Marathwada BJP News : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करत मतं मागणार हे आता स्पष्ट झाले आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी आणि देशात निर्माण झालेले वातावरण हेच दर्शवत आहे.
देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यावर भाजपाने भर दिला आहे. यासाठी कट्टर हिंदुत्ववादी संत, महंत, महाराजांची मदतही घेतली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या कालीचरण महाराजांसोबत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार भागवत कराड(Bhagwat Karad) यांची मिरवणूक काढण्यात आली आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर येथे सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात कराड सहभागी झाले होते.
यावेळी ग्रामस्थांनी कालीचरण महाराज आणि कराड यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढली. आता वादग्रस्त कालीचरण महाराज यांच्यासोबत कराड मिरवणुकीत सहभागी झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहता इथे हिंदू-मुस्लिम असा वाद आणि त्याआधारे केले जाणारे राजकारण कायम चर्चेचा विषय ठरत आला आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही कायम हिंदू-मुस्लिम या विषयावर मते मागितली गेली.
जिल्ह्यात शिवसेना-भाजपची युती होती. लोकसभा निवडणुकीत खान हवा की बाण? हा मुद्दा युतीकडून कायम पुढे केला गेला. तो त्यांना फलदायी ठरला, यावरच शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत सातत्याने विजय मिळवला.
एमआयएम(MIM) पक्षाची राज्यात विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यात एन्ट्री झाली, तेव्हापासून तर हिंदू-मुस्लिम मतांचे राजकारण मोठ्या प्रमाणात होऊ लागले. तर शिवसेना-भाजप या दोन कट्टर हिंदुत्ववादी पक्षात आता फूट पडली. यानंतर शिवसेनेचे दोन गट झाल्याने खरे हिंदुत्ववादी कोण? असा वाद दोन्ही गटात वाद सुरू झाला आहे. तर दुसरीकडे अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुद्दा हाताशी धऱ भाजपनेआपली प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी म्हणून जनतेसमोर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत याच हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप मराठवाड्याची राजधानी असलेला छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ ताब्यात घेऊ पाहत आहे. राज्यसभेवर निवड आणि दोन वर्षापुर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झालेल्या कराड यांच्याकडे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. त्यांनीही आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला.
गेल्यावर्षी बागेश्वर धामचे मठाधीपती रामकथाकार धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेचे आयोजन हा त्याचाच भाग होता. आता ज्या कालीचरण महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल होता. ज्यामुळे त्यांना 95 दिवस तुरुंगात राहावे लागले, अशा कालीचरण महाराजांसोबत भागवत कराड बसले, यावरून कराड लोकसभा निवडणुकीत कराडांच्या प्रचारात कट्टर हिंदुत्ववाद यालाच अधिक महत्व असणार आहे, हे स्पष्टे होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.