

देगलूर येथील मोंढ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश आणि जाहीर सभा होती. पण सभा सुरू असतानाच अचानक पाऊस सुरू झाला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू होती. या अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली, लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या. मात्र,यानंतर अजित पवारांनीही आपलं भाषण आटोपतं घेतलं.
महाराष्ट्र सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाटबंधारे प्रकल्पातून शेतीला पाणी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उघड्या कालव्यांमुळे पाणी गळती वाढताना दिसून येत आहे. याच धर्तीवर आता सरकारनं उघडे असणारे कालवे बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाणी गळती थांबण्यास मदत होणार आहे. यासाठी एक समितीही नियुक्त करण्यात आली आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जत येथील राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा देण्यात आला होता.अखेर कारखान्याचे गाळप हंगाम शनिवारपासून सुरू झाले आहे.
दौंड नगरपालिकेत मतदारयादीवरून राडा झाला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मतदारयादीतील नावे दुसऱ्या प्रभागात टाकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीरधवल जगदाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला.
फलटणमधील महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण उघड होऊन २४ तास झाले तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर चकार शब्दही काढला नाही. असा असंवेदनशील व अकार्यक्षम गृहमंत्री महाराष्ट्राला याआधी कधी लाभला नाही, हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न सुरु असल्याचे दिसते. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर जे आरोप होत आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. त्या महिला डॉक्टरने तक्रार करुनही त्याची दखल घेतली नाही, पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात आहे. सुसाईड नोटही गायब करतील म्हणून त्या महिला डॉक्टरने हातावर नोट लिहिली होती असेही सपकाळ म्हणाले..
भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजप शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीत जोरदार तयारी पहायला मिळत आहे. अद्याप युतीबाबत कोणतीच चर्चा मविआ किंवा महायुतीत झालेली नाही. मात्र सर्वच पक्ष स्वबळाची चाचपणी करत आहेत. अशात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने भाजपला 50-50 फॉर्म्युला लागू करण्याची मागणी केली आहे. या फॉर्म्युलानुसार, महापौरपद आणि उपमहापौरपद हे दोन्ही पक्षांमध्ये समान प्रमाणात वाटले जावे, अशी शिंदे गटाची अपेक्षा असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
परभणी येथे पत्रकार परिषद घेवून शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी, यावर्षी अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम पूर्णतः गेलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आशा आहे ती उसाकडून ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांना मराठवाड्यातील कारखानदारांनी 3300 रुपयांचा भाव द्यावा. तसेच सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली असताना सरकार अद्यापही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला तयार नाही. त्यामुळे आम्ही सर्व संघटना मिळून येथे 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य आंदोलन करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे
काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरज चव्हाण यांनी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहान केली होती. ही मारहान राष्ट्रवादीच्या बैठकीत पत्ते टाकण्यावरून झाली होती. यानंतर चव्हाण याच्यावर पक्षाने कारवाई करत त्यांचे पद काढून घेतले होते. त्यानंतर पुन्हा मोठी जबाबदारी दिली होती. यामुळे छावा संघटना आक्रमक झाली होती. आता पुन्हा एकदा छावा संघटना आक्रमक झाली असून त्या मारहाणीचा व्हिडिओ फेसबुकवर पुन्हा शेअर करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या गुंडांनी शेतकऱ्यांच्या पोरावर केलेला प्राणघात हल्ला आम्ही विसरला नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी तुमची जागा दाखवतील असे म्हणत तो शेअर केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध छावा संघटना असा वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.
फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवलं, या घटनेनं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. यानंतर ज्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा, आठ दिवसात जर गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केले नाही तर महाराष्ट्र चक्काजाम करू असा इशारा ओबीसी समाजाचे नेते बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. पीडित कुटुंबाची आज बाळासाहेब सानप यांनी भेट घेतली. यावेळी नाही मिळून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्द कुटुंबाला दिला तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करून तात्काळ आरोपींना अटक करावे अशी मागणीही केली आहे.
पुणे शहरातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण आता चांगलेच तापले असून खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव आता या प्रकरणात समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचेकडून मोहोळ यांच्यावर प्रहार केला जात आहे. अशातच मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेऊन जैन समाजाला अपेक्षित असेल तेच होईल, असे आश्वासन दिले. पण यावेळी जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आणि मोहोळ यांच्याविरोधात जैन समाजाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मोहोळ यांना काढता पाय घ्यावा लागला.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी बनकर यांना पोलिसांकडून 7 दिवसाची कोठडी मागितली होती. न्यायालयाने 4 दिवस , 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक येथे 'अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन' पार पडले, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष मोहनराज कारंजेकर बाबा यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आणि त्यांचे अभिनंदन केले.
त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द करण्यात आला.
बिवलकर प्रकरणात तथ्य असून सिडकोची तब्बल 1400 कोटींची जमीन हडप केल्याची बाब खुद्द वनविभागानेच कबूल केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी बिवलकर यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पनवेल आणि उरण पोलीस ठाण्याला वन विभागाच्यावतीने पत्र देखील देण्यात आले आहे. परंतु आद्याप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. वनविभागाच्या पत्राची बाब समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा संजय सिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे केली.
मुंडेंचा वारसदार हे धनंजय आणि पंकजा नाही, ते फक्त प्रॉप्रर्टीचे वारसदार आहेत असा टोला, सारंगी महाजन यांनी या बहीण-भावाला लगावला. दोन्ही बहीण भाऊ हे फक्त खंडणी वसली करतात. लोकांना पैशांसाठी मारणे, लोकांच्या जमनी बळकावणे असे त्यांचे उद्योग आहेत. या दोघा भावा आणि बहिणींनी फक्त जमीन हडपण्याचं कामं केलं आहे आणि त्यांनी नातेवाईकांची सुद्धा जमीन सोडली नाही. मी त्यांची मामी आहे आणि माझी जमीन सुद्धा यांनी हडपली आहे. हे दोघे फक्त स्वतःच्या स्वार्थाकरिता एकत्र आले आहेत. आपला स्वार्थ साधला की ते वेगळे वेगळे होतील, असा दावाही सारंगी महाजन यांनी केला.
जालन्यात बंजारा समाजाला एसटी वर्गातून आरक्षण मिळावं यासाठी विजय चव्हान यांचं उपोषण सुरू आहे, त्यांची भेट घेण्यासाठी जे सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता. यावेळी त्यांना भुजबळांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलं असता, त्यांनी थेट मुंडे साहेबांचे वारसदार हे संजय राठोड आणि अर्जुन खोतकर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
मी पीडित कुटुंबाची बाजू समजून घेतली. महिला डॉक्टरचा मृत्यू झाला त्यात आरोग्य विभाग आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून महिलेने तक्रार करून देखील दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं. वरिष्ठ अधिकाऱ्यांची SIT नेमून या प्रकरणाची खोलवर चौकशी झाली पाहिजे. जे कोणी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच मृत मुलीचा जो भाऊ आहे त्याला अनुकंपा तत्वावर त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घ्यावं, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. जी मदत लागेल ती मदत आम्ही त्यांना करणार आहोत, असे त्यांनी म्हटले.
शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मतदार यादीतील घोळाच्या विरोधात १ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काढलेल्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात ही भेट असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांना या भेटीमुळे नव्याने बळ मिळाले आहे. 'ही लढाई लोकशाहीची गरज आहे, निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल, तर त्यांना दणका द्यावाच लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल'.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरुन भाजप खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करणारे शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये. मी रवींद्र धंगेकर यांना काय पाठवायचा तो निरोप पाठवला आहे असे सांगीतले.,
भाजप मंत्री नीतेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी राजकीय पक्ष त्या मूडमध्ये गेले आहेत. आम्ही प्रत्येक जण स्वबळावर निवडणुका लढण्याचा तयारीला लागलेले आहोत,' असे मंत्री राणे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारचे शिष्टमंडळाने बंजारा समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली. उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्याशी शिष्टमंडळातील मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी चर्चा केली. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं बेमुदत उपोषण सुरू आहे. आंदोलनकर्ते विजय चव्हाण यांच्या मागण्या सरकारसमोर मांडणार असल्याचे आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिले. आंदोलनस्थळावरून मुख्यमंत्र्यांना देखील शिष्टमंडळाने फोन लावून दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळ इथले आमदार राजू खरे यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. विधानसभा विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण झालं. आमदार राजू खरे यांची महायुतीतल्या नेत्यांची वाढत्या जवळीकने चर्चांना उधाण आलं आहे.
राज्य सरकारचे शिष्टमंडळाने बंजारा समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली. उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्याशी शिष्टमंडळातील मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी चर्चा केली. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं बेमुदत उपोषण सुरू आहे. विजय चव्हाण यांच्या बेमुदत उपोषणाचा नववा दिवस आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप करणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेवर राज्यातील मंत्री संजय शिरसाट यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, "3-4 दिवसांपूर्वी माझ्याशी बोलणं झालं होतं. जागेच्या घोटाळ्याचे पुरावे आहे, असे सांगून सविस्तर माझ्याशी बोलणार आहेत. मोहोळ यांच्यावर आरोप आहे, याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशी करावी."
भेकराची शिकार केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबागचे तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत अडचणीत आले आहेत. भगत यांच्या वाडगाव इथल्या घरातून पोलिसांनी भेकराचे एक किलो मांस जप्त केले आहे. जयेंद्र भगत यांची वन विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने युती धर्म पाळला नसून काँग्रेसच्या उमेदवाराला छुप्या पद्धतीने पाठिंबा दिला, असा आरोप वारंवार भाजपकडून केले जात आहे. मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीरपणे याची कबुली दिली आहे.
नशेबाज रूग्णवाहीका चालकाने मोटरसायकल वरून जाणाऱ्या तिघांना चिरडले, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ही घटना घडली. जखमीला नाशिक इथल्या रूग्णालयात हलवण्यात आलं आहे.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन पंढरपूर असल्याचे समोर आलं आहे. गोपाळ बंदने पंढरपुरात आल्याची माहिती आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच बदनेचा शोध सुरू केला आहे.
सातारा फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपी पीएसआय गोपाळ बदने यांच शेवटचं मोबाईल लोकेशन पंढरपूर असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.पोलिसांना हि माहिती मिळताच बदनेचा शोध सुरू केला आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी बदनेच्या शोधासाठी एक टीम तैनात केली आहे.पण अद्याप तो पोलिसांना गुंगारा देत आहे.
मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.मुंबईमध्ये आणि ठाण्यात महायुतीचा पराभव स्पष्ट दिसत आहे, असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या विजय चव्हाण यांची राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज भेट घेणार आहे.या शिष्टमंडळात मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे. विजय चव्हाण जालन्यात उपोषणाला बसले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप अस्पष्ट. एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं चर्चांना उधान आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे समजते.
महिला डाॅक्टरच्या आत्महत्येप्रकरणी फरार आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या आत्महत्यानंतर आरोपी प्रशांत बनकर हा मित्राचा फार्म हाऊसवर लपून बसला होता. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली.
फलटण मधील महिला डाॅक्टरची आत्महत्या मनाला चटका लावणारी आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जर जबाबदारी सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या, अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
: पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी ऑफलाईन सुविधेसोबतच ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विभागातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
भिवंडी शहरातील आजमी-हाफिज नगर परिसरातील इमारत कोसळली. 40 वर्षे जुनी ही इमारत होती. तळमजल्यावर किराणा दुकान आणि वरच्या मजल्यावर रहिवाशी राहत होते. सुदैवाने ही घटना घडली त्यामध्ये कोणतीही जीवीन हानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी वरच्या मजल्यावर कोणीही नव्हते . अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी दुकानात अडकलेल्या दुकानदाराला सुरक्षितपणे बाहेर काढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.