
राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यादरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून पहिलाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून प्रचारात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. गेवराई नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शितल महेश दाभाडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीकडून याच उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या हत्तेचा कट धनंजय मुंडे यांनी रचला असा गंभीर आरोप केला होता. ज्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनीही परळी पत्रकार परिषद घेऊन याला प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आता मुंडे समर्थक आक्रमक झाले असून ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे असा आरोप करण्यात आला आहे. तसेच परळीतील मुंडे समर्थक रस्त्यावर उतरले असून त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत घोषणाबाजी केलीय.
राज्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीवर पार्थ पवार यांच्यावर मुंढवा येथील जमिनीच्या गैऱ्यव्यवहार प्रकरणावरून गंभीर आरोप होत आहेत. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. तर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याचदरम्यान शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया असून या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकतील. या प्रकरणाची फडणवीस यांनी चौकशी करायला हवी, असे म्हटलं आहे.
भाजपकडून वर्धामधील सहा नगरपालिकांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजप कार्यालयात या मुलाखती झाल्या. पालकमंत्री पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे यांनी मुलाखती घेतल्या. सहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 63 दावेदारांनी मुलाखती दिल्या. वर्धा नगरपरिषद पदाच्या नगराध्यक्षपदासाठी 6, हिंगणघाट 16, देवळी 5, पुलगाव 5, आर्वी 24 आणि सिंदी करीता 6, अशा एकूण 63 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती झाल्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या अत्यंत जवळचा सहकारी जितेंद्र चव्हाण यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. आमदार जाधव यांना ही भेट चांगलीच जिव्हारी लागली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत भास्कर जाधव यांच्याकडून जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे नेते भास्कर जाधव यांना आणखी एक धक्का बसला आहे. जितेंद्र चव्हाण हे चिपळूणचे उपतालुका प्रमुख होते.
सकल मराठा समाजाने धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला केलेल्या जोडेमार आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून सोलापुरात मुंडे समर्थकांनी आंदोलन केले. आमदार धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठानच्यावतीने आमदार मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थन दर्शवले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणारे आरोपी त्यांचेच कार्यकर्ते आहेत. आमदार धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचे काम जरांगे-पाटील करत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर, मंत्री उदय सामंत म्हणाले, "'फेक नरेटिव'ला बळी पडण्याचा हा प्रकार आहे. पत्रकारांनी देखील थोडाफार प्रत्येक विभागाचा अभ्यास केला पाहिजे. माझ्या विभागाने 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी 500 रुपये केली, हे ऐकून मलाही धक्का बसला. माझ्या सही शिवाय कसं झालं? माझ्या दुसऱ्या दिवशी लक्षात आलं तहसीलदाराने केलेलं हे काम होतं. महसूल विभागाचा हा विषय होता. उदय सामंत यांचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेतलं असेल."
'युती करून लढायचे आहे. त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केली आहे. तशी आम्ही सुद्धा केली आहे. मैत्रीपूर्ण लढत झाली तर, मैत्रीपूर्ण लढू अन्यथा स्वतंत्र लढू,' असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
अहिल्यानगरमधील राहुरी तहसील परिसरातून डंपर चोरी करणारे 03 आरोपींना 9 लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. भगवान गोवर्धन कल्हापुरे (वय- 38, रा. खडांबे खुर्द, ता.राहुरी), सोमनाथ नामदेव ठाणगे (वय- 31, रा. देहरे ता. नगर) आणि अविनाश भिकन विधाते (वय-29, रा. ताहाराबाद ता. राहुरी), असे अटक केलेल्यांची नावं आहे.
नगरपंचायत , नगरपरिषद निवडणुकांचे पडघम वाजले आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. भाजपविरुद्ध मविआ आणि अजित पवार राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे शिवसेना, अशी लढत होण्याची शक्यता आहे.
बुलढाणा शहरातील सुंदरखेड परिसरातील तार कॉलनी इथं अवैध गर्भलिंग तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पथकाने छापा घातला. या कारवाईत डॉ. कैलास गवई यांना ताब्यात घेण्यात आलं असून, तपासाची सखोल चौकशी सुरू आहे. पथकाला काही दिवसांपासून डॉ. गवई यांच्या घरातून अवैध गर्भलिंग तपासणी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने एक विशेष पथक तयार करून सापळा रचला. एका महिलेच्या माध्यमातून तपासणीचा बहाणा करून पथकाने छापा घातला. या दरम्यान घरात तपासणीसाठी लागणारी यंत्र सामग्री व काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याणचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या रविवारी (ता. 9) ls भाजपा प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील गुन्हा दाखल झालेली आरोपी शीतल तेजवानी ही फरार आहे. ती नवऱ्यासह परदेशात पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. पुणे पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.
रोहित पवार आज अकोला दौऱ्यावर येणार होते. मात्र नियोजित दौरा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रम तसेच जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, शहराध्यक्ष रफिक सिद्दिकी आणि तन्मय खरोटे यांच्यावतीने आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांना उपस्थितीत राहता येणार नाही, सांगत तसदीबद्दल क्षमस्व, असे म्हटले आहे.
बिहार विधासभा निवडणुकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाकरपूर विधानसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार सचिंद्रप्रसाद सिंह यांच्यासाठी प्रचार केला. एनडीएच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
देऊळगाव-राजा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजय खांडेभराड तसेच लोणार येथील काँग्रेसचे नेते प्रकाश धुमाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांचं स्वागत करत पुढील पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याची आज सांगता होणार आहे. त्यांतर आज सायंकाळी ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. आज सायंकाळी चार वाजता ते घनसावंगी तालुक्यातील लिंबोनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर-जालना लोकसभा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करून ते मुंबईला जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना आहे. मात्र, महायुती न झाल्यास हायब्रीड युती करून लढले जाईल, असं वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईट बंद पाडली. गेले महिनाभर संकेतस्थळ बंद असल्याने मराठा समाजाच्या युवकांची कोंडी झाली. हजारो युवक ऐन दिवाळीत नोकरी व्यवसायासाठीच्या कर्जापासून वंचित राहिले, असा आरोप केला आहे.
पुण्यातील कथित जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या प्रकरणात कठोर पावले उचलण्याचे संकेत त्यांनी दिली असून या प्रकरणात दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी, असा अर्ज केला आहे. हे झालं तरी जे गुन्हेगारी प्रकरण दाखल झाले आहे, ते संपणार नाही. त्यासंदर्भात ज्या काही अनियिमतता असतील, त्याबाबत कारवाई होईल आणि माझ्या या मताशी उपमुख्यमंत्री अजित पवारही पूर्णपणे सहमत असतील. त्यामुळे दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.