Vidhan Parisad : महाराष्ट्रातील सत्तातरांनतर शिवसैनिकांवर खोटे गुन्हे , मारहाण अशा घटना घडल्या आहेत. पोलिसांनी एकांगी भूमिका घेतल्याचे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. परंतु सत्ताधारी भाजपच्याच एका पदाधिकाऱ्यावर तब्बल ५० ते ५५ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. तलवारी, लाठ्या-काठ्यांनी या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सभागृहात उपस्थित केला.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे निघत असून या हल्लेखोरांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की नाही? असा प्रश्न दानवे यांनी केला. (Pravin Darekar) पाॅइन्ट आॅफ इन्फाॅरमेशनच्या माध्यमातून दानवे यांनी राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल सरकारला जाब विचारला. (Shivsena) दानवे म्हणाले, नुकताच एका लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, मी देखील तो केला होता. हा व्हिडिओ मार्फ केलेला होता की ओरिजनल याची चौकशी अद्याप झालेली नाही.
त्याची एसआयटी चौकशी सरकारने लावली आहे. मी सभागृहाचे लक्ष दहिसरमध्ये घडलेल्या गंभीर प्रकरणाकडे वेधू इच्छितो. इथल्या विधानसभा सदस्याच्या ५० ते ५५ कार्यकर्त्यांनी भाजपच्या विभीषण वारे या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. तलवारी, काठ्या घेवून हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यात त्याच्या डोक्याला, खांद्याला गंभीर दुखापत झाली असून तब्बल २१ टाके पडले आहेत. या हल्यात आशिष नायर नावाच्या गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराचा देखील समावेश होता.
एका आमदाराच्या मुलाचा ड्रायव्हर देखील या हल्लोखोरांमध्ये असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विभीषणला दवाखान्यात भरती सुद्धा करून घेतले जात नव्हते. पोलिसांकडे तक्रार दाखल करायला गेले तर ती देखील दाखल करून घेतली गेली नाही. मग पोलिसांवर, हाॅस्पीटलवर कोणाचा दबाव होता, कोणाच्या सांगण्यावरून हे सुरू होते, याची चौकशी झाली पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेचा हा गंभीर प्रश्न असल्याने सरकारने किंवा स्वतः गृहमंत्र्यांनी याचा खुलासा करावा तसेच सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी दानवे यांनी केली.
५० ते ५० जण एकत्रितपणे एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करतात, म्हणजे हा गुन्हा संघटित गुन्ह्याच्या प्रकारात मोडतो. त्यामुळे या प्रकरणी दंगलीचा गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे, पण हल्लोखोरांवर मोक्का अंतर्गत देखील कारवाई झाली पाहिजे.अंबादास दानवे यांनी उपस्थितीत केलेल्या या प्रकरणावर आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील भाष्य करत घडलेला प्रकार गंभीर असल्यामुळे तातडीने कारवाईची मागणई केली. दरेकर म्हणाले, विभीषण वारेने काही दिवसांपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, इतर काही लोक प्रवेश करणार होते.
प्रवेशाचे बॅनर लावले म्हणून त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याच्या डोक्यावर १९ वार केले गेलेत, तेव्हा अशा प्रवृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजे. हल्लोखोर कोणत्या पक्षाचे आहेत याचा इथे काहीही संबंध नाही. संतापजनक बाब म्हणजे, एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर पोलिस वारेची तक्रार देखील घ्यायला तयार नव्हते. मी स्वतः पोलिसांत गेलो, तेव्हा तक्रार दाखल करून घेण्यात आली. तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या डीसीपीला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी दरेकर यांनी केली.
ज्या शताब्दी हाॅस्पीटलमध्ये त्याला अॅडमिट करून घेतले नाही, किरकोळ जखमांची नोंद केली, त्या वैद्यकीय अधिकारी आणि डीनला देखील निलंबित केले पाहिजे. या संपुर्ण घटनेचे सीटीव्ही फुटेज मला मिळाले, पण पोलिसांना कसे मिळत नाही? या प्रकरणाची चौकशी करा, डीसीपीला निलंबित करा, तर कायद्याचा धाक बसेल. मारहाण करणाऱ्यांवर अनेक गुन्हे असल्यामुळे या सगळ्या ५५ लोकांना अटक करून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करा, अशी मागणी दरेकरांनी केली. यावर सरकारच्या वतीने वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्यापर्यंत चौकशी करून कारवाई केली जाईल. तसेच सभागृहात निवेदनही करण्यात येईल असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.