Beed Politics News : दुसऱ्या पुतण्याला गळाला लावत अजितदादा संदीप क्षीरसागरांची डोकेदुखी वाढवणार !
NCP News : राज्यातील काका-पुतण्याच्या राजकारणाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा बीडमधील जयदत्त क्षीरसागर- संदीप क्षीरसागर यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या दोघांमधील वैर संपुर्ण मराठवाड्याने पाहिले आहे. (Beed Politics News) संदीप क्षीरसागर यांनी नगरपरिषद निवडणूकीपासूनच काकांच्या साम्राज्याला हादरे द्यायला सुरूवात केली. पुढे विधानसभा निवडणुकीत काकांचा पराभव करत संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या राजकारणालाच उतरती कळा लावली. आता क्षीरसगारांचे दुसरे पुतणे डाॅ. योगेश क्षीरसागर यांना पक्षात घेत अजित पवारांनी आमदार संदीप क्षीरसागरांची डोकेदुखी वाढवण्याची खेळी केली आहे.
क्षीरसागर यांच्या घरातून जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर हे देखील राष्ट्रवादीत अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. या निमित्ताने क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे देखील काकांना सोडून वेगळी वाट निवडतांना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीतील बंडात (Beed News) बीड जिल्ह्यातील चार पैकी तीन आमदार अजित पवारांसोबत गेले असतांना संदीप क्षीरसागर मात्र शरद पवारांसोबतच राहिले.
एवढेच नाही तर १७ रोजी पवारांची बीडमध्ये रेकाॅर्डबेक्र सभा घेत त्यांनी आपली ताकदही दाखवून दिली. शरद पवारांच्या सभेनंतर २७ रोजी (Ajit Pawar) अजित पवारांची बीडमध्ये सभा होत आहे. त्याआधीच योगेश क्षीरसागर (NCP) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मागच्या महिनाभरापासून कन्फ्यूजन मोडवर असलेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या `थांबा - वाट पहा`, च्या निर्णयानंतरही त्यांनी आगामी एक-दोन दिवसांत प्रवेश करण्याचे पूर्ण नियोजन केले आहे. त्यामुळे बीडमध्ये आता आणखी एक काका-पुतणे अंक सुरु होणार आहे.अजित पवारांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एंट्रीनंतर अनेकांच्या राजकीय वाटेत गतिरोधक निर्माण झाले आहेत. मात्र, या समिकरणामुळे जिल्ह्यात नवा पर्याय समोर आला आहे.
२०२४ च्या विधानसभेचा विचार करुन थांबा, वाट पहा असे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे धोरण आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून त्यांचे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर गोंधळले होते. मागच्या महिन्यात त्यांचा प्रवेशाचा निश्चित झालेला प्लॅन व मुहूर्त यातून पुढे ढकलला गेला. मात्र, रविवारी या काका-पुतण्यांच्या बैठकीनंतर डॉ. क्षीरसागर यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.
आगामी एक-दोन दिवसांत डॉ. योगेश क्षीरसागर मुंबईत आपल्या समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश करतील. त्यानंतर २७ ऑगस्टच्या पवारांच्या सभेच्या तयारीच्या प्रक्रीयेत एंट्री करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणातील हुकमी अशी क्षीरसागर घराण्याची ओळख आहे. दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील मातब्बरांशी दोन हात करत आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. दुसऱ्या पिढीत जयदत्त क्षीरसागर विधीमंडळ, डॉ. भारतभूषण क्षीरसागर नगर पालिका, रविंद्र क्षीरसागर जिल्हा परिषद व गजानन कारखाना अशा त्यांच्या अंतर्गत अलिखीत राजकीय वाटण्या होत्या.
परंतु, आमदार संदीप क्षीरसागर यांना याच वाटण्या पसंत पडल्या नाहीत आणि त्यांनी जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना २०१७ च्या नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने थेट आव्हान दिले. संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र राजकीय सुरुवात केली. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपमार्गे शिवसेनेची वाट धरल्याने संदीप क्षीरसागर यांची राष्ट्रवादीची वाट मोकळी झाली. दरम्यान, शिवसेनेत (उबाठा) असतानाही नगर पालिका हद्दीतील विकास कामांचे भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर पक्षातून काढून टाकले.
आता माजी मंत्री क्षीरसागर पक्षाविना आहेत. त्यांच्या भाजप एंट्रीला भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा नकार असला तरी त्यांनाही आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची खात्रीशिर माहिती आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेतल्या अजित पवार गटात जाण्याऐवजी थांबा वाट पहा, असा संदेश पुतणे योगेश क्षीरसागर यांच्यासह समर्थकांना दिला. मात्र, वाट पाहत बसण्यापेक्षा आगामी २५ वर्षांच्या राजकीय भवितव्याचा विचार आणि आता सत्तेच्या माध्यमातून बीड शहरातील विकास कामे डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या डोळ्यासमोर आहे.
त्यामुळे स्थानिक पातळीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे व राज्यात अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. सुरुवातीलाच बबन गवतेंनी मंत्री धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली एंट्री करुन पहिला क्रमांक पटकावत विधानसभेच्या आखाड्यात संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. योगेश क्षीरसागर यांच्याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गट नगर पालिकेबाबत सकारात्मक आहे. त्यांचे वडिल डॉ. भारतभूषण क्षीरसागर मागील ३० वर्षांपासून नगर पालिकेवर वर्चस्व ठेवून असून अपवाद वगळता पालिकेची सत्ता कायम क्षीरसागर यांच्याकडे आहे. आता डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शहर व पालिका राजकारणाची सुत्रे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागरांच्या हाती दिलेली आहेत.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.