Latur Congress Political News : लोकसभा निवडणुकीत राज्यात 14 जागा जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेली काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यातील मराठवाड्यातील तीन जिल्ह्याचा पहिला मेळावा आज शनिवारी (ता. दहा) लातूरमध्ये पार पडला. यात राज्यातील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शंखनाद केला. मराठवाड्यात लोकसभेच्या तीनही जागा जिंकून देणारे माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
लातूरकरांनी अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना लातूरमध्ये अडकवून न ठेवता राज्यभरात फिरू द्यावे, लातूरची जबाबदारी तुम्ही घ्या, असा सूर सगळ्याच नेत्यांच्या भाषणातून निघाला. एकूणच राज्याच्या काँग्रेसमध्ये लातूरला गतवैभव प्राप्त झाले असून देशमुखांची काॅलर पुन्हा टाईट झाल्याचे चित्र आजच्या मेळाव्यातून दिसून आले. आगामी विधानसभेच्या युद्धासाठी आपण सज्ज झालो आहोत, हे शंखनाद करुन काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी दाखवून दिले.
महाभारताचा धागा पकडत मेळाव्याचे अध्यक्ष माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी महाभारतातील युद्ध हे अन्यायाच्या विरोधात होते तसेच युद्ध आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत लढायचे आहे, असे सांगितले. राज्य शासनाच्या विरोधात असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मराठवाड्यात पक्षाला चांगले वातावरण तयार झाले आहे.
आपला पक्ष जेथे मजबूत आहे, तेथे पक्षाचा उमेदवार असावा. या करीता वाटाघाटीच्या वेळी नेत्यांनी आग्रही भूमिका घ्यावी. (Latur) मराठवाड्याचे पालकत्व नेत्यांनी घ्यावे, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले. यावेळी सर्वच नेत्यांनी अमित देशमुख यांच्यावर मराठवाड्याची जबाबादारी सोपवली.
तसेच लातूरमधून बाहेर पडून मराठवाड्यासह राज्यात सभा घेण्याचे आवाहन केले. मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार ठरवण्यापासून सगळे निर्णय हे शंभर टक्के अमित देशमुख यांच्या पत्रावरच घेतले जातील, असे सांगत सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी अमित देशमुख हेच मराठवाड्यातील नेते असल्यावर शिक्कामोर्तब केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठवाड्यात तीन खासदार निवडून आल्याचे श्रेय व्यासपीठावरील सर्वच नेत्यांनी अमित देशमुखांना दिल्याचे पाहून अमित देशमुख यांच्यासह मराठवाड्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे हे श्रेय असल्याचे सांगत या विजयात कार्यकर्तेही तितकेच महत्वाचे असल्याचे सांगितले. नांदेड जिल्हा हे माझ्या गुरुंचे शहर आहे, असं विलासराव देशमुख नेहमी सांगायचे याची आठवण करुन देत नाना पटोले यांनी अमित देशमुख यांनाही नांदेडकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.