भोकरदन : भाजपचे आमदार संतोष दानवे हे महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत, असा दावा शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापुर्वी केला होता. पण त्याचा हा दावा पोकळ होता हे भाजपचा तिसरा उमेदवारही विजयी झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीला पाणी पाजल्यानंतर भोकरदन-जाफ्राबादचे भाजप आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांनी राज्यमंत्री सत्तार यांना टोला लगावला आहे. अपक्षांची मतं भाजपला मिळवून दिल्याबद्दल तुमचे अभिनंदन, अशी खोचक प्रतिक्रिया दानवे यांनी `सरकारनामा`,शी बोलतांना दिली.
राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी अब्दुल सत्तार यांनी आमदार संतोष दानवे हे महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत. (Marathwada) दानवेंचे मत म्हणजे माझ्या घरातलेच मतं आहे. मी त्यांच्या घरी जाऊन चहा पिऊन आलो आहे, सगळी सेटिंग झाली असून मी त्यांचे मत फोडणारच असा दावा, सत्तार यांनी केला होता. या दाव्यानंतर संतापलेल्या दानवे यांनी सत्तार यांना वेडाचे झटके येत आहेत, त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करून उपचारांची गरज असल्याची टीका केली होती.
एवढेच नाही तर आमच्या कुटुंबावर टीका केल्याशिवाय सत्तार यांचा दिवसच उजाडत नाहीत. आमच्यावर टीका करून ते मोठे होण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या कलगितुऱ्यानंतर काल राज्यसभेसाठी मतदान झाले आणि रात्री अनेक नाट्यमय घडामोडींनेतर पहाटे राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. तो महाविकास आघाडीला धक्का देणार होता. कारण शिवसेनेचे संजय पवार यांना पराभूत करून भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले.
त्यानंतर आमदार संतोष दानवे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना टोला लगावण्याची संधी हेरली. संतोष दानवे म्हणाले, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपक्षांची मते भाजपच्या पारड्यात टाकुन आमच्या तिसर्या उमेदवाराला विजयी केल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. भाजपच्या या विजयात अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून अदृश्य हात आमच्या कामाला आले.
देवेंद्र फडणवीस यांची राजकीय खेळी या राज्यसभा निवडणुकीत पूर्णपणे यशस्वी झाली असून महाविकास आघाडीच्या पराभवात सत्तार यांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एकंदरीत सत्तार जरी महाविकास आघाडीत असले तरी आतून ते आमच्याकडेच होते, असा दावाही संतोष दानवे यांनी केला. सत्तार यांचा इतिहास बघता ते मनाने एकीकडे तर प्रत्यक्षात दुसरीकडे असतात, असा जोरदार टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.