Amit Deshmukh : मराठवाडा काँग्रेसमध्ये अमित देशमुखांचा शब्द अंतिम?

Amit Deshmukh News : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अमित देशमुख यांचे वजन वाढले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात उमेदवार ठरवताना अमित देशमुखांचा शब्द अंतिम राहिल, असे चित्र दिसत आहे.
amit deshmukh.jpg
amit deshmukh.jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकत महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष बनला. त्यापूर्वीच्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीत केवळ एक जागा जिंकू शकलेल्या काँग्रेसला त्याद्वारे नवसंजीवनी मिळाली. हे यश कोण्या एका चेहऱ्याचा बळावर मिळालेले नाही. आपापल्या भागांतील तरुण नेत्यांनी केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. यशोमती ठाकूर, विश्वजित पाटील, सतेज पाटील, अमित देशमुख आदी हे ते तरुण चेहरे.

अमित देशमुख ( Amit Deshmukh ) यांच्या मागे वडील, माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचा समृद्ध वारसा आहे. विलासरावांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, मतदार लातूर, मराठवाडाच नव्हे तर राज्यभरात आहेत. 1995 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विलासरावांनी 'फिनिक्स' भरारी घेत राज्याच्या मुख्यमंत्रिपदाला दोनवेळा गवसणी घातली होती. वडिलांसारखीच जिद्द अमित देशमुख यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे.

यापूर्वीच्या दोन निवडणुकांत लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभूत झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा खेचून आणली आहे. त्यामुळे अमित देशमुखांचे वजन वाढले आहे. त्यावर 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

अमित देशमुखांनी लातूरची जागा तर खेचून आणलीच, शिवाय शेजारच्या उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघासह नांदेड मतदारसंघातही त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासांठी प्रचारसभा घेतल्या होत्या. जालना मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते उपस्थित राहिले होते. या सर्व बाबींमुळे विलासराव देशमुख ( Vilasrao Deshmukh ) यांच्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उस्मानाबाद, नांदेड आणि जालना मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.

माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. अमित देशमुख यांनी आता धाराशिव जिल्ह्यातही लक्ष घातले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, नेतृत्वाची पोकळी भरून निघत आहे.

amit deshmukh.jpg
Chitra Wagh : चित्रा वाघांच्या सोयीच्या नैतिकतेचा बुरखा न्यायालयाने टराटरा फाडला

विलासराव देशमुखांचे निधन 2012 मध्ये झाले. देशात 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आली. त्यात लातूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोन निवडणुकांत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसचे संघटन मोडित निघाल्यासारखेच झाले होते. शेजारच्या धाराशिव जिल्ह्यातही काँग्रेसची वाताहत सुरू होती. या जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार मधुकरराव चव्हाण यांचा 2019 च्या निवडणुकीत पराभव झाला होता. राज्यभरात पक्ष सोडण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले होते, त्यांचा आत्मविश्वास संपत चालला होता. अशा परिस्थितीतून पक्षाला सावरण्याची कठीण कामगिरी अमित देशमुख यांनी पार पाडली.

तत्पूर्वी, अमित देशमुख हेही भाजपमध्ये जाणार, अशा अफवा पसरल्या होत्या. ते निष्क्रिय राहत असल्याने त्या अफवांना बळ मिळत होते. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला अमित यांचे बंधू, अभिनेता रितेश देशमुख यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी रितेश देशमुख यांनी केलेले भाषण खूप गाजले होते. काका दिलीपराव देशमुख यांच्यासमोर नतमस्तक होत रितेश यांनी अमित देशमुखांना सक्रिय होण्याची साद घातली. राज्यात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणावर आसूड ओढले. त्यानंतर अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला होता.

लातूरचा उमेदवार ठरवण्यासाठी काका-पुतण्यांनी पुढाकार घेतला आणि डॉ. शिवाजी काळगे यांना रिंगणात उतरवले. देशमुखांनीच उमेदवार ठरवल्यामुळे डॉ. काळगे यांना विजयी करण्याची जबाबदारीही त्यांनी एकप्रकारे स्वीकारली होती. अमित देशमुख प्रचारात सक्रिय झाले. अमित देशमुखांच्या मातोश्री वैशालीताई देशमुख याही प्रचारात उतरल्या. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला. डॉ. काळगेंना उमेदवारी देणे हाच मुळी देशमुखांचा 'मास्टरस्ट्रोक' होता. काळगे हे जंगम समाजाचे आहेत. त्याद्वारे लिंगायत समाजाला जोडून ठेवण्याचे काम देशमुखांनी केले होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी लातुरात एक मुक्काम केला होता. अमित देशमुख यांचे काँग्रेसमध्ये वजन वाढल्याचे ते संकेत होते. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसमध्ये अमित देशमुख यांचा शब्द अंतिम ठरेल, अशी शक्यता आहे. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी म्हणून 10 ऑगस्ट रोजी लातूर येथे काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे.

amit deshmukh.jpg
Uddhav Thackeray Delhi Tour : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच 'मविआ'चा चेहरा, दिल्ली दौरा फळाला येणार?

बैठकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्ते येणार आहेत. लातूर जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे दोनच आमदार आहेत. लातूर शहरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमधून त्यांचे बंधू धीरज देशमुख. या जाहीर सभेच्या निमित्ताने आमदार धीरज देशमुख यांच्याही क्षमतेचा कस लागणार आहे. सभा यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांना पार पाडून दाखवावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये वाढलेल्या अमित देशमुखांच्या वजनावर यानिमित्ताने शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठक आणि सभेकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com