
Bhokar VidhanSabha Constituency News : लोकसभा निवडणुकीपुर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भोकर विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी भाजपकडून मिळालेली राज्यसभेची खासदारकी स्वीकारली.
आता भोकर या आपल्या पारंपारिक मतदारसंघात राजकीय वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी कन्या श्रीजया हिला विधानसभा निवडणुकीत उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्यात अडचण येणार नाही, कारण अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाआधीच हे ठरले होते, असे बोलले जाते.
विरोधकांनी कितीही टीका केली तरी महायुती सरकार त्यांना न जुमानता राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेऊन आले. एवढच नाहीतर पात्र लाडक्या बहिणीच्या बॅंक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमाही केले आणि ही योजना यशस्वी करून दाखवली. आज राज्यातील बहुतांश मतदारसंघात या योजनेच्या शुभारंभाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी आपल्या पारंपारिक भोकर विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम आज घेतला.
या शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या(VidhanSabha Election) पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचा धडका देखील सुरू केला आहे. हे पाहता अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेक्षा माझी लाडकी मुलगी आमदार होते की नाही? याची काळजी अधिक असल्याचे बोलले जात आहे. भोकरमध्ये संत सेवालाल महाराज स्मारक व सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात समाजाच्यावतीने अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांना आमदार म्हणून निवडून देण्याची ग्वाही, यावेळी देण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) मुद्यावरून स्वतःच्याच मतदारसंघात विरोधाला सामोरे जावे लागल्यानंतर अशोक चव्हाण मुलीच्या बाबतीत अधिक सतर्क झाले आहेत. कुठलीही जोखीम न पत्करता आपल्या आमदार आणि मंत्री पदाच्या काळात ज्या ज्या समाजाला आश्वासने दिली होती, ती पूर्ण करता आली नसली तरी त्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण यांच्याकडून सध्या जोरात सुरु आहे. भोकर येथील संत सेवालाल स्मारक आणि सभागृह हा त्याचाच एक भाग आहे.
याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत भोकर मतदारसंघात विविध विकास कामांचे लोकार्पण आणि नव्या योजनांचे भूमिपूजन करत अशोक चव्हाण यांच्याकडून सोशल इंजिनिअरिंगचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेत भरण्यात आलेल्या अर्जांनंतर पात्र महिला लाभार्थ्यांना थेट बॅंक खात्यात पैसे जमा झाल्याने त्याचाही फायदा विधानसभा निवडणुकीत मुलीच्या विजयासाठी होईल, अशी अपेक्षा चव्हाण बाळगून असल्याचं बोललं जात आहे.
तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी अशोक चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघात घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशावेळी अशोक चव्हाण यांनी आपली ताकद दुपटीने वापरायला सुरुवात केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.