाक्य आहे. समोरच्यांनी टीका केली तर आपण त्याला विकासाने उत्तर द्यायचं, असं एकनाथ शिंदे यांचे ब्रीदवाक्य आहे. पुण्यातही आपल्याला विकासकामाने उत्तर द्यायचं आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
धुळे शहरातील सर्व नामचिन गुंडांना उमेदवारी देऊन हे शहर गुंडांच्या ताब्यात देण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे. सामान्य माणसाला न्याय मिळेल, अशी परिस्थिती राहिलेली नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे.
महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत वादाची सुरुवातच महायुतीपासून सुरू झाली आहे. महायुतीतील दोन प्रमुख पक्ष भिडल्याचे दिसून येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हेच आमनेसामने आले आहेत. महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घ्यायला नको होते, असं विधान चव्हाण यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
आज इचलकरंजीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा रोड शो
तर संध्याकाळी वरळीमध्ये महायुतीचा भव्य मेळावा होणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सांगलीतून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांगलीतून भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ झाला याचा आनंद. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत.
एकाच वेळी ६५ उमेदवार बिनविरोध कसे निवडून येतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत अशी निवडणूक कधी पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत अनेक निवडणुका अनुभवल्या, पण ६५ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची घटना पहिल्यांदाच पाहतो, असे राज ठाकरे म्हणाले.
साताऱ्यात झालेल्या साहित्य संमेलनात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. लेखक विनोद कुलकर्णी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी काळी शाई फेकून हल्ला केला. या घटनेमुळे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली असून, हल्ल्यानंतर कुलकर्णी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
छगन भुजबळ यांनीनायगावचे नाव बदलून 'क्रांतीज्योती सावित्रीनगर' करावे, अशी आग्रही मागणीही राज्य सरकारकडे केली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात भुजबळांनी ही मागणी केली.
पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त फुले वाड्यातून भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. दरम्यान पुण्याचा महापौर भाजपचाच होईल असा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केलाय.
कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यावरूनच उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना तब्बल 5 ते 10 कोटी दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. दरम्यान त्यांचा हा आरोप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी फेटाळून लावला आहे. कल्याण डोंबिवलीत विरोधकच शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे आहेत असा पलटवार त्यांनी केला आहे.
भाजपने पुण्यात अनेक प्रकल्प आणले. मोदी, फडणवीस यांच्या काळात पुण्यातील अनेक प्रकल्पांना गती मिळाली. मेट्रो, रिंगरोड लवकरच पूर्ण होणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत ठाकरे बंधूंची एकत्रित मुलाखत लवकरच घेणार आहेत, याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. आता दणदणीत.. खणखणीत मुलाखत अशा आशयाचं ट्विट राऊतांनी केल आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीतून सरकारचा समाचार ते घेणार आहेत. येत्या 6 जानेवारीला ही मुलाखत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पत्नीला उमेदवारी न मिळाल्याने देशमुख नाराज होती. विक्रोळीमधून त्या लढण्यास इच्छुक होत्या. मात्र ती जागा मित्रपक्षांना गेल्याने देशमुख यांनी थेट पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
बुलढाण्यात भाजपात अंतर्गत गटातटाच्या राजकारणाचा वाद उफाळला आहे. नगरपंचायत निवडणुकीनंतर भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष उदय देशपांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांचे सत्र सुरू ठेवल आहे. जवळपास दहा ते पंधरा बड्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिला आहे.
जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक रामकिसन घ्यार याने तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यासाठी मागितली लाच मागितली.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकीत MIM ला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग 14 (अ) मधून पक्षाच्या उमेदवार परवीण कैसर खान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेस उमेदवाराला मदत करण्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रभागात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.