Beed Farmars News : बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये ६५ मिमी पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र अतिवृष्टी होवून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाधीत शेतकर्यांना थेट मदत करण्यात यावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असा शब्द कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.
धनंजय मुंडे(Dhananjay Munde) व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यातील लोणाळा, अर्धमसला, तळेवाडी आदी ठिकाणी पीक नुकसानाची पहाणी केली. भरपावसात कृषी मंत्र्यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्तांना दिलासा दिला आहे.
अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या आणि कापुस पिकावरील अकस्मीक मर (पॅरा विल्ट) मुळे त्रस्त असलेल्या शेतकर्यांशी संवाद साधला. तळेवाडी येथे भरपावसात त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. धनंजय मुंडे म्हणाले, ज्या ठिकाणी २४ तासात अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज भासत नाही, असा एनडीआरएफचा नियम आहे.
बीड(Beed) जिल्ह्यातील जवळपास सर्व महसुल मंडळात चोवीस तासात ६५ मिमी. पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तो भाग अतिवृष्टीखाली येतो त्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेत जमीनीचे पंचनामे किंवा ई पीक पाहाणी करण्याची गरज न भासू देता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकर्यांना सरसकट थेट शासनाकडुन मदत दिली जावी, याबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
खरडून वाहुन गेलेल्या जमिनी, गाय, म्हैस या सारख्या पशुधनांचा मृत्यू झाला असल्यास अशा घटनांच्या बाबतीत पंचनाम्यांची गरज भासणार आहे. असे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिलेले आहेत. अतिवृष्टीचे मोठे संकट निर्माण झाले आहे, यातुन शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम महायुती सरकार करत आहे.
थकीत पीक विम्याच्या संदर्भात त्यांनी गेवराई येथे अधिकार्यांना कृषी विभागाने सुनावणी घेवून मान्य केलेल्या गेवराई तालुक्यातील २५ हजार २२१ शेतकर्यांना तत्काळ पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी मंत्र्यांच्या दौर्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा मिळाल्याची भावना बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.