Imtiaz Jalil : विरोधक ज्यांना अॅक्सीडेंटल खासदार म्हणून हिणवतात ते इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) सध्या भलतेच फाॅर्मात आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्याला सुरूंग लावत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर त्यांच्या आत्मविश्वास दुणावणे सहाजिकच आहे. पण त्यांच्या विजयाला कोणाकोणाचा हातभार लावला यावर नजर टाकली तर तो सोपा आणि सहज नव्हता हे स्पष्ट होते.
तरी देखील आगामी लोकसभा निवडणुकीत कोणीही मैदानात येवू द्या, पुन्हा मीच खासदार होणार हे इम्तियाज जलील हे छातीठोकपणे सांगत आहेत. (Shivsena) त्यांच्या या दाव्याकडे आत्मविश्वास म्हणुन पहावे ? की मग अतिआत्मविश्वास असा प्रश्न निश्चितच पडतो. २०१९ मध्ये राज्याच्या राजकारणात आकाराला आलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम (Aimim) या दोन पक्षांच्या एकत्रित ताकदीचा परिणाम म्हणून इम्तियाज यांना लोकसभेची पायरी चढता आली होती.
एवढेच नाही, तर शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या हक्कांच्या हिंदू मतांमध्ये अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल पावणेतीन लाख मत मिळवत प्रचंड फूट पाडली, यामुळे इम्तियाज यांचा विजय अधिक सोपा झाला होता. एवढे पूरक वातावरण असूनही एमआयएमचा विजय केवळ पाच हजार मतांनी झाला होता. शेवटी जो जिता वही सिकंदर हे जरी खरे असले तरी विजय आणि पराभवामधील अंतर पहाता एमआयएमने इतिहास घडवला वगैरे म्हणणे धाडसाचे ठरेल.
गेल्या अडीच तीन-वर्षातील इम्तियाज जलील यांची खासदार म्हणून कामगिरी बघितली तर ते निश्चितच उजवे ठरतात. सभागृहात मतदारसंघातील प्रश्न आक्रमक आणि ठामपणे मांडत त्यांनी मतदारांची मने जिंकल्याचे अनेकदा पहायला मिळाले. शिवाय जनतेचे अनेक प्रश्न घेवून त्यांनी केलेली आंदोलन, विरोधकांच्या भ्रष्टाचाराची केलेली चीरफाड, सरकारी पैशातून उभारण्यात येणारे पुतळे याला केलेला विरोध या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी आपली एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे.
परंतु विरोधी पक्षाचा खासदार म्हणून त्यांना जिल्ह्याच्या विकासात फार मोठे योगदान देता आलेले नाही. त्यामुळे केवळ प्रश्न मांडले म्हणून त्यांना लोक पुन्हा निवडून देतील का? हा मोठा प्रश्न आहे. शिवाय २०१९ मध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती, त्यात आणि येणाऱ्या २०२४ मध्ये आणखी काय चित्र असेल यावर देखील बरेच काही अवलंबून असणार आहे. सध्या राज्यात निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीवरून जर इम्तियाज पुन्हा खासदार होण्याचा दावा करत असतील तर तो योग्य देखील आहे.
परंतु दुसरीकडे एमआयएमच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे दलित मतदार यावेळी त्यांच्यासोबत नसणार आहेत. वंचितसोबतची युती तुटल्यामुळे एमआयएमला मोठी व्होटबॅक जोडणारा नवा मित्र आवश्यक आहे. राष्ट्रीय स्तरावर काही प्रस्ताव आपल्याकडे आल्याचा दावा देखील इम्तियाज यांनी केला आहे.
शिंदे-ठाकरे आणि भाजप या तीन पक्षांमुळे होणारी हिंदू मतांची फूट हेच इम्तियाज यांच्या दाव्यामागचे प्रमुख कारण समजले जाते. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांचा पुन्हा खासदार होण्याचा आत्मविश्वास खरा ठरतो? की मग तो अतिआत्मविश्वास हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.