Amit Saha Nanded Rally : शिंदेकडे दुर्लक्ष, फडणवीसांचे कौतुक अन् ठाकरेंवर राग काढत शहांनी फोडला प्रचाराचा नारळ..

Bjp : राम मंदिर, कलम ३७० सारखे ज्वलंत मुद्दे निकाली निघाल्यानंतर आता भाजपने समान नागरी कायद्याचा मुद्दा प्रचारात.
Amit Saha Nanded Rally News Nanded
Amit Saha Nanded Rally News NandedSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : अकरा महिन्यांपुर्वी फोडाफोडी करून सत्तेवर आलेले शिंदे-फडणवीस सरकार, अनपेक्षितपणे एकनाथ शिंदेंना बहाल केलेले मुख्यमंत्रीपद हा भाजपच्या चाणाक्य नितीचा भाग होता हे आज नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे. (Amit Saha Nanded Rally News) आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात शहा यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले, पण विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केले.

Amit Saha Nanded Rally News Nanded
Sanjay Shirsat On Shivsena (UT) News : भाजपने ठाकरेंना मुख्यमंत्री पद देण्याचे मान्य केले होते, पण पवारांनी गुगली टाकली..

संपुर्ण भाषणात शहा यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आपला राग काढल्याचे देखील दिसून आले. यावरून महाराष्ट्रात भाजपचा नंबर एकचा शत्रू उद्धव ठाकरे यांची शिवसेना असणार आहे, हे शहा (Amit Saha) यांनी स्पष्ट केले. २०१९ मध्ये शिवसेना-भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले असतांना ठाकरेंनी ऐनवेळी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याचे शल्य शहा यांच्या मनात अजूनही आहे, हे आजच्या भाषणातून स्पष्ट झाले.

हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाची कोंडी करण्याची रणनिती भाजपने आखली असून राम मंदिर, ट्रिपल तलाक, काशीविश्वेशवर काॅरिडोअर, सोमनाथ मंदिर, कलम ३७०, समान नागरी कायदा या मुद्यांवर ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शहा यांनी भाषणातून दिले. (Nanded) औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर केल्याचे समर्थन देखील ठाकरे करू शकत नाहीत, अशी अवस्था त्यांची महाविकास आघाडीसोबत जावून झाल्याचा टोला शहा यांनी लगावला.

कर्नाटक सरकार सावरकरांचा इतिहास मिटवू पाहत आहे, त्यांच्यासोबत तुम्ही आहात, तुम्हाला हे मान्य आहे का? असा सवाल करत शहा यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला. महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडले नाही, तर ज्या शिवसैनिकांना तुम्ही काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेलात हे पटले नाही, तेच आमच्यासोबत आले. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची हे देखील स्पष्ट झाल्याचे सांगत शहा यांनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.

नांदेड लोकसभेसह महाराष्ट्रातील ४५ जागा निवडून देण्याचे आवाहन करतांनाच २०२४ मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी तुम्ही मोदींना पाहू इच्छिता की, राहूल बाबाला, असे विचारताच उपस्थितांनी मोदींच्या नावाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. राम मंदिर, कलम ३७० सारखे ज्वलंत मुद्दे निकाली निघाल्यानंतर आता भाजपने समान नागरी कायद्याचा मुद्दा प्रचारात आणल्याचे देखील दिसून आले.

Amit Saha Nanded Rally News Nanded
Sharad Pawar News : पवारांनी वाढवले भाजपचे टेन्शन; देशात परिवर्तन दिसेल...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी आणि राज्याला पहिल्या क्रमांकावर नेणारे असा उल्लेख करत शहा यांनी त्यांचे महत्व पुन्हा एकदा वाढवले आहे. शिंदे गटासाठी ही काळजी करण्याची बाब म्हणावी लागेल. एकत्रित निवडणूका लढल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याचाच हा ट्रेलर असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. अमित शहा यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच आज नांदेडमधून फोडला असे म्हणावे लागेल.मोदी सरकारच्या योजनांचा उल्लेख करत शहा यांनी राहुल गांधी हे विदेशात जावून आपल्या देशाची बदनामी करत असल्याचे सांगितले.

देशात त्यांच कुणी ऐकत नाही, म्हणून ते विदेशात जावून बोलतात, असा टोला लगावतांनाच शहा यांनी युपीए सरकारची दहा वर्ष आणि मोदी सरकारच्या नऊ वर्षांची तुलना केली. युपीएचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले होते, तर आमच्या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसल्याचे सांगत शहा यांनी आपलीच पाठ थोपटवून घेतली. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, याचा उल्लेख करत शहा यांनी मुस्लिम आरक्षणावर देखील भाष्य केले. एकंदरित शहा यांच्या नांदेडच्या सभेतून महाराष्ट्रात भाजपचा नंबर एकचा शत्रू हा ठाकरेची शिवसेना असणार हे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com