Shivsena : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील हेच भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा करत त्यांचे शरद पवारांच्या राजीनाम्याच्यावेळीचे रडणे नाटक होते, असा आरोप शिवसेनेच प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला. (Sanjay Shirsat On Ncp) आम्हाला गद्दार म्हणणाऱ्या राष्ट्रवादीने आधी आपला इतिहास तपासावा असे आवाहन करतांनाच त्यांनी `काकां`च्या खंजीराला उद्धव ठाकरेंची पाठ खुणावतेय, असा इशाराही दिला.
शिवसेनेचा वर्धापनदिन काल मुंबईत दोन्ही बाजूंनी साजरा झाला. शिंदे गटाचा उल्लेख `गद्दार`, असा करत ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनेही त्यांच्यावर तोंडसुख घेतले. याला शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनी प्रत्युतर देतांना वंसतदादा पाटील मुख्यमंत्री असतांना व सोनिया गांधी यांच्या विदेशीच्या मुद्यावरून केलेल्या गद्दारीच्या दोन घटनांची आठवण करून देत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
संजय शिरसाट यांनी एक पोस्ट करत त्या दोन घटनांचा संदर्भ देत (Ncp) राष्ट्रवादीने खऱ्या अर्थाने हे दोन दिवस गद्दार दिन म्हणून साजरे करावेत, असा टोला लगावला आहे. (Shivsena) संजय शिरसाट यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, १९७८ च्या जुलै महिन्यात राज्य विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यावर वीज कोसळली. ४० आमदारांना सोबत घेऊन `काका` सरकारमधून बाहेर पडले.
वसंतदादांच्या पाठीत खूपसलेला तो खंजीर अजूनही रक्ताळलेला आहे. तसे पाहिले तर राज्यातले आद्य गद्दार कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. १८ जुलै १९७८ रोजी हा दिवस खऱ्या अर्थाने `गद्दार दिन` आहे. १९९९ साली काकांनी अचानक सोनिया गांधी परदेशी वंशाच्या (इटालियन) असल्याचे कारण पुढे करुन त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता. काकांनी फूस लावल्याने पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी बंडखोरी केली.
शिस्तभंगाची कारवाई करत काँग्रेसने या तिघांचेही निलंबन केले. त्यानंतर जून १९९९ मध्ये काकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, ही दुसरी गद्दारी. त्यामुळे हे दोन्ही दिवस राष्ट्रवादीने गद्दार दिन म्हणून साजरे करायला हवेत. काकांच्या खंजीराला आता उद्धव ठाकरेंची पाठ खुणावत आहे. रक्तरंजीत खंजिराचा नवा अंक लवकरच पहायला मिळणार आहे, असा सूचक इशारा देखील शिरसाट यांनी या माध्यमातून दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.