

Mumbai News : महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही उमेदवारी दानवेंच्या पारड्यात पडली. काँग्रेसने आधी विरोध दर्शवत उमेदवारही दिला. पण उद्धव ठाकरे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आणि काँग्रेसने माघार घेत सगळ्या 9 उमेदवारांची निवड बिनविरोध झाली.
निवडणूक विभागाकडून सोमवारी (ता.4 मे) अंबादास दानवे यांनी विधान परिषद सदस्य झाल्याचे प्रमाणपत्र मिळवले. ते मिळताच दानवे मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आसनासमोर जाऊन नतमस्तक झाले. आमदारकीचे प्रमाणपत्र बाळासाहेबांच्या चरणी ठेवत त्यांचे आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवत दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल त्यांचेही पुप्षगुच्छ देऊन आभार मानले.
मातोश्रीच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा भावना दाटून आल्या. ज्या विचारांनी आयुष्याला दिशा दिली, ज्या आशीर्वादांनी संघर्षाला ताकद दिली, त्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पवित्र स्मृतींसमोर नतमस्तक होण्याचा आजचा क्षण आयुष्यातील अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी क्षण ठरल्याची भावना अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर मातोश्री येथे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास मिळाला, हे माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठे आहे. हा विजय माझा एकट्याचा नाही. हा प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाचा, प्रत्येक मराठी माणसाचा, आणि बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या लाखो हृदयांचा विजय आहे.
मिळालेली ही जबाबदारी पदाची नाही, तर विचारांची, निष्ठेची आणि जनतेच्या विश्वासाची आहे. बाळासाहेबांनी दाखवलेल्या हिंदुत्व, स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मार्गावर अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू, असा विश्वास अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मिडियावरील पोस्टच्या माध्यमातून दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.