Maharashtra Politics Update : बजरंग सोनवणे फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठी मागणी करणार

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates : कर्जमाफीवर बच्चू कडू ठाम सरकारला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम, यासह 29 ऑक्टोबर 2025 रोजीच्या राज्यसह देशभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
MP Bajrang Sonwane
MP Bajrang Sonwane Sarkarnama
Published on
Updated on

बजरंग सोनवणे फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठी मागणी करणार

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर, सोनवणे यांनी याप्रकरणी शांत बसणार नसल्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सोनवणे यांनी सांगितलं. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री पंकजा मुंडेंवरही खासदार सोनवणेंनी शाब्दिक हल्ला चढवला.

मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूरच्या दिशेने रवाना

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे नागपूर येथे सुरू असलेल्या प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला इशारा दिल्याचं म्हटलं. तसेच, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, अतिवृष्टीचे अनुदान देखील मोठ्या प्रमाणात मिळालं पाहिजे अशी मागणीही केली होती.

बीड शहरात फलटण येथील डॉक्टर महिलेला न्याय मिळावा, या मागणीसाठी अनोखे आंदोलन

बीड शहरात फलटण येथील डॉक्टर महिलेला न्याय मिळावा, या मागणीसाठी अनोखे आंदोलन करण्यात येत आहे. दूरसंचार टॉवर चढून या आंदोलकात माऊली शिरसाठ, केशवतात्या तांदळे, मोहन आघाव यांनी डॉक्टर महिलेला न्याय देण्याची मागणी केली. 

धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार

पंजाबमधील आनंदपूर साहिब येथे आम आदमी पक्षाच्या नेत्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या डोक्यात गोळी लागली आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी पीजीआय चंदीगड येथे नेण्यात आले असून नितीन नंदा असे आपच्या नेत्याचे नाव आहे. तर नंदा यांच्यावर चंदीगड पोलिसांचे माजी डीएसपी दिलशेर चंदेल यांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

महिला आयोगाने पोलिसांची वकिली केली : हर्षवर्धन सपकाळ

फलटन प्रकरणावरून राज्यात संतापाची लाड उसळली असून काँग्रेसने देखील सरकार आणि महिला आयोगावर जोरदार हल्लबोल केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट महिला आयोगाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी, महिला आयोगाने पीडित कुटुंबाला भेटून त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी होती, पण त्यांनी आधी पोलीसांची भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. महिला आयोगाने महिलांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन काम करणे गरजेचे असताना तसे न करता पोलिसांची वकिली केली. डॉ. संपदा मुंडे ज्या समाजाची आहे त्या समाजातील एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. पंकजा मुंडे गप्प आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा दबाव झुगारून बोलले पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटले आहे.

जालन्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

जालन्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अब्दुल रशीद यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. आगामी महानगरपालिका निवडणुकींपूर्वी रशीद काँग्रेसमध्ये आल्याने जालन्यामध्ये काँग्रेसची ताकद आता वाढणार आहे.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करा, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तात्काळ अटक करा: हर्षवर्धन सपकाळ

बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

पीएसआय गोपाल बदने याने लपवलेला मोबाईल अखेर पोलिसांना मिळाला..

फलटण येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. अशातच पीएसआय गोपाल बदने यांच्याबाबत महत्वाची गोष्टीचा उलगडा झाला असून पीएसआय गोपाल बदने याने लपवलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. हा मोबाईल बदनेच्या नातेवाईकांनीच फलटण शहर पोलीस ठाण्यात जमा केला आहे. यामुळे आता महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तपासाला गती येण्यास मदत मिळणार आहे.

'येथे क्लिन चीट मिळतील…', मुख्यमंत्र्यांनी बोर्ड लावावा; फलटण महिला डॉक्टर प्रकरणात अंधारेंनी फडणवीसांना डिवचले 

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील सभेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीनचीट दिली होती. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना डिवचलं आहे. त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसू नये. त्यांनी आता आपल्या कार्यालयाच्या बाहेर बोर्ड लावावा की येथे क्लीन चीट मिळेल. निबाळकर म्हणतात आमच्या गावात 34 रणजित निंबाळकर आहेत, तर आता फडणवीस यांनी ते इतर 33 कोण आहेत याचा शोध घ्यावा.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आसाराम बापूला सहा महिन्यांचा जामीन मंजूर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आसाराम बापूला सहा महिन्यांचा जामीन मंजूर झाला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा आणि न्यायमूर्ती संगीता शर्मा यांच्या खंडपीठाने मंगळवारी (ता.29) आसारामच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर हा निर्णय दिला.

Bacchu Kadu Protest News : हायकोर्टाची मुदत संपली

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनाचे ठिकाण रिकामे करण्याचे आदेश दिले होते.हायकोर्टाच्या आदेशानंतरही बच्चू कडू यांनी आंदोलनाचे ठिकाण सोडलेले नाही. हजारो आंदोलन अजूनही महामार्गावरच आहेत. कडू यांची समजूत काढण्यासाठी त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल जाले आहेत. मात्र, आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

Bacchu Kadu update : आंदोलनावर ठाम

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांना आंदोलनाचे ठिकाण रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर कडू म्हणाले, आम्ही न्यायालयाचा आदर करतो, त्यांच्या आदेशाचा अनादर करणार नाही. न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती. प्रशासनात धमक असेल तर आम्हाला अटक करून जेलमध्ये टाका, असे सांगून कडू यांनी एकप्रकारे आंदोलनावर ठाम असल्याचे संकेत दिले.

Bacchu Kadu Protest : लवकरच बैठक सुरू होणार

बच्चू कडू यांच्या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल नागपुरात दाखल झाले आहेत. दुसरीकडे हायकोर्टाने आंदोलनाची जागा सोडण्यासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे कडू आणि जयस्वाल यांच्यातील चर्चेनंतर मार्ग न निघाल्यास कडू महामार्गावरील आंदोलनाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bacchu Kadu Protest : बच्चू कडूंना कोर्टाचे आदेश

नागपूर सुरू असलेले माजी आमदार बच्चू कडू यांचे आंदोलन हायकोर्टाच्या कचाट्यात सापडले आहे. या आंदोलनाची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दखल घेतली आहे. कोर्टाने आज सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी आंदोलनाचे ठिकाणी रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आंदोलनामुळे नागपूरसह शहरालगतच्या अनेक मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Sushma Andhare : फलटण प्रकरणात ट्विस्ट

फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महिला डॉक्टरची आत्महत्या की हत्या, असा सवाल करत तळहातावरील हस्ताक्षराबाबत मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. महिला डॉक्टरच्या तळहातावर लिहिलेला निरीक्षक हा शब्द आणि पत्रातील शब्दामध्ये तफावत असल्याचे अंधारे दाखविले.

Ravindra Dhangekar : आमदार हेमंत रासने आता धंगेकरांच्या निशाण्यावर..

लोकमान्य नगरमधील रहिवाशांनी घराचे स्वप्न पाहिले होते आणि एकत्र येऊन त्यांनी बांधकाम सुरू केले होते. म्हाडाने काही नियम शिथिल केल्याने हा प्रकल्प मार्गी लागत होता. मात्र, आमदार हेमंत रासने यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन या प्रकल्पाला स्थगिती मिळवली, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. रहिवाशांच्या भावना विचारात घेतल्या नाहीत, तसेच त्यांच्याशी चर्चाही केली नाही. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून, रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच, उपमुख्यमंत्र्यांकडेही हा विषय मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही धंगेकरांनी दिला आहे.

BJP News : महिला कार्यकर्तीने केली गंभीर तक्रार भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यावर  गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवडमधील भाजपच्याच एका महिला पदाधिकाऱ्याने आपल्याच संघटनेच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह आठ जणांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाच्या चिटणीस तेजस्विनी कदम यांनी मोरेंवर गंभीर आरोप केले आहेत. मला जीवे मारण्यासाठी मोरेंनी पुरुष आणि महिला समर्थकांना पाठवले होते. तसेच चौकीत पोलिसांदेखत मला मारहाण केली, असा आरोप तेजस्विनी यांनी केलाय.

तुम्ही जर असे करत असाल तर आम्ही सर्व रामगिरीवर मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी आंदोलना दरम्यान दिला.' पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, यापुढे कार्यकर्त्यांना हात लावल्यास शांत बसणार नाही, असा इशारा दिला. आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी झाल्यास किंवा कार्यकर्त्यांवर कारवाई झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत, पण प्रशासनाने मर्यादा ओलांडू नये. मंत्र्यांच्या उत्तरासाठी ४ वाजेपर्यंत वाट पाहणार असल्याचेही बच्चूकडू यांनी स्पष्ट केले.

Bacchu Kadu : बच्चू कडूसमोर सरकार नरमले, मंत्री आशिष जयस्वाल चर्चेसाठी निघाले..

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूरात सुरू असलेल आंदोनल चांगलेच चिघळले आहे. आंदोलकांनी रेल रोको केल्यानंतर सरकारने बच्चू कडू यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली आहे. मंत्री आशिष जयस्वाल हे सरकारच्यावतीने चर्चेसाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आंदोलकांना रेल रोके न करण्याचे आवाहन केले आहे.

Ajit Pawar : मतदारसंघात फिरा, पक्षाची ताकद दाखवा आणि जनतेशी संपर्क साधा! अजित पवारांच्या आमदारांना सूचना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आमदारांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. अजित पवार यांनी आमदारांना विनाकारण मुंबईत न थांबता आपापल्या मतदारसंघात परत जाऊन पक्षाची कामे सक्रियपणे करण्याची सूचना केली. “मतदारसंघात फिरा, पक्षाची ताकद दाखवा आणि जनतेशी संपर्क साधा,” असे ते म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात 27 ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप फोडले होते. यानंतर चोरट्यांनी घरातून सहा ते सात तोळे सोने आणि 35 हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, एकनाथ खडसे यांनी नंतर आणखी बारकाईने पाहिले असता त्यांच्या घरातून सीडी, पेनड्राईव्ह आणि कागदपत्रंही गायब असल्याचे लक्षात आले. या सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये नक्की काय होते, याची चर्चा आता रंगली आहे. 

Phaltan Case : मृत डाॅक्टर तरुणीचे हाॅटेलच्या रुममध्ये प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

हॉटेल मालकाने स्वत: आज सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मयत डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आपलं नाव लिहिताना दिसत आहे. नाव लिहिल्यानंतर तरुणी हॉटेलमधील रुमची चावी घेऊन जाते. याठिकाणी दरवाजा उघडताना डॉक्टर तरुणीला काहीतरी प्रॉब्लेम येतो. खोलीचा दरवाजा उघडण्याचा दोन-तीनवेळा प्रयत्न केल्यानंतर अखेर दरवाजा उघडतो आणि तरुणी खोलीत प्रवेश करते. यानंतरच डॉक्टर तरुणी हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या करते.

Bacchu Kadu : बच्चू कडूंचं आंदोलन पेटलं, आंदोलक थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले; पाहा... नेमकं काय घडलं

बच्चू कडू यांनी रेल्वेरोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आंदोलक आता रेल्वे रुळावर उतरले आहेत. नेमकं काय घडलं पाहा...

बच्चू कडू म्हणाले चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही,पण काय आहेत त्यांच्या 8 प्रमुख मागण्या?

MP Bajrang Sonwane
Bachchu Kadu Protest : बच्चू कडूंचा कोणत्या मागण्यांसाठी महाएल्गार?

बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जालना मंठा रोडवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको....

बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जालना मंठा रोडवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको करण्यात आला आहे. बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले असून नागपूर येथे आंदोलन करत आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून आलेले शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन छेडले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीडच्या कवडगाव येथे जाऊन फलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते

आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक उद्या होत आहे. 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे इत्यादी प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आपण काय मोगलाईमध्ये आहोत का? बावनकुळेंचा सवाल

बच्चू कडू यांनी चर्चेसाठी मुंबईत यावं, असे बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले. चर्चेसाठी सर्व दारे उघडी आहेत, असे ते म्हणाले. त्यांना चर्चेला बोलावून अटक करणारे आम्ही काय मोगलाईमध्ये आहोत का? असे बावनकुळे यांनी सांगितले.

आम्ही चार-पाच शेतकरी मुंबईला येण्याऐवजी तुम्हीच येथे या!

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांनी भाजप नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला, "आम्हा रेल्वे रोको करु की नाही, तुम्हीच सांगा," असे कडू यांनी त्यांना फोनवरुन विचारले. आम्ही चार-पाच शेतकरी मुंबईला येण्याऐवजी तुम्हीच येथे या," असे त्यांनी सांगितले.

Nagpur News: बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपुरातील रस्ते बंद

नागपुरात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या आंदोलनामुळे नागपुरातील काही रस्ते बंद करण्यात आले आहे. उत्तर-दक्षिण राष्ट्रीय महामार्ग नागपूर हैदराबाद महामार्ग (नागपूर वर्धा, नागपूर चंद्रपूर आणि नागपूर तुळजापूर महामार्ग देखील म्हणतात), पूर्व पश्चिम जोडणारा नागपूरचा बाह्य वळण मार्गावरील (outer ring road वरील-fly ओव्हर दिसतोय तो) जबलपूर अमरावती जाणारा उड्डाणपूल बंद आहे. या दोन्ही वर ट्रक आणि इतर वाहनांच्या रांगा दिसत आहेत.

बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं या मागणीसाठी शेतकरी नेते माजी मंत्री बच्चू कडूंनी त्यांच्या हजारो समर्थक आणि शेतकऱ्यांसह नागपुरात आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी हैदराबाद-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून बंद पडला आहे. तर त्यांचे आंदोलन सध्या नागपुरात सुरू अशल्याने नागपूरमधील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानी आंदोलक घेराव घालतील या भीतीमुळे आता रामगिरी येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

भाजप आमदार राजू बकाणे बच्चू कडूं अन् आंदोलकांच्या तावडीत सापडले, 4 तास बसवून ठेवले

देवळी पुलगावचे भाजप आमदार राजू बकाणे हे बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलकांच्या तावडीत सापडले. आंदोलन स्थळावरून गाडीतून लपून जात असताना आंदोलकांनी बघितले त्यानंतर त्यांना जवळपास 4 तास बसवून ठेवले. यावेळी त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा प्रचारात मांडला होता आता सभागृहातही मांडणार असे आश्वासन दिलं त्यानंतरच त्यांना आंदोलकांनी सोडलं.

Pune  : पुणे म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाने भाजपच्याच महिला पदाधिकार्‍याला मारहाण

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाने टोळक्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी) यांच्यासह अनिता कृष्णा तिपाले, एकविरा शरीफ खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे आणि जयेश मोरे अशा एकूण आठ जणांवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirdi Accident : साई बाबांचे दर्शन घ्यायला निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला

शिर्डीला साई बाबांचे दर्शन घ्यायला निघालेल्या भक्तांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी आहेत. नाशिकमधील येवला इथे हा भयंकर अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तात्काळ मदतकार्य केले.

Nagpur News : बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्ग आंदोलकांनी रोखून धरल्याने दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनेक किमी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.

Bacchu Kasu : शेतकऱ्यांच्या लढाईसाठी सर्वांनी सहकार्य करावं - बच्चू कडू

शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या प्रमुख मागणीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धीकडे जाणारा महामार्ग बंद पाडला आहे. तर आज दुपारपर्यंत कडूंनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या लढाईसाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन बच्चू कडू यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com