NCP Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आमदार झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांची गाडी नांदेडमध्ये सुसाट निघाली आहे. दर महिन्याला भव्य प्रवेश सोहळे घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, महापौर, नगरसेवकांना पक्षात प्रवेश देत नांदेडमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपले वर्चस्व वाढवले.
पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चिखलीकरांना फ्री हॅन्ड देत पक्ष वाढीसाठी बळ देण्याचे धोरण स्वीकारले आहे. नुकताच चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी नांदेड जिल्ह्यातील अन्वर अली खान या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. अन्वर खान यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून मटका किंग अशी त्यांची नांदेडमध्ये ओळख असल्याचा आरोप केला जात आहे. मकोकासारखे गंभीर गुन्हे खान यांच्यावर प्रस्तावित असल्याचाही दावा केला जात आहे. या संदर्भात भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. मी अजित पवारांना दोष देत नाही. स्थानिक नेतृत्वाने त्यांना अंधारात ठेवून प्रवेश देणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी या प्रवेशावरून चिखलीकर हे अजित पवारांची दिशाभूल करत असल्याचा अप्रत्यक्षरित्या आरोप करत त्यांना खिंडीत गाठल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. मी अजित पवारांना दोष देत नाही, स्थानिक नेतृत्वाने अजित पवारांना न सांगता प्रवेश देणे हे चुकीचे असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. कोणत्याही पक्षाने गुन्हेगारांना प्रवेश देऊ नये, गुन्हेगारांना राजाश्रय मिळून ते लोकांवर हावी होऊ लागले आहेत. अजित पवारांनी स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी केली पाहिजे, असे सांगत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर निशाणा साधला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणानंतर सर्वच राजकीय पक्षांनी दक्षता घेणे सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत अधिक सजग असल्याचे बोलले जाते. ते आपल्या प्रत्येक कार्यकर्ता मेळाव्यातून चारित्र सांभाळा, पक्षात प्रवेश देताना काळजी घ्या, असे आवाहन करताना दिसतात. कंत्राटदार, अवैध धंदे, दोन नंबरवाल्यांना पक्षात घेऊ नका, हे अजित पवार वारंवार सांगत असतात.
असे असताना त्यांच्याच पक्षातील एका आमदाराकडून मटका किंगला पक्षात प्रवेश कसा दिला जातो? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता हा संघर्ष अधिक बळावला आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांनी गेल्या दोन महिन्यात काँग्रेस पक्षाला मोठे धक्के दिले आहेत. अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर, पुतणे उदय चव्हाण यांच्यासह चार माजी आमदारांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे.
काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांचे नेतृत्व मान्य करणाऱ्या या सगळ्या माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्याने चव्हाण जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी चिखलीकर यांची गाडी मात्र सुसाट धावताना दिसत आहे. परंतु ती धावत असताना तिला ब्रेक लावण्याचे काम अशोक चव्हाण यांच्याकडून या निमित्ताने झाले आहे. मटका किंगला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याचा आरोप आणि त्यावरून अशोक चव्हाण यांनी संधी हेरत चिखलीकरांवर केलेला पलटवार त्यांना अडचणीचा ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.