Chhatrpati Sambhajinagr News : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा आहे. गोरगरिब मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. गेल्या दहा महिन्यापासून मराठा समाज हक्कासाठी लढा देतो आहे. पण राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
गुरुवारी दुपारी दानवे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांना फोन करून या विषयावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका सांगितली.
आमचा पक्ष, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत. दहा महिन्यापासून ज्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी शासनाकडे केल्या त्या रास्त आहेत. सरकारने हे मान्य केले, पण त्याची अंमलबजावणी करण्यास सातत्याने टाळाटाळ करत आहे. दिलेला शब्द, आश्वासन सरकार पाळत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली.
त्यामुळे आता मराठा समाजाची दिशाभूल, फसवणूक न करता तातडीने निर्णय घ्यावा. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना त्याकडे दुर्लक्ष करणे सरकारला परवडणारे नाही. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या सीमेवर धडकला होता, तेव्हा वाशीत येऊन मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्याचे पत्र दिले होते.
(Edited By : Sachin wahghmare )
विजयाचा गुलाल अंगावर घेतला होता, पण त्यानंतर पुन्हा हा प्रश्न रखडत ठेवला. आता मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तातडीने सोडवावा, असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले.
दरम्यान, शासनाने पाठवलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करत एक महिन्याचा वेळ दिला. या काळात शासनाने हा विषय मार्गी लावावा, असेही दानवे यांनी म्हटले आहे.