Auranbagad Lok Sabha Constituency : भुमरे एकटेच लढले अन् जिंकले; मराठवाड्यात महायुतीची पत राखली !

Sandipan Bhumre win lok sabha election 2024 : शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर बुथ स्तरावरील यंत्रणा ठाकरे गटाकडे असल्याने संदीपान भुमरेंची काही अडचण झाली होती. पण देशात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असल्याने ही जागा आपल्याला न सुटल्याची नाराजी बाजूला सारून भाजपने भुमरे यांना भक्कम साथ दिली.
Sandipan Bhumre
Sandipan BhumreSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील सत्ताधारी महायुतीची पत राखण्याचे काम एकमेव लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये निवडून आलेल्या संदीपान भुमरे यांनी केले. मराठवाड्यात भुमरे यांना विजय मिळाल्याने महायुतीची अब्रु काही प्रमाणात वाचली आहे. मराठवाड्यातून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले जालनातील दिग्गज भाजप नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडमध्ये भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री पंकजा मुंडे, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण-चिखलीकर जोडी असे महारथी धारातीर्थी पडले. पण संभाजीनगरात मात्र भुमरेमामांनी किल्ला नेटाने लढवला आणि जिंकलाही.

उशीरा उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही मिळालेल्या कमी वेळात संदीपान भुमरे यांनी आपल्या पैठण विधानसभा मतदारसंघातील पाच वेळा निवडून येण्याचा अनुभव पणाला लावत आपली यंत्रणा कार्यन्वित केली. मतदारसंघाबाहेर जाऊन तयारी करणे कुठल्याही उमेदवाराला सोपे नसते, पण संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने भुमरे यांचे हे काम काहीसे सोपे झाले.

शिवसेना (ShivSena) पक्षात फुट पडल्यानंतर बुथ स्तरावरील यंत्रणा ठाकरे गटाकडे असल्याने भुमरेंची काही अडचण झाली होती. पण देशात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असल्याने ही जागा आपल्याला न सुटल्याची नाराजी बाजूला सारून भाजपने भुमरे यांना भक्कम साथ दिली. संभाजीनगरची जागा भाजपलाच सुटणार आणि आपल्याला ती जिंकायचीच याची पूर्ण तयारी करत भाजपने संघटनात्मक बांधणी भक्कम केली होती.

निवडणुकीआधीच 12 लाख मतदारांपर्यंत भाजपची यंत्रणा पोहचली होती. या सगळ्या तयार यंत्रणेचा फायदा संदीपान भुमरे यांना झाला. संघटनात्मक जबाबदारी भाजपने सांभाळली तर त्यांना हवी असलेली रसद पुरवण्यात भुमरेंनी कुठेही हात आखडता घेतला नाही. त्यामुळे शहर-ग्रामीण अशा जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातून भुमरेंना मताधिक्य मिळाले. परिणामी शिवसेना शिंदे गटाला अनपेक्षित मताधिक्याने विजय मिळवता आला. शिवसेना ठाकरे गटाला पक्ष फुटीची सहानुभूती असताना भुमरे यांनी संभाजीनगरची जागा 1 लाख 35 हजाराच्या मताधिक्याने जिंकत सगळ्यानाच आश्चर्याचा धक्का दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या झालेल्या पराभवाचा बारकाईने अभ्यास केला.

Sandipan Bhumre
Jalna Lok Sabha 2024 Constituency : मराठा फॅक्टर, पक्षांतर्गत गटबाजीने रावसाहेब दानवेंचा घात...

संभाजीनगरात सक्षम मराठा (Maratha) उमेदवार दिला तर तो निवडून येईल याचा अंदाज आल्याने भाजपशी संघर्ष करत एकनाथ शिंदेंनी संभाजीनगरची जागा शिवसेनेसाठी सोडवून घेतली. मराठा मतांमध्ये कुठल्याही प्रकारे विभाजन होणार नाही याची काळजी घेतली.त्यामुळे भुमरे यांना एकगठ्ठा मतं मिळाली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुती सरकार विरोधात असलेल्या रोषाचा फटका मराठवाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला. पण संभाजीनगरात भुमरेंना मात्र मराठा फॅक्टरचा प्रचंड फायदा झाला.

संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संदीपान भुमरे यांनी महायुतीच्या आमदारांना मतदारसंघातील विकासकामांसाठी दिलेल्या भरघोस निधीचा बुस्टर डोस त्यांच्या पथ्यावर पडले. सगळ्या आमदारांनी भुमरे च्या विजयासाठी ताकद लावत त्यांना आपापल्या मतदारसंघात मताधिक्य मिळवून दिले. मराठवाड्यातील आठ पैकी फक्त संभाजीनगर मतदारसंघात महायुतीला विजय मिळवता आला. त्यामुळे याची चर्चा राज्यभरात होताना दिसते आहे. भुमरे यांनी महायुतीची लाज राखली, असे या निमित्ताने म्हणावे लागेल.

(Edited by : Chaitanya Machale)

Sandipan Bhumre
Jalna Lok Sabha 2024 Constituency : मराठा फॅक्टर, पक्षांतर्गत गटबाजीने रावसाहेब दानवेंचा घात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com