AIMIM News : छत्रपती संभाजीनगर महापालिका एमआयएम पक्षाच्या प्रचाराची धुरा पक्षाचे प्रमुख असदुद्दीन आणि अकबरुद्दीन या दोन ओवैसी बंधूंनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. जाहीर सभा आणि गल्लीबोळात पदयात्रा काढत ओवैसी मतदारांना आवाहन करताना दिसत आहेत. महापालिका निवडणुक प्रचाराच्या शेवटच्या दिवसात ओवेसी यांनी त्या भागाला भेटी दिल्या जिथे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की झाली, काळे झेंडे दाखवण्यात आले आणि जिथे त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला झाला.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती एमआयएमची. निवडणुकीत उमेदवारी जाहीर केल्यापासून इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्याविरोधात वातावरण तयार झाले होते. गेली कित्येक वर्ष त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे साथीदारच त्यांच्यावर गंभीर आरोप करत होते. पंधरा लाखात तिकीट विकलेले, दलालांना उमेदवारी आणि वफादारांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप इम्तियाज यांच्यावर झाला.
यातूनच प्रत्यक्षात जेव्हा प्रचाराला सुरूवात झाली तेव्हा इम्तियाज जलील यांना जिन्सी, रोशनगेट, शहागंज, बक्कलगुडा भागात मोठा विरोध झाला. उमेदवारी नाकारलेले जे इच्छूक काँग्रेस, वंचित, अपक्ष किंवा स्वतःचे पॅनल तयार करून लढत आहेत, त्या भागात एमआयएमने प्रचारालाच येऊ नये, असे प्रयत्न झाले. यातूनच वादावादी, प्रचार रॅली दरम्यान धक्काबुक्की, काळे झेंडे दाखवले गेले. बक्कलगुडा भागात तर इम्तियाज जलील यांच्या गाडीवर 25 ते 30 जणांनी हल्ला चढवला होता.
असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) अकबरुद्दीन ओवैसी या दोघांनी आमखास मैदानावर सभा घेत आपल्या शैलीत विरोधकांना अंगावर घेतले. आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना ओवैसी यांनी इम्तियाज जलील यांना ज्या ज्या भागात विरोध झाला, काळे झेंडे दाखवले गेले, धक्काबुक्की झाली आणि जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाला, तिथेच पदयात्रा काढली.
इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाल्यानंतर एमआयएमच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या पदयात्रा, सभांच्या ठिकाणी पोलीसांचा मोठा बंदोबस्त दिला जात आहे. असे असले तरी हल्ले, काळे झेंडे दाखवले तरी आम्ही घाबरणार नाही, हे सांगण्यासाठी ओवैसींनी आवर्जून या भागांना भेटी दिल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.