

Marathwada News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. महाराष्ट्रावर या घटनेने शोककळा पसरली आहे. राजकारणातील एक वक्तशीर, विकासाभिमूख नेता हरपल्याच्या प्रतिक्रिया राज्य आणि देशभरातून येत आहेत. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री तथा परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांनी आज आपण पुन्हा पोरके झालो आहोत, अशा शब्दांत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात एक घट्ट नाते निर्माण झाले होते. अजित पवारांच्या मोजक्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी धनंजय मुंडे हे एक होते. राजकीय संकटातही अजित पवारांनी मुंडे यांना धीर देण्याचे काम मध्यंतरीच्या काळात केले. अजित पवारांच्या विमान अपघाताचे वृत्त कळताच धनंजय मुंडे हे बारामतीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, प्रतिक्रिया व्यक्त करताना मुंडे यांना रडू कोसळले. ते काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.
बारामतीकडे निघताना त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट करून दिली. आज पुन्हा पोरका झालो... माझे दादा मला पोरका करून गेले.. माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता, वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले.
दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते. त्यामुळे अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका. त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये...देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आपला शोक व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.