
Ajit Pawar News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि त्यात वाल्मीक कराड अडकल्याने वादात सापडले आहेत. सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी पक्षाचे काही आमदार आणि विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे बीडचे पालकमंत्री पद हुकले अन् अजित पवारांनी जिल्ह्याची धुरा आपल्या हाती घेतली. आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार पहिल्यादांच बीड मध्ये आले. त्याचा हा दौरा विविध कारणांनी चर्चेत आला आहे.
या पैकीच एक चर्चा म्हणजे अजित पवारांनी (Ajit Pawar) बीडला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर तैनात असलेल्या हेलिकॉप्टरमधून मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेला प्रवास. त्याचे झाले असे की, अजित पवार हे बीड दौऱ्यावर जाण्यासाठी सकाळी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. नियोजनानूसार इथून ते हेलिकॉप्टरने बीडला रवाना होणार होते. परंतु कार्यक्रमात बदल करत अजित पवारांनी हेलिकॉप्टर ऐवजी कारने बीडला जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळावर तैनात असलेल्या हेलिकॉप्टरने राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बीडला गेल्या.
दुपारी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून पुण्याच्या बैठकीसाठी अजित पवार या हेलिकॉप्टरने रवाना होणार असल्याची माहिती आहे. (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांच्या या हेलिकॉप्टर प्रवासाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मंत्री धनंजय मुंडे सध्या अडचणीत आहेत, त्यांच्यावर होणारी टीका, अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंगावर झेलावी लागत आहे. मुंडे यांचा बचाव करताना अजित पवार यांची चांगली दमछाक होताना दिसते आहे.
अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असले तरी त्यांच्या राजीनाम्याचा विषय आता थेट दिल्ली दरबारी पोहचल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र दिल्लीतून दबाव वाढला तर मात्र काहीही घडू शकते अशी परिस्थिती आहे. या सगळ्या प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे या फारशा प्रतिक्रिया देताना दिसत नाहीयेत. शिवाय उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याशी पंकजा यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
बीडचे पालकमंत्री होताच पंकजा यांनी मुंबईत अजित पवार यांचे स्वागत करत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. या सगळ्या घडामोडी आणि आज अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर मधून पंकजा यांनी संभाजीनगर ते बीड असा केलेला प्रवास याची त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती. शिवाय अजित पवार हे देखील बीड जिल्ह्यातील जनतेला न्याय देतील, असे त्या म्हणाल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.