Ambajogai News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबाबत गृहविभागाकडून कठोर भूमिका घेतली जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरूच असून, आता अंबाजोगाईत त्यांच्यावर आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.
जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संवाद बैठकीत खोटी माहिती प्रसारित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केल्यानंतर त्यावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात बसची जाळपोळ झाली. त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या उपोषणाची दखल घेतली नाही म्हणून जिल्ह्यात जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. या हिंसक घटनांच्या प्रकरणी जिल्ह्यात 24 गुन्हे नोंद झाले आहेत.
मात्र, ठिय्या आंदोलन, मोर्चा, साखळी उपोषणे, टायर जाळणे आदी प्रकारचे जिल्ह्यात तब्बल 116 गुन्हे नोंद झाले आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षण लागू केल्यानंतर मनोज जरांगे यांचा जिल्हा दौरा, त्यांच्यावर पुष्पवृष्टी व इतर कारणांनी 27 गुन्हे नोंद झाले आहेत. यात मनोज जरांगे यांच्यावरही पाच गुन्ह्यांचा समावेश आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, बुधवारी रात्री अंबाजोगाईच्या साधना मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांची संवाद बैठक झाली. रात्री 10 नंतर बैठक व ध्वनिक्षेपक सुरू ठेवून परवान्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उलंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तसेच, जनसमुदायासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून मुख्यमंत्री शिंदेंनी आपला विश्वास तोडलाय, तुमची हुशारी तुमच्यापाशी ठेवा, मी कट्टर खानदानी आहे. तुम्ही जर पालक असाल तर तुम्हाला अंतरवालीतल्या महिला दिसल्या नाहीत का, त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या का केल्या? त्या महिला तुमच्या कोणीच नाहीत का?, तुमच्या घरातील ती आई-बहीण आणि आमच्या मराठ्याच्या आई-बहिणीला इज्जत नाही का?, नऊ वर्षांच्या मुलीच्या पायात गोळी घातली, त्या लेकराची गोळी काढतांना दिड लिटर पाणी तिच्या पायातून निघाले, तिच्यात तुम्हाला आई - बहीण दिसली नाही का?, तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते करा, आम्ही तुम्हाला हिसका दाखवणारच. असे अंतरवाली येथील घटनेचा संदर्भ देऊन मुलीच्या पायाला गोळी लागल्याची अशी कुठलीही घटना घडलेली नसताना खोटी माहिती प्रसारित करून सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने सरकारविरोधात प्रक्षोभक स्वरूपाचे भाषण केले, असा आरोप पोलिस कर्मचारी संतोष बदने यांच्या फिर्यादीत करण्यात आला आहे.
यावरुन मनोज जरांगे, सचिन जोगदंड, राजेसाहेब देशमुख, अॅड. माधव जाधव, अमर देशमुख, अजित गरड, रणजीत लोमटे, अमोल लोमटे, राहूल मोरे, अॅड. जयसिंग सोळंके, अॅड. किशोर देशमुख, भिमसेन लोमटे व रविकिरण मोरे यांच्यावर गुन्हा नोंद झाला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.