

Beed News : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. बीड जिल्ह्यात केलेल्या कारवाईत एफडीचेच्या पथकाने भेसळयुक्त तेल तयार करणाऱ्या चार कंपन्यांना टाळे ठोकत त्यांचे परवाने निलंबित केले आहे.
या कारवाईत तब्बल 1 कोटी 91 लाखांचे बनावट आणि भेसळीचे लाखो लीटर खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसीसह वडवणी, माजलगावात ही छापेमारी करण्यात आली. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात आतापर्यंतची केलेली ही सर्वात मोठी आणि धडक कारवाई आहे.
सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत 6 आणि 7 ऑगस्ट रोजी एमआयडीसी बीड, वडवणी आणि माजलगाव येथे टाकलेल्या छाप्यात 1 कोटी 91 लाख 31 हजार 242 रुपयांचे 1 लाख 18 हजार 940 किलो निकृष्ट व भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.
बीड एमआयडीसीतील मे. स्वागत ऑईल इंडस्ट्रीज आणि मे. चरखा ऑईल मिल येथे एफडीएच्या पथकाने छापा टाकला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सोयाबीन आणि पामतेलाच्या एकाच टाकीतून ऑईल पॅक करून त्यावर रिफाइंड आणि अल्ट्रा रिफाइंड असे छापून ग्राहकांची फसवणूक केली जात होती.
तसेच जुन्या, गंजलेल्या डब्यांचा पुनर्वापर, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने साठवण केलेल्या टाक्या, इन-हाऊस लॅबचा अभाव आणि कसलेही फूड ग्रेड प्रमाणपत्र नसणे अशा गंभीर त्रुटी या छाप्यात आढळल्या. स्वागत ऑईलमधून 1.05 कोटी, तर चरखा ऑईलमधून 78.22 लाखांचा साठा जप्त केला गेला.
कारवाईचे हे सत्र केवळ एमआयडीसीपुरते मर्यादित न राहता वडवणी येथील जय हनुमान ट्रेडर्स (7.24 लाखांचे तेल जप्त) आणि माजलगावच्या जुना मोंढा येथील मे. जान्हवी कमर्शियल्स (2.79 लाखांचे सुट्टे तेल जप्त) पर्यंत पोहोचले. माजलगावात बंदी असलेले सुट्टे सोयाबीन तेल अत्यंत असुरक्षितपणे विकले जात होते.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी घोपे, मुळे, गाढे, खंदारे, दत्तू व पथकाने ही कारवाई केली. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या चारही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करून दुकाने पूर्णपणे सील (बंद) करण्यात आली आहेत. नामांकित ब्रँड्सचे एकूण 26 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.