Adarsh Society Scam News
Adarsh Society Scam NewsSarkarnama

Adarsh Society Scam News : ठेवीदारांवर अश्रुधुराच्या नळकांड्या, गुन्हे दाखल झाल्यानंतर कराडांनी घेतली दखल..

Chhatrapati Sambhajinagar: गेल्या वर्षी जून महिन्यात आदर्श नागरी सहकारी पंतसंस्थेत दोन कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमधील दोनशे कोटींच्या घोटाळ्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून हजारो ठेवीदारांचे हक्काचे पैसे अडकले आहेत. मोर्चे, निदर्शने, आंदोलन करूनही काहीच हाती लागत नसल्याने उद्विग्न झालेल्या ठेवीदारांनी हजारोंच्या संख्येने विभागीय आयुक्त कार्यालायवर धडक देत आंदोलन केले होते. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आक्रमक झालेल्या ठेवीदारांनी पोलिसांचे बॅरिकेट ओलांडून आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार आणि अश्रुधुरांचे नळकांडे फोडत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यासह पाचशेहून अधिक आंदोलकावर गुन्हेही दाखल केले. त्यानंतर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठीची प्रक्रिया तत्परतेने राबवा, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेविदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवा, असे आदेश कराड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेत दिले.

Adarsh Society Scam News
Maratha Reservation : मंत्रिपदाचा कधीच राजीनामा दिलाय; भुजबळांनी जाहीरपणे सांगून टाकलं

ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना, पतसंस्थेच्या मालमत्तेचा लिलाव तसेच कर्जदाराने कर्ज घेताना पुरेसे तारण दिले किंवा नाही याबाबत तपासणी करावी.

तसेच ठेवी परत करण्याबाबतची प्रक्रिया जलद गतीने राबवावी, लिलाव व या सर्व प्रक्रियेबाबत ठेविदारांना वेळोवेळी माहिती द्यावी, जेणेकरून त्यांना दिलासा मिळू शकेल, असे कराड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी एक रकमी कर्ज परतफेड योजनेबाबत माहिती दिली. बैठकीच्या प्रारंभी पोलीस अधिकाऱ्यांनी संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी होत असलेल्या कारवाईची माहिती दिली. सहकार विभागाने संस्थेचे लेखापरीक्षण, संस्थेच्या कर्जांची माहिती, त्यांची वसुली व सद्यस्थितीत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.

यावेळी व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सु.प. काकडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या वर्षी जून महिन्यात आदर्श नागरी सहकारी पंतसंस्थेत दोन कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. आदर्श पतसंस्थेचा सर्वेसर्वा आणि मुख्यसूत्रधार असलेल्या अंबादास मानकापे यांच्या नेतत्वाखालील संचालक मंडळ, सहकार खात्यातील अधिकारी यांना हाताशी धरून दोनशे कोटीहून अधिकचा हा घोटाळा केला. मानकापे याचे वर्चस्व असलेल्या आदर्श ग्रुप अंतर्गत येणाऱ्या 15 पेक्षा जास्त संस्थांना नियमबााह्य कर्ज वाटप केल्याचे लेखापरीक्षक अहवालातून समोर आले.

कर्जवाटप केले त्या मानकापे याचे नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तीच्या नावे ही कर्ज उचलण्यात आली आहेत. विशेष म्हणजे जामीनदार आणि विनातारण किंवा बनावट तारण, सभासद दाखवून हा कोट्यावधींचा घोटाळा करण्यात आला. याचा फटका ठेवीदारांना बसला अनेकांचा या धसक्याने मृत्यू झाला, तर काहींनी तणावातून मृत्यूला कवटाळले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Adarsh Society Scam News
PMC News : पुणे आयुक्तांचा भलताच 'विक्रम'; दहा दिवसांत काढली 291 टेंडर, आता कुणावर खापर फोडणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com