Nanded LokSabha News : नांदेड जिल्हा हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळाली की नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार झालोच अशी धारणा झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या अलीकडील निकालांवरून नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल. या मतदारसंघातून जनता पक्षाच्या लाटेत दिवंगत शेकापचे नेते भाई केशवराव धोंडगे, जनता दलाचे डॉ व्यंकटेश काब्दे, भाजपचे डी. बी. पाटील व विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhlikar) हे निवडून आले आहेत.
महाराष्ट्रात मोदी लाटेत 2014 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात अशोक चव्हाण (Ashok Chavan) व हिंगोली लोकसभा मतदारसंघातून दिवंगत नेते राजीव सातव हे दोन खासदार निवडून आले होते. मात्र, हा दोनचा आकडाही 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला राखता आला नाही. नांदेडची जागा अशोक चव्हाण यांनी लढवली. त्यांचा पराभव खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. तसा हा चव्हाणांचा दुसरा पराभव. जनता दलाचे उमेदवार डॉ व्यंकटेश काब्दे या राजकारणात नवख्या असलेल्या उमेदवारांने त्यांचा पराभव करत घराणेशाहिला तडाखा दिला होता.
मात्र, गेल्या निवडणुकीत झालेल्या अशोक चव्हाण यांच्या पराभवाच्या चर्चा, आजही चर्चिल्या जातात. चव्हाण यांनी पराभवाचे आत्मचिंतन करुन काही सुधारणा केल्या आहेत. बेरजेचे राजकारण करत नायगाव, देगलूर, मुखेड या भागात पॅचअप करणे सुरू केले आहे. गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाणांचा पराभव दिल्लीपर्यंत गाजला. या पराभवाने काँग्रेसचे (Congress) सर्वच पदाधिकारी जमिनीवर आले.
1) त्यात मोदींची लाट 2019 मध्ये कायम राहिली. या लाटेचा फटका चव्हाणांना बसला.
2) चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. याचा मोठा फटाका देगलूर बिलोली, मुखेड, नायगाव भागात बसला.
3) भाजप (BJP) उमेदवार चिखलीकरांना या भागातून चांगले मताधिक्य मिळाले होते. हा फटका पुन्हा बसू नये म्हणून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांची घरवापसी करून घेत त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष चव्हाण यांनी केले आहे.
4) राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बापूसाहेब गोरठेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली व भाजपमध्ये प्रवेश केला. याचा मोठा फायदा भाजपला झाला. उमरी, नायगाव, धर्माबाद या तीन तालुक्यांत बापूसाहेब देशमुख गोरठेकरांचे मोठे वर्चस्व असल्याने चिखलीकरांना या भागातून मताधिक्य मिळाले होते. ही चूक सुधारत नूकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन निवडणूक लढविली आहे. याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
5) वंचित बहुजन आघाडी व एमआयएम आघाडीच्या फॅक्टरचा चव्हाणांच्या पराभवात मोठा वाटा आहे. काँग्रेसच्या हक्काची मते डॉ. यशपाल भिंगे यांना मिळाली. मतांच्या विभाजनाचा फायदा चिखलीकरांना फायदा झाला. भोकर विधानसभा हा चव्हाणांचा मतदारसंघा. या मतदारसंघातून काँग्रेसला खूप मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. पण झाले उलटेच. या मतदारसंघातून फक्त पाच हजारांचे मताधिक्य मिळाले. तर मुखेड हीच परिस्थिती होती. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगली आघाडी मिळाली होती.
काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेही भ्रमात होते. आमच्या साहेबांचा पराभव होतच नाही असे सांगत निवांत होते. ज्यांना काँग्रेसचा लाभ मिळाला असेच लाभार्थी चव्हाणांच्या अवतीभवती फिरत होते. जनसामान्यांच्या अडचणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात नव्हते. ठराविक चौकडी त्यांच्या भोवती फिरत होती. या चोकडीला भेदुन चव्हाणांना भेटावे लागणे त्यामुळे एकदा बदल करायचा हा संदेश मतदारसंघात गेला. या व इतर कारणांमुळे चव्हाणांचा पराभव झाला. या झालेल्या सर्व चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून माजी चव्हाण गेल्या साडेचार वर्षात प्रयत्न करीत आहेत. येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची व माजी चव्हाणांची कसोटी लागणार असुन मागे झालेल्या चुका टाळून विजय संपादन करावा लागणार आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.