बीड : परळी विधानसभा मतदार संघातून पराभवानंतर राज्यसभा आणि विधान परिषदेचा विषय आला कि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंचे (Pankaja Munde) नाव चर्चेत येते आणि ‘पुन्हा टाळले’अशा हेडींग होतात. मात्र, आता जिल्ह्यात ठाण मांडून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकांची मोट बांधून त्यांनी आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत चमक दाखविली तर पक्षालाच त्यांची दखल घ्यावी लागेल. पंकजा मुंडे आता पुढची वाटचाल कशी करतात हे पहावे लागेल.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण हा प्रमुख मुद्दा असणार आहे. मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षण मिळाले असून महाराष्ट्रात अद्याप अधांतरीच आहे. (Beed) मास लिडर असलेल्या पंकजा मुंडे भाजपमधील (Bjp) प्रमुख ओबीसी चेहरा मानल्या जातात. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाकडून या विषयावर राळ उठविण्यासाठी त्यांचा पक्षाला अधिक फायदा झाला असता. त्यांच्या आमदारकीमुळे त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांना देखील मोठा हुरुप आला असता.
त्यामुळे या खेपेला त्यांना विधान परिषद मिळेल, असे गणित मांडले जात होते. मात्र, पुन्हा त्यांचे नाव टळले. दरम्यान, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सक्षम राजकीय वारसा असलेल्या पंकजा मुंडे देखील मास लिडर आहेत. त्या आक्रमक, हजरजबाबी व स्पष्टवक्त्या देखील आहेत. काही वेळा त्यांचा स्पष्टवक्तेपणाही त्यांची अडचण ठरतो. या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरी त्या त्यांचे होमपिच असलेल्या जिल्ह्यातील संपर्काबाबत कमी पडतात हेही तेवढेच खरे.
पक्षातील एक गट त्यांचे राजकीय खच्चीकरण करतो, त्यांच्या समर्थकांची राज्यसभा आणि विधान परिषदेवर वर्णी लाऊन त्यांच्यापसून दुर करतो, त्यांच्या नावाला फुली मारतो असा त्यांच्या समर्थकांचा कायमचा आरोप आहे आणि यात तथ्य देखील आहे. मात्र, याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना होत नाहीत हेही तेवढेच खरे. पंकजा मुंडे यांना स्वत:चा मतदार संघ आहे. जिल्ह्यात आणि राज्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
राजकीय इतिहासावर नजर मारली तर मास लिडर नसलेल्या आणि स्वत:चा मतदार संघ नसलेल्यांनाचा बहुतेक वेळा विधान परिषद आणि राज्यसभेवर संधी दिली जाते. खुद्द दिवंगत गोपीनाथ मुंडे, बाजूच्या जिल्ह्यातील विलासराव देशमुख यांच्यासह केशरबाई क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवानंतर देखील त्यांना अशी काही संधी मिळाली नव्हती हेही लक्षात घेण्याची गरज आहे. पंकजा मुंडे यांनी पुन्हा ठाण मांडून जिल्ह्याच्या राजकारणात आपली कमांड दाखविली तर पक्षालाच त्यांची दखल घ्यावी लागेल.
उद्या त्यांच्यासाठीच काय तर त्यांच्या समर्थकांना राज्यसभा आणि विधान परिषदेवर घ्या, असा आग्रह त्या धरु शकतात. एकिकडे गोपीनाथ मुंडे यांची जयंती, पुण्यतिथी किंवा दसरा मेळावा अशा कार्यक्रमांवेळी व्यासपीठावर पदाधिकाऱ्यांसह नेत्यांची मोठी दाटीवाटी असते. पण, पक्षातील एक गट पंकजा मुंडेंचे खच्चीकरण करत असताना ही नेतेमंडळी त्यांची बाजू कधी जोरकसपणे लाऊन धरतात का हा संशोधनाचा विषय आहे. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांबाबत बोलायचे झाले तर त्या मंत्री असल्यापासून त्या आल्यानंतर त्यांच्या समोर घसा ताणून घोषणा देणारी मंडळीच त्यांची अनेकदा राजकीय दिशाभूल करते हे समोर आले आहे.
हीच गत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याबाबतही होते, त्यांच्याभोवतीही कायम ‘दबंग खासदार’म्हणणारे ठराविक कोंडाळेच असते. त्यांच्याच म्हणण्यावर राजकीय वाटचाल करताना या वाट दाखविणाऱ्या मंडळींची राजकीय ताकद देखील समजून घेण्याची गरज डॉ. मुंडे यांनाही आहे. आता आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी नवी इनिंग सुरु करायला हरकत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील अनेक नेते आपापल्या भागात राजकीय ताकद असलेली आहेत. आता हा पक्ष सत्तेत आहे. पण, पक्षात सर्वकाही अलबेल आहे असेही नाही. पंकजा मुंडे व जिल्ह्यातील भाजपबाबत विचार केला तर आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुका म्हणाव्या तेवढ्या सोप्या नाहीत. आजघडीला होणाऱ्या नगर पालिकांपैकी परळी, माजलगाव, अंबाजोगाई व बीड नगर पालिकेवर भाजप विरोधी पक्षांची सत्ता आहे. तर, धारुर व गेवराईत केवळ भाजपची सत्ता आहे.
जिल्हा परिषद देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. आतापर्यंतच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार केला तर भाजपला स्वत:च्या ताकदीवर कधीच जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविता आलेली नाही. विशेष म्हणजे मागच्या वेळी पंकजा मुंडे राज्यात याच ग्रामविकास खात्याच्या मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री असतानाही भाजपला ६० पैकी फक्त २० जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता भविष्याचा विचार केला तर जिल्हा परिषद आखाड्यातील राजकीय डावपेचात माहीर असलेले सुरेश धस, रमेश आडसकर यांच्यासह मतदार संघात ताकद असलेले लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा अशी मंडळीही आहे.
या सर्वांच्या साथीला त्यांनी आतापासूनच जिल्ह्यात ठाण मांडण्याबरोबरच राष्ट्रवादी विरोधकांची मोट बांधायला सुरुवात करण्याची गरज आहे. मग, जयदत्त क्षीरसागर, बदामराव पंडित यांच्यासह राजकारणात काहीच ‘वर्ज्य’नसते म्हणून विनायक मेटे अशांची सांगड घातली तर त्यांना नगर पालिका आणि जिल्हा परिषदेत चमक दाखविण्याची संधी आहे. त्यानंतर पक्षालाच खुद्द त्यांची दखल घ्यावी लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.