Danve V/S Sattar Political News : महायुती असो की महाविकास आघाडी प्रत्येक घटकपक्षात थोड्याफार प्रमाणात कुरबुरी, नाराजी असतेच. शेवटी अशा वादावर पक्षाचे राज्य आणि केंद्र पातळीवरचे नेते योग्यवेळी मार्ग काढत असतात. राहिला प्रश्न शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भोकरदनमध्ये भाजपचा सुपडा साफ करण्याचा दिलेल्या इशाऱ्याचा तर मी त्याला फार महत्व देत नाही. मुळात अब्दुल सत्तार यांचा माझ्या भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघाशी काही संबंध नाही, त्यांचा इथे प्रभावही नाही.
माझ्या मतदारसंघातील दोनशे गावातल्या दोघांची नावे सत्तारांनी सांगावी, या उलट मी त्यांच्या मतदारसंघातील दोन हजार लोकांची नावे सांगतो, अशा शब्दात भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना आव्हान दिले. सकाळच्या `थेट भेट` उपक्रमात सत्तार यांच्या संदर्भात आमदार संतोष दानवे यांना प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी माझ्या तालुक्यात सत्तारांचा प्रभावच नाही, असे सांगत त्यांच्या इशाऱ्याला महत्व देत नसल्याचे सांगितले.
लोकसभेच्या जालना मतदारसंघात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यापासून मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांचे राजकीय संबंध ताणले गेले आहेत. राज्यात भाजप-शिवसेना हे दोघे महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असले तरी गेल्या महिनाभरापासून अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्यातील राजकारण तापले आहे.
सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार समर्थकांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात मोर्चा काढत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून रावसाहेब दानवे समर्थकांनी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. या शिवाय अब्दुल सत्तार यांच्याकडून मतदारसंघात सुरु असलेल्या साडी वाटप कार्यक्रमावर रावसाहेब दानवे यांनी खरमरीत टीका केली होती. यावर संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील एका कार्यक्रमात थेट भोकरदनमध्ये जाऊन भाजपचा म्हणजेच विद्यमान आमदार संतोष दानवे (MLA Santosh Danve) यांचा सुपडा साफ करण्याची धमकी दिली होती.
या धमकीला आमदार संतोष दानवे यांनी मात्र हलक्यात घेतले. अब्दुल सत्तार यांचा माझ्या मतदारसंघाशी काय संबंध? माझ्या तालुक्यातील दोनशे गावातील दोन लोकांची नावे त्यांनी सांगावी, मी तरी सिल्लोड तालुक्यातील दोन हजार लोकांची नावे सांगू शकतो. त्यामुळे सुपडा साफ करणाऱ्या सत्तार यांनी थोडा संयम बाळगावा, असा टोला संतोष दानवे यांनी लगावला.
कोणी पाडण्याची भाषा किंवा विरोधात कामे केले म्हणून जय-पराजय होत नसतो. जनता आणि मतदार ते ठरवत असतात. मी केलेल्या विकासकामाच्या जोरावर लोकांनी दोन वेळा विधानसभेवर निवडून पाठवले. आता तिसऱ्यांदा माझा फैसला जनता जनार्दनच करेल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या तोंडावर मित्र पक्षांमध्ये अशा प्रकारच्या कुरबुरी होत असतात.
महायुती प्रमाणे महाविकास आघाडीतील तीनही पक्षात नाराजी आहेच. राज्यात विधानसभेची निवडणुक महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढत आहोत. आज जे विरोधाची, सुपडा साफ ची भाषा करत आहे, त्यांना राज्य आणि केंद्रातील आमचे वरिष्ठ नेते योग्यवेळी योग्य ती समज देतील, असा सूचक इशाराही संतोष दानवे यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.