Nanded NCP News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सध्या नांदेड जिल्ह्याचे दौरे वाढले आहेत. पक्ष, संघटना वाढीच्या दृष्टीने होणारे पक्षप्रवेश सोहळे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष होण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवून त्यांना पाठबळ देण्याचे काम सध्या अजित पवारांकडून सुरू आहे.
अशावेळी नांदेडच्या तीनही दौऱ्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी नांदेड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विषयावर मौन बाळगल्याचे दिसून आले. आगामी निवडणुका पाहता वादग्रस्त विषयाला हात न घालता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून आले आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनाही नांदेड विभागीय आयुक्त कार्यालयाचा विसर पडल्याची परिस्थिती आहे. लातूर आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उभारणीवरून संघर्ष सुरू आहे.
भाजपाचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे विभागीय आयुक्त कार्यालय नांदेड येथे व्हावे यासाठी आग्रही आहेत. तर आधी झालेल्या निर्णयाप्रमाणे हे कार्यालय लातूरमध्ये व्हावे, यासाठी त्या जिल्ह्यातील नेत्यांनी जोर लावला आहे. अशावेळी राज्याच्या नेतृत्वाला मार्ग काढून दोन्ही जिल्ह्यांना खुश करण्याची तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अजित पवार यांच्या नुकत्याच झालेल्या मुखेड दौऱ्याच्या वेळी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या काही तरुणांनी अजित पवार यांना विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विषयावर छेडले.
मात्र यावर काही न बोलता अजित पवार यांनी मौन बाळगणे पसंत केले. काही दिवसांपूर्वी मुंबईत देखील अजित पवार यांची नांदेड मधील एका शिष्टमंडळाने भेट घेऊन मंजूर झालेल्या विभागीय आयुक्त कार्यालय संदर्भात निवेदन दिले होते. हा प्रश्न सीमावादासारखा झाला असल्याचे विधान अजित पवारांनी केले होते. पुन्हा या विषयावरून वाद नको, अशी भूमिका घेणाऱ्या अजित पवार यांनी मुखेड दौऱ्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर मात्र सावध भूमिका घेतली.
हा विषय महत्त्वपूर्ण असून त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन देत वेळ त्यांनी वेळ मारून नेली. मराठवाडा विभागीय कार्यालयाच्या विभाजनावरून नांदेड आणि लातूर या दोन्ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये संघर्ष आहे. या वादात तूर्तास आपण उडी मारायला नको, अशी भूमिका अजित पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.