लक्ष्मीकांत मुळे
Nanded Political News : नांदेड जिल्ह्यातील मंडळ अध्यक्षांच्या निवडीपासून काहीसे दूर असलेले खासदार अशोक चव्हाण यांनी महानगरप्रमुख पदाच्या निवडीत मात्र महत्वाची भूमिका बजावली. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता या पदावर आपल्या समर्थकाची वर्णी लावण्याते चव्हाण यशस्वी ठरले आहेत. अमर राजूकर हे अशोक चव्हाण यांची सावली म्हणून ओळखले जातात. महानगरप्रमुख पदी त्यांची वर्णी लागल्याने शहरावर आता चव्हाण यांचाच वचक राहणार हे स्पष्ट झाले आहे.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपात प्रवेश केला होता. सव्वा वर्ष झाल्यानंतर चव्हाण यांनी पक्षाची जिल्ह्यातील सुत्रं आपल्या हाती घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भोकरमधून श्रीजय चव्हाण यांना उमेदवारी आणि आमदार केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये आपलाच शब्द प्रमाण मानला जावा, अशी रणनिती चव्हाण यांनी आखल्याचे चित्र आहे. अमर राजूरकर यांची महानगरप्रमुख पदी निवड हा त्याचाच भाग म्हणावा लागेल.
अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या सोबत जिल्ह्यातील (Nanded) अनेक आजी- माजी पदाधिकार्यांनी प्रवेश केला होता. राज्यसभेवर संधी देत पक्षाने अशोक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन केल्यानंतर त्यांनी मुलीला आमदार केले. आता चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून भाजपात दाखल झालेल्या इतर सहकारी आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेत मानाचे पान मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
दोन वेळा विधानपरिषदेत आमदार म्हणून काम कलेले माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या खांद्यावर नांदेड महानगराध्यक्षपदाची जबाबदारी टाकत अशोक चव्हाण यांनी खऱ्या अर्थाने संघटनात्मक रचनेत लक्ष घातल्याचे दिसून आले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. नांदेड महानगरप्रमुख पदासाठी जिल्ह्यात मोठी स्पर्धा होती. नांदेड शहर मोठे असल्याने या मोठ्या शहराची जबाबदारी कोणाला मिळणार? याची अनेकांना उत्सूकता होती.
नांदेड शहराचा राजकीय, भौगोलिक, सामाजिक असा चौफेर अभ्यास असलेल्या अमरनाथ राजूरकर यांची या पदावर वर्णी लावत अशोक चव्हाण यांनी मास्टर स्ट्रोक लगावला आहे. नांदेड शहर व जिल्ह्यातील राजकारणात अशोक चव्हाणांचा दबदबा राहिला आहे. पण त्यांच्या व्यूहरचनेतील राजूरकर हे नेहमीच महत्वाचे सहकारी राहिले आहेत. दांडगा संपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या राजूरकर यांच्या महानगरप्रमुख पदाच्या नियुक्तीने भाजपातील निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
नांदेड शहरात शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार, एक विधानपरिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्करराव पाटील खतगावकर, काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांचे राजकीय वजन आहे. या सर्वांशी टक्कर देत व आपल्या पक्षातील जुन्या नव्या पदाधिकार्यांना सोबत घेऊन राजुरकरांना काम करावे लागणार आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळवून देण्यात चव्हाण-राजूरकर जोडीची महत्वाची भूमिका असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.