

Marathwada Politics News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मराठवाड्याशी कायम जिव्हाळ्याचे नाते होते. मागसलेल्या मराठवाड्याचा विकास पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने करायचा हा ध्यास आणि विचार अजित पवार या भागातील नेत्यांसमोर अनेकदा बोलून दाखवायचे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तर अजित पवारांनी वारंवार बारामती पॅटर्न आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाचा उल्लेख केला. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणि अनेक नेते तयार करण्यात अजित पवारांचा मोठा वाटा राहिला आहे.
आज सकाळी अजित पवार यांचे विमान मुंबईहून बारामतीत उतरताना अपघातग्रस्त झाले आणि या दुर्दैवी घटनेते महाराष्ट्राच्या राजकारणातील 'दादा' माणूस गेला. ही दुःखद घटना जेव्हा मराठवाड्यात येऊन धडकली तेव्हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर सर्वच पक्षांच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, संजय बनसोडे, मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षक मतदरासंघाचे आमदार विक्रम काळे, राजेश विटेकर, प्रताप पाटील चिखलीकर यांचे अश्रू तर थांबतच नव्हते.
कालपर्यंत ज्या अजित पवारांसोबत हे नेते प्रचारसभेत होते, मराठवाड्याच्या विकासावर चर्चा करत होते, तो नेताच आज आपल्यात नाही ही कल्पनाच या सगळ्यांना सहन होत नव्हती. चॅनलवरील बातम्या, राज्यभरातील नेते, कार्यकर्त्यांकडून येणारे फोन यानंतर नेत्यांच्या भावना अनावर झाल्या. काय बोलावे हेच अनेकांना सूचत नव्हते. प्रत्येक नेत्याच्या डोळ्यासमोर अजित पवार यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, त्यांनी मराठवाडा आणि या भागातील जिल्ह्यासाठी केलेल्या कामांचा धडाका हे येत होते.
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे कळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे लातूरमध्ये मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या घरी दाखल झाले. दारातच विक्रम काळे यांनी त्यांच्या गळ्यात पडत आपल्या दाटून आलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तिथेच माजी मंत्री संजय बनसोडे आले, त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. तिकडे परभणीत राजेश विटेकर हे धाय मोकलून रडत होते. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांच्या तोंडून शब्द निघत नव्हते. तर मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण हे ही स्तब्ध झाले होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या जाण्याने मन हेलावून गेले आहे. शोकसंदेश व्यक्त करताना शब्द अपुरे पडत आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने बुधवारची (ता.28) सकाळ अतिशय दुर्दैवी ठरली आहे. स्वभावाने अजितदादा जरी थोडे फटकळ वाटत असले, तरी मनाने ते तितकेच निर्मळ, पारदर्शक आणि प्रामाणिक होते. त्यांच्या बोलण्यात कधी कधी कठोरपणा जाणवत असे, परंतु ज्या व्यक्तीशी ते फटकळपणे बोलत, त्याच व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याचे काम करून देणे, हा दादांचा खरा स्वभाव होता.
मी दादांच्या अत्यंत जवळ होतो. त्यांना अतिशय जवळून पाहिले, समजून घेतले. त्यामुळेच त्यांचा हा अचानक आणि दुर्दैवी अपघात स्वप्नातही न पाहिलेला धक्का आहे. कामाच्या बाबतीत असो, नेतृत्वाच्या बाबतीत असो किंवा माणुसकीच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रात 'दादा' म्हणून ओळखला जाणारा हा माणूस आज अचानक आपल्यातून निघून गेला आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.
दादांशी माझे नाते केवळ राजकीय नव्हते, ते पूर्णपणे वैयक्तिक आणि पितृतुल्य होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनीच मला सावरले, आधार दिला आणि आयुष्याला दिशा दिली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर त्यांनी अपार प्रेम केले, वडिलकीच्या नात्याने घडवले. जिल्हा परिषद सदस्यापासून आमदारापर्यंत नेले. आज त्यांच्या अकाली जाण्याने मी दुसऱ्यांदा पोरका झालो आहे. दादांची उणीव कधीच भरून निघणार नाही. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनातले त्यांचे योगदान अमूल्य असून ते सदैव प्रेरणास्थान राहील, अशा शब्दात आमदार राजेश विटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अत्यंत अभ्यासू नेता महाराष्ट्राने गमावला आहे. शिस्त, कामाचा धडका, वेळेचे नियोजन या गोष्टी अजित दादांकडून शिकण्यासाऱख्या होत्या. मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा माझ्या पाठीवर थाप मारून मला त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता राज्यमंत्री झाले तरी कॅबिनेट बैठकीतही स्वतः 'मेघना तुला काही बोलायचे आहे का'? असे विचारून दुसऱ्यालाही संधी देण्याची त्यांची कार्यपद्धती आठवते. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केल्या.
दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती... तुम्ही जीवाला चटका लावून गेलात. तुमचा राजकिय आणि अकॅडमिक सेन्स खूप जबरदस्त होता. भाषणातून, विनोद बुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं. पण आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं. महाराष्ट्र एका डायनामिक नेत्याला मुकला आहे. अजितदादांनी आपल्या कामाने, आपल्या वागण्याने राज्याच्या राजकारणात एक वेगळा दरारा निर्माण केला होता. कुशल प्रशासक, दिलेला शब्द पाळणारे व कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याच्या भावना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.