

Beed Court News : बीड जिल्हा न्यायालयाच्या इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे सोमवारी दुपारी संपूर्ण न्यायव्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली. या अत्यंत गंभीर धमकीच्या ईमेलनंतर तातडीने हालचाली करत पोलिसांनी संपूर्ण न्यायालय परिसर खाली करून कसून तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज (०२ नोव्हेंबर २०२६) रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी कोर्ट बिल्डिंग बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर प्राप्त झाली.
ही अत्यंत संवेदनशील माहिती समोर येताच न्यायालयाच्या वतीने तातडीची सूचना जारी करण्यात आली. न्यायालय इमारत किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्य वस्तू आढळल्यास तात्काळ बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, सचिव, प्रबंधक, कोर्ट मॅनेजर तसेच पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले. धमकीचा ईमेल येताच बीड पोलीस दल तातडीने ॲक्शन मोडवर आले.
अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्यासह पोलीस पथक, बॉम्ब शोध व नाशक पथक (बीडीडीएस) आणि एलसीबीचे पथक तातडीने जिल्हा न्यायालयात दाखल झाले. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण न्यायालय परिसर आपल्या ताब्यात घेत प्रत्येक कोपऱ्याची, तसेच वाहनांची आणि कार्यालयांची कसून तपासणी सुरू केली आहे.
दरम्यान, हा धमकीचा ईमेल नेमका कुठून आणि कोठून पाठवण्यात आला? याचा तांत्रिक माग काढण्यासाठी सायबर विभागाकडून युद्धपातळीवर तपास सुरू आहे. ईमेल पाठवणाऱ्याचा आयपी अड्रेस शोधून त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे काम सुरू असून, सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बीड जिल्हा न्यायालयाच्या ईमेलवर इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच, आम्ही तातडीने पोलीस फौजफाट्यासह आणि बॉम्ब शोध पथकासह न्यायालयात दाखल झालो. सध्या संपूर्ण न्यायालय परिसर खाली करून कोपरा न कोपरा अत्यंत काटेकोरपणे तपासण्यात येत आहे. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांनी या काळात न्यायालयाच्या इमारतीपासून दूर राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.