Maharashtra Politics Live : देवा भाऊ तुम्हाला सांगतोय ही योजना सुरूच राहील, लाडकी बहीण योजनवर फडणवीस यांची ग्वाही

Marathi Politics Headlines Updates : 'भाजपा हा बाटलेला पक्ष, त्यांना फोडाफोडी करण्याशिवाय काही येत नाही', असं वक्तव्य क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं आहे. यासह आज रविवार 30 नोव्हेंबर 2025 रोजीच्या राज्यासह देशभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषदेतील दोन प्रभागांच्या निवडणुकीला स्थगिती

पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषद मधील प्रभाग एक ब आणि वाडा नगरपंचायत मधील प्रभाग 12 च्या सार्वत्रिक निवडणुकीला स्थगिती . इतर ठिकाणी निवडणूक जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. उमेदवारी अर्जावरील त्रुटी संदर्भात करण्यात आलेल्या अपिलामुळे दोन प्रभागांची निवडणूक स्थगित. स्थगित झालेल्या दोन प्रभागांच्या दोन जागांसाठी 20 डिसेंबर ला मतदान तर 21 डिसेंबर ला मतमोजणी

शिवसेनेवर वार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला आ

मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जोरदार भाषण करत शिवसेनेला नडणाऱ्यांना थेट इशारा दिला. त्यांनी यावेळी शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर एक नाही दोन वार केले. मात्र, पक्षावर वार होऊ दिला नाही. आता कोणी वार करण्याचा प्रयत्न केला तरी सोडणार नाही असा इशाराच दिला आहे

देवा भाऊ तुम्हाला सांगतोय ही योजना सुरूच राहील, लाडकी बहीण योजनवर फडणवीस यांची ग्वाही

आम्ही लाडकी बहीण योजना आणली. काही लोकांनी बंद केलं पण लाडक्या बहिणींना सांगतो मला एक वर्ष झालं योजना सुरू आहे. देवा भाऊ तुम्हाला सांगतोय ही योजना सुरूच राहील बंद होणार नाही. त्यांना लागते ती दीदी करा. अनेक लाडक्या बहिणींना लखपती केले आहे. 1 कोटी बहिणी लखपती बनवणार आहोत.

धनंजय मुंडेंच्या वतीने सायबर पोलिसात तात्काळ तक्रार दाखल

नगरपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत "धनंजय मुंडे समर्थक" या नावाने फेसबुकवर खोटे फेक अकाउंट काढून त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्याची धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून तात्काळ दखल घेण्यात आली असून सदर फेक अकाउंट विरोधात धनंजय मुंडे यांच्या वतीने अक्षय तिडके यांच्यामार्फत बीड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Mumbai News : एकनाथ शिंदेंचे मुंबई पालिकेत पालकमंत्री कार्यालय; ठाकरे सेना म्हणतेय ‘लूट पक्की आहे’

मुंबई महापालिकेत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालकमंत्री कार्यालय असणार आहे. मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयाची जागा शिंदे यांना देण्यात आलेली आहे. पुढच्या आठवड्यापासून मुंबई पालिकेत शिंदेंचे कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, शिंदेंच्या कार्यालयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून टीका करत शिंदे हे आता पालिकेत घुसखोरी करत आहेत, असा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. मंत्रालय ओस पडत चाललं आहे आणि पालिकेत जबरदस्तीने घुसत आहेत. मंत्र्यांनी आपला कारभार मंत्रालयातून करायचा असतो, ते आता महापालिकेतून करत आहेत. म्हणजे मुंबई महापालिकेची लूट पक्की आहे, असाही आरोप पेडणेकर यांनी केला.

Nagar Parishad Election 2025 : आमची निवडणूक दोन डिसेंबरलाच झाली पाहिजे; यवतमाळमध्ये सर्वपक्षीय उमेदवार आक्रमक

निवडणुका पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे काही ठिकाणी आता वादाला तोंड फुटलं आहे. यवतमाळ नगरपरिषदेची निवडणूक ही दोन डिसेंबरलाच झाली पाहिजे, या मागणीसाठी विविध पक्षांचे उमेदवार हे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. त्यांनी निवडणूक दोन डिसेंबरलाच घेण्याची मागणी केली. याशिवाय बदलापूरमध्येही उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

Balasaheb Thorat : निवडणूक आयोगाचं वागणं हे काळजी करण्यासारखं : बाळासाहेब थोरात

निवडणूक आयोगाचं वागणं हे काळजी करण्यासारखं आहे. तुम्ही अचानक निवडणुका रद्द करणार किंवा अचानक निवडणुका पुढे ढकलणार या सर्वांचा परिणाम जनतेवर काय होतो. उमेदवारांवर काय परिणाम होणार आहे. उमेदवार आतापर्यंत प्रचार करत आले आहेत. त्यांना पुन्हा वीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे. त्याचे परिणाम काय होणार, याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

Neelesh Rane : मला कोणतीही ऑफर आली तरी मी एकनाथ शिंदेंसोबतच राहणार : नीलेश राणे

Summary

तू जिथं आहे, तिथं शंभर टक्के राहा. तरच तू नारायण राणेंचा मुलगा म्हणून वावरू शकशील, हे लक्षात ठेव. एकनाथ शिंदे यांनी तुला संधी दिली आहे, त्यामुळे तिकडे कुठे तू तडजोड केली तर मी तर सोड देवसुद्धा तुला माफ करणार नाही, त्यामुळे त्यांना कधी सोडू नको, असे नारायण राणेंनी मला ठणकावून सांगितले. मला कोणतीही ऑफर द्या; पण हा नीलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदेंसोबतच राहणार, असे आमदार नीलेश राणे यांनी जाहीर केले.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांची नारायण राणेंशी चर्चा; भाजप-शिवसेना वादावर तोडगा निघणार

कोकणात भाजप आणि शिवसेनेत विशेषतः आमदार नीलेश राणे आणि भाजपचे मंत्री नीतेश राणे यांच्यात वाद पेटलेला असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारायण राणे यांच्या घरी भेट दिली. त्यांचे स्वागत नारायण राणेंनी केले आहे. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नीलेश राणे उपस्थित होते. या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नसला तरी भाजप आणि शिवसेनेच्या वादाबाबत भाष्य झाल्याचे सांगितले जात आहे.

Shiv Sena News : सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद

उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये मुंबादेवीत वाद झाला. तात्पुरत्या स्वरूपात शाखेसासाठी उभारण्यात आलेल्या शेडला स्थानिकांनी विरोध केला होता. त्यावरून बाचाबाची झाल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे.

Eknath Shinde News : एकनाथ शिंदे राणेंच्या घरी

मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांमुळे भाजपविरुध्दचा संघर्ष वाढला आहे. यापार्श्वभूमीवर आज प्रचारासाठी कोकणात दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट खासदार नारायण राणे यांचे घर घाठलं. त्यांच्यासोबत उदय समांत व निलेश राणे हेही होते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

BJP politics : राज ठाकरेंना झटका, भाजपने थेट जिल्हाध्यक्ष पळवला

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील मनसेचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी आपल्या समर्थकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्याचे स्वागत केले. त्यांच्यासह भोईर यांच्या पत्नी सरोज भोईर, मनसेचे उपशहर जिल्हाध्यक्ष श्रीकांत वारंगे, अशोक म्हात्रे, संदीप म्हात्रे, सचिन सणस, काशिनाथ भोईर, गुरुनाथ मांजरेकर आदींनी भाजपचे कमळ हाती घेतले.

Latur Congress : उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या लातूरमधील ११ जणांची काँग्रेसमधून हकालपट्टी

नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात पक्षादेश डावलून अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत असलेल्या ११ जणांची पक्षशिस्तीचे पालन न केल्याचा ठपका ठेवून पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी दिल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी सांगितले.

BJP News : मतदानाआधीच भाजपकडून १७५ नगराध्यक्ष निवडून येण्याचा दावा, पक्षाने केलेल्या सर्व्हेमधून अंदाज 

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील 2 दिवसांत मतदान होऊन 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत भाजपने आपली मोठी टीम प्रचारासाठी मैदानात उतरवली असून अंतर्गत सर्व्हे देखील करण्यात आला आहे. भाजपच्या या सर्वेनुसार राज्यात भाजपचे 175 नगराध्यक्ष विजयी होतील. तर, महायुतीमध्ये आणि निवडणूक निकालांमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचं पाहायला मिळेल, असा सर्व्हेचा अंदाज आहे

Local Body Election : राज्यातील 20 जिल्ह्याच्या काही नगरपालिकांच्या प्रभागातील निवडणुका लांबणीवर

राज्यातील साधारण 20 जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुण, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. काही नगरपालिकांतील विविध प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका आणि नगरसेवकपदाची निवडणूक लांबणीवर पडली असून आता 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

दिल्लीत हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय खासदारांची बैठकी पार पडते. या बैठकीला अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावणे अपेक्षित होते. परंतु, या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीतील या बैठकीला दांडी मारली आहे. एरवी सर्वपक्षीय बैठकीला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हजर राहतात. मात्र, आज राष्ट्रवादीचा एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहिलेला नाही. तर दुसरीकडे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते श्रीकांत शिंदे सर्वपक्षीय बैठकीला हजर राहतात. मात्र, आज या बैठकीला यांच्याऐवजी नरेश म्हस्के हजर राहिले.

Ajit Pawar : माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांचे तिजोरीच्या चाव्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण

ठिक आहे मी परवा कुठं तरी बोललो की,  तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. मी ओघात बोललो. पण लगेच मीडियावाले.. माझ्या पेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे आहे हे मी मान्य करतो. पण माझ्याकडे जे अधिकार आहेत, त्याने तर मी प्रयत्न करणार, असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या विधानावर सारवासारव केल्याचे दिसून आले. 

Devendra Fadnavis  जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट आणि दुधनी येथील प्रचारसभेत बोलताना विरोधकांवर निशाणा साधला आणि लाडकी बहीण योजनेबाबत मोठी ग्वाही दिली. "जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Election Update 2025 : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, सर्जेराव पवारांच्या गाडीतून 2 लाख जप्त

जयसिंगपूरमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. सर्जेराव पवार यांच्या गाडीतून २ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

युगेंद्र पवार आज लग्नबंधनात अडकणार

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी आज लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, या विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे. 

Nandurbar Vote : नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषद पालिकेत टपाली मतदानाला सुरुवात....

नंदुरबार नगर परिषद कार्यालयात टपाली मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील 4 नगर परिषद क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कार्यरत असलेले एकूण 733 कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. नंदुरबार नगर परिषदेसाठी 498, शहादा नगरपरिषदेसाठी 57 तर तळोदा नगर परिषद 57 नवापूर नगर परिषद निवडणुकीसाठी 121 असे एकूण 733 मतदार आपला टपाली मतदानाचा हक्क बजावत आहेत.

Nanded Politics : नांदेडमधील मुखेड अन् धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली

नांदेडमधील मुखेड अन् धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली. 13 नगरपालिकांपैकी 2 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या. तर भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील एका-एका जागेवरील नगरसेवक पदाच्या निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

Ahilyanagar Update : अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या...

कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे जाणार आहे. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबर पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

ShivsenaUBT : एकनाथ शिंदेंसारखं फोनवर नकली बोलायची गरज नाही : सुषमा अंधारे

एकनाथ शिंदे भर सभेतून मंत्र्यांना लावत असलेल्या फोनवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. 'आम्हाला एकनाथ शिंदे अन् उदय सामंत यांच्यासारखं फोनवर नकली बोलायची गरज नाही,' अशी टीका प्रा. सुषमा अंधारे यांनी उरण नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान केली.

Sushma andhare : 'माझा, रवींद्र चव्हाणांसह नरेंद्र मोदींचा जीव काँग्रेसने वाचवला'

माझा, रवींद्र चव्हाणांसह नरेंद्र मोदींचा जीव काँग्रेसने वाचवला. पोलिओ, देवी, गोवर, धनुरवात अशा 14 लसी काँग्रेसने तयार केल्या. पण त्यांनी जाहिरात केली नाही. इथं कोरोनाच्या लसीवरही मोदींचा हसरा फोटो लावला जातो, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी लगावला.

Nashik Update : एकाच कुटुंबातील चौघे मृतावस्थेत आढळले

नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुले माळवाडी इथं एकाच कुटुंबातील चौघे मृतावस्थेत आढळले आहे. पती-पत्नी, त्यांची मुलगी अन् मुलगा स्वतःच्या घरात मृतावस्थेत ाढळले आहेत. यात युवक याने स्वतः दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे, तर पत्नी, मुलगी, मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे.

Amravati Crime : अमरावतीतही बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी प्रकरणात एकाला अटक

दिल्लीप्रमाणेच अमरावतीतही बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी एकाला मध्यप्रदेश मधील इंदोर मधून अटक केली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अमरावती जवळच्या रहाटगावातील रहिवाशी आहे. पोलिसांनी अटक केलेला आरोपी गांजा आणि दारूच्या नशेमध्ये, अशाच प्रकारे पोलिसांना फोन करत असल्याची सूत्रांची माहिती दिली.

BJP Vs MNS : मनसेचे प्रकाश भोईर अन् त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांचा भाजपमध्ये प्रवेश

केडीएमसी निवडणुका जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आज मनसेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन , भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

माझं राजकारणच नव्हे तर काहीजण मला संपवायच्या मागे लागलेत - धनंजय मुंडे

नगरपरिषद निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता फक्त माझं राजकारणच नाही तर काहीजण मलाच संपायच्या मागे लागले आहेत. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही माझ्यासोबत राहणार की माझी साथ सोडणार? असा सवाल करत ज्या लोकांनी परळीला बदनाम केले त्या लोकांना उत्तर देण्यासाठीची ही निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील मतदारांना केलं आहे.

विधानसभेला राम सातपुतेंचं काम करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट

'विधानसभेला राम सातपुतेंनी त्यांना आतून मदत करण्यासाठी 35 कोटींची ऑफर मला दिली. ते मला देवेंद्र फडणवीसांकडे देखी घेऊन गेले होते. मात्र मी एकदा दिलेला शब्द बदलत नाही, असं सांगून माघारी आलो. तर निवडणुकीच्या आधी चार दिवस ही ऑफर तब्बल 50 कोटींपर्यत गेली होती.' असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे. ते अकलूज येथील प्रचाराच्या सांगता सभेत बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज चंदगडमध्ये जाहीर सभा

चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज चंदगडमध्ये जाहीर सभा होणार आहे. ही सभा दुपारी चंदगडच्या हिंडाल्को मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने चंदगड पॅटर्न राज्यात चर्चेचा ठरला होता. चंदगडच्या निवडणुकीत आमदार शिवाजी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीकडून भाजपचे सुनील कानेकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. तर चंदगडमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आहेत.

Mahebub Shaikh : अजितदादांचा पक्ष म्हणजे गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा - महबूब शेख

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महबूब शेख यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला, अजित पवार आपण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालत असल्याचे सांगतात. मात्र त्यांची अवस्था गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा या चित्रपटाप्रमाणे झाली आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. ते अकलूज नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

Manikrao Kokate : 'भाजपा हा बाटलेला पक्ष, त्यांना फोडाफोडी करण्याशिवाय काही येत नाही - माणिकराव कोकाटे

भाजपा हा बाटलेला पक्ष आहे, त्यांना फोडाफोडी करण्याशिवाय काहीच येत नाही, असं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर नगरपरिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या एका सभे दरम्यान केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com