बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले असून अनेक दिग्गज नेत्यांचा हिरमोड झाला आहे.
या आरक्षणामुळे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप आणि योगेश क्षीरसागर यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता असून आगामी निवडणुकीला मोठा कलाटणी मिळू शकतो.
Local Body Election News : बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आरक्षणामुळे अनेकांची गणित बिघडली आहेत तर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना आरक्षणा नुसार उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांची तसेच संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर या भावंडांची प्रतिष्ठाही पणाला लागणार आहे.
लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीड (Beed) जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष भडकला होता. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा बीडमधून पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी झाले होते. महायुतीसाठी हा मोठा धक्का होता. विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेच संदीप क्षीरसागर निवडून आले. दरम्यान त्यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
त्यामुळे बीड जिल्ह्यातील भाऊबंदकीच्या राजकारणाचा पुढचा अंक आगामी नगरपरिषद निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. पंकजा आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे आता एकत्र असल्याने परळीसह बीड जिल्ह्यातील बहुतांश नगर परिषदेवर आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष आणि सत्ता असावी यासाठी ते आपली शक्तीपणाला लावणार आहेत. बीड जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्ये त्या त्या ठिकाणचे आमदार आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी तयारीला लागले आहेत.
स्थानिक पातळीवर युती आघाड्या करायच्या की नाही? याचा अद्याप निर्णय झालेला नसला तरी सर्वाधिकार स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे महायुती आणि महाविकास आघाडीच्या राज्यातील नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातही वेगळे प्रयोग समोर येऊ शकतात. बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महिला अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाले आहे. तर परळीमध्ये खुल्या वर्गातील महिलेसाठी हे पद आरक्षित आहे.
अंबाजोगाईचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी तर माजलगावमध्ये नागरिकांच्या मागास वर्गातून महिला आरक्षण जाहीर झाले आहे. गेवराई मध्ये खुल्या वर्गातून महिला आरक्षण तर धारूरमध्ये खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.आरक्षणामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची समीकरणे बदलली असून बीडमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीत गटबाजी निश्चित मानली जात आहे. खरी पंचाईत युतीमधील भाजप, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे.
मागील 30 वर्षे नगरपालिकेवर क्षीरसागरांची सलग सत्ता असून अपवाद वगळता नगराध्यक्षपदही डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडेच होते. विशेष म्हणजे, नगराध्यक्षपदाच्या कालावधीचा त्यांचा राज्यात विक्रम आहे. मागील निवडणुकीतील तिरंगी लढतीत डॉ. क्षीरसागर जनतेतून नगराध्यक्ष झाले. त्यांचे चिरंजीव डॉ. योगेश क्षीरसागर यांची विधानसभा थोडक्यात हुकल्याने ते स्वत: किंवा पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर यांच्यासाठी नगरपालिकेची पायाभरणी सुरू केली होती.
मात्र, या आरक्षण सोडतीने त्यांचा हिरमोड झाला. आता नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सारथ्य डॉ. क्षीरसागर यांच्याकडे राहणार की अमरसिंह पंडित सूत्रे हाती घेणार? हेही महत्त्वाचे आहे. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडील अनेक माजी नगरसेवकांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांची साथ सोडून अमरसिंह पंडित यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. या पक्षाकडून शेख निझाम, तय्यब शेख, विनोद मुळूक, फारुक पटेल आदींचाही हिरमोड झाला आहे.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी मागच्या निवडणुकीत काकू-नाना आघाडीकडून वडील रवींद्र क्षीरसागर यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यांनी वर्षभरापूर्वीच नगराध्यक्षपदाची उमेदवारी घरात देणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यांच्याकडून माजी आमदार सय्यद सलीम यांचेही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे स्वप्न भंगले आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनीही दोन वर्षांपासून नगराध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली होती.
भाजपसह घटक पक्षांना तयारीची गरज
महायुतीतील भाजपने जिल्हाभरात संघटन वाढविले असले तरी शहरात संघटन करण्यात भाजप मागे आहे. पक्षाला मानणारा मतदार असला तरी वॉर्डनिहाय नेते आणि शहराच्या नेतृत्वाची पक्षाकडे उणीव निश्चित आहे. त्यामुळे त्यांना युतीचा पर्याय स्वीकारणे फायदेशीर मानले जाते. तसेच सत्ताधारी शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसंग्राम, काँग्रेस, रिपाइं यांचेही संघटन मजबूत नसल्याने त्यांना इतर पक्षांसोबत युतीशिवाय पर्याय नाही.
अशी आहेत प्रमुख नावे
नव्या समीकरणांत स्मिता विष्णू वाघमारे, मीना भीमराव वाघचौरे, प्रेमलता चांदणे, जयश्री अजय सवाई, पूजा गणेश वाघमारे, पप्पू कागदे यांच्या पत्नी वा भावजय, विकास जोगदंड यांच्या पत्नी, शेख मुजीब यांच्या पत्नी तेजस्वी पारवे आदींसह इतर नावे इच्छुकांत आघाडीवर आहेत. स्मिता वाघमारे यांनी सभापतिपदासह उपनगराध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे. त्यांच्यासह पती विष्णू वाघमारे सहा वेळा सदस्य आहेत. भीमराव वाघचौरे यांनी देखील उपनगराध्यक्ष, सभापती म्हणून काम केलेले असून त्यांना पाच वेळचा अनुभव आहे. प्रेमलता चांदणे यांनीही सभापती म्हणून काम केलेले आहे.
प्रश्न: बीड जिल्ह्यात किती नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर झाले?
उत्तर: सहा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
प्रश्न: या आरक्षणामुळे कोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे?
उत्तर: पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप आणि योगेश क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
प्रश्न: या आरक्षणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
उत्तर: स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि आगामी निवडणुकीत नवे गठबंधन तयार होऊ शकते.
प्रश्न: नागरिक आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया कशी आहे?
उत्तर: अनेक कार्यकर्ते नाराज असून काही ठिकाणी विरोधी सूर दिसत आहेत.
प्रश्न: बीडमधील पुढील राजकीय दिशा कशी दिसते?
उत्तर: मुंडे विरुद्ध क्षीरसागर असा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.