Beed News : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील वैद्यनाथ देवस्थानच्या विकासासाठी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वैद्यनाथ देवस्थानच्या 286.68 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला मान्यता दिली आहे.
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या तसेच परळीचे ग्रामदैवत असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा मूळ आराखडा हा 133 कोटींचा होता. मात्र, मंदिरात दगडी भिंती बांधून जीर्णोद्धार करणे, यात्री प्रतीक्षालय अशी एकूण 92 कामे करावयाची असून, या कामांची किंमत अनेक पटींनी आता वाढली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या सूचनेनुसार बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाचा सुधारित आराखडा सादर केला होता. धनंजय मुंडे यांच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे.
काही शतकांपूर्वी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्याच धर्तीवर आता नव्याने जीर्णोद्धार व विकास व्हावा, मेरू पर्वत, प्रदक्षिणा मार्ग विकसित व्हावा, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थळ मंदिरांसह परिसरातील अन्य सर्व मंदिरांचेही संवर्धन व्हावे, यादृष्टीने हा विकास आराखडा मंजूर होणे,अत्यंत आवश्यक असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
जुन्या मंदिरांना रंग न देता त्यांना दगडासारखा रंग द्यावा, मंदिराची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी मंदिर समितीसह परळी नगरपरिषदेने घ्यावी, तसेच ठिकठिकाणी दाट सावली देणारी झाडे लावावीत, पाय घसरणार नाहीत अशा फरशांचा वापर पायऱ्यांमध्ये करावा, अशा सूचना या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी या 286. 68 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता दिल्याचे सांगितले. या वेळी मुख्य सचिव मनोज सैनिक, नगर विकास तसेच वित्त व नियोजन विभागाचे सचिव, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे सचिव त्याचबरोबर विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड (ऑनलाइन), बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते वाल्मीक कराड, मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, नगर अभियंता बेंडले, आर्किटेक्ट कृष्णकुमार बांगर आदी उपस्थित होते.
दरम्यान, धनंजय मुंडे हे निस्सीम शिवभक्त म्हणून परिचित आहेत. परळीत असल्यानंतर प्रत्येक दिवशी न चुकता वैद्यनाथ मंदिरात जाऊन प्रभू वैद्यनाथांचे पूजन-दर्शन केल्यानंतरच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. मंदिराच्या विकासाचा आराखडा हा त्यांच्या भक्तीला मिळालेला आशीर्वाद असल्याचे समर्थकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.