Vidhan Parisad : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषदेतील आमदार सचिन आहिर (Sachin Ahir) यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना सभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांच्यासह इतर सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी काही सदस्यांना थोडक्यात आपल्या भावना व्यक्त करण्याची परवानगी देण्यात आली होती. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सचिन आहिर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांनाच तुम्ही वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून या आणि मंत्री व्हा, अशा शुभेच्छा दिल्या.
यावर सचिन आहिर यांनी हात जोडत स्मित हास्य केले. वरळी विधानसभा मतदारसंघ हा गेल्या निवडणुकीत सचिन अहिर यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासाठी सोडला होता. (Shivsena) आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यात देखील अहिर यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे विरोधकांनी वाढदिवसांच्या शुभेच्छा देतांना देखील अहिर यांची कोंडी केल्याचे पहायला मिळाले.
आमदार मनिषा कायंदे यांनी सर्वप्रथम अहिर यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सभापती निलम गोऱ्हे आणि मग प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दिपक केसकर, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी शुभेच्छा देतांना अहिर यांना चिमटे काढले. दरेकर यांनी वरळी विधानसभेतून आमदार व्हा, मंत्री व्हा, अशा शुभेच्छा दिल्यानंतर उदय सामंत यांनी देखील त्यांचीच री ओढली.
दरेकर यांच्या मताशी मी देखील सहमत आहे, लवकरच तुम्ही वरळीमधून निवडून या, तुमच्या हातून कामगारांच्या हिताचे काम होवो, अशा शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे म्हणाले, सचिन अहिर ज्या पक्षात गेले तिथे त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. ते राष्ट्रवादीत असतांना त्यांचे शरद पवारसाहेबांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवसेनेत गेल्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यांशी त्यांचे विश्वासाचे संबंध आहेत. त्यामुळे ते सध्या जिथे आहेत, त्यांनी तिथेच राहावे, निष्ठेने काम करावे, याचे त्यांना निश्चितच फळ मिळेल, अशा शब्दात शुभेच्छा देत चिमटे काढले.
शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मी आणि सचिन भाऊ एकत्र काम करत होतो, मी जिथे जिथे जातो तिथे ते येतात. मी राष्ट्रवादीत होतो, तेव्हा ते सोबत होते, नंतर शिवसेनेत गेलो, तिथेही ते आले. आता मुळ शिवसेना आमच्याकडे आहे, तेव्हा त्यांनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ हलके-फुलके झाले होते. मला सभागृहात यायला बरीच वर्ष वाट पहावी लागली, अशी खंत सचिन अहिर यांनी शुभेच्छांचा स्वीकार करतांना बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.