Beed News: अजित पवारांनी बीडकरांना दाखवलेलं बारामती पॅटर्नचे स्वप्न कागदावरच राहणार? घोषणा केलेल्या योजना रखडल्या

Beed Development Projects : विकासाचे व्हिजन, धडपड असणारा नेता म्हणून दिवंगत नेते अजित पवार यांची राज्यभरात ख्याती होती.
Ajit Pawar Tour Beed News
Ajit Pawar Tour Beed NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Development Projects : विकासाचे व्हिजन, धडपड असणारा नेता म्हणून दिवंगत नेते अजित पवार यांची राज्यभरात ख्याती होती. एकदा त्यांनी सांगितलं म्हणजे काम होणारच असा त्यांचा खाक्या होता. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पदभार हाती घेतल्यानंतर शहर आणि जिल्ह्याचा विकास बारामती, पिंपरी-चिंचवडसारखा करण्याचा अजित पवारांचा मानस होता.

बीडचं पालकत्व स्विकारताच अजित पवारांनी शहरासाठी अनेक योजना आणल्या, त्यांची घोषणा केली तर काहींचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले. परंतू बारामती येथील एका विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांच्यासोबतच बीडचा बारामतीप्रमाणे विकास करण्याचे स्वप्नही गेले. बीड जिल्ह्यासाठी त्यांनी जाहीर केलेल्या योजनांची रखडलेली सद्यस्थिती पाहता बीडकरांचा भ्रमनिरासच होणार असे दिसते आहे.

बीड नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात येथील जनतेने दिली तीच मुळात अजित पवारांच्या आश्वासक चेहऱ्यामुळे. पण पुढे त्यांच्याच पक्षातील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक, नगराध्यक्ष, सभापती यांच्यात सुरू असलेले वाद पाहता हाच का अजित पवारांचा पक्ष असा प्रश्न निश्चितच पडतो.

Ajit Pawar Tour Beed News
Preity Zinta: अभिनेत्री प्रीती झिंटालाही तुकाराम मुंढेंच्या कामाची भुरळ! मुंढेच्या नावाचा मराठी कॅलिग्राफीचा टीशर्ट घालून अभिमानं मिरवलं

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यात लक्ष घालायला सुरूवात केली असली तरी त्यांना अद्याप बीड जिल्ह्यासाठी पुरेसा वेळ देता आलेला नाही. त्यांना असलेल्या मर्यादा पाहता बीडसाठी घोषित झालेल्या योजनांचे काय? असा प्रश्न निश्चितच पडल्याशिवाय राहत नाही.

अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री म्हणून घेतलेले निर्णय दोन प्रकारांत दिसतात—(१) प्रत्यक्ष निधी/प्रशासकीय मंजुरी मिळवून दिलेली कामे आणि (२) मोठ्या प्रकल्पांना दिशा देऊन प्रक्रिया सुरू केलेली कामे. यातील काही कामे पुढे सरकली आहेत, तर काहींना निधी मिळूनही निविदा/कार्यादेशाच्या पातळीवर विलंब आहे.

अजित पवारांच्या काळात घोषणा झालेल्या बीड विमानतळासाठी जागा निश्चिती व पूर्वव्यवहार्यता अभ्यासासाठी निधी पूर्वव्यवहार्यता व सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया हा पुढचा महत्त्वाचा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही. सी-ट्रिपल आयटी हा टाटा टेक्नॉलॉजीस एमआयडीसीच्या सहकार्याने होणारा १९६.२८ कोटींचा प्रकल्प भूमिपूजनानंतर पुढे नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र सुधारित 351 कोटी रूपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असून कामांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. बीड जिल्हा क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त २५ कोटींची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर २४.९५ कोटींच्या कामांना जुलै २०२६ मध्ये मंत्रिमंडळ मंजुरी मिळाली.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी ८.१९ कोटी निधी मंजूर असूनही ऑगस्ट २०२६ पर्यंत निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष काम सुरू झालेल नाही. बीड जिल्ह्यासाठी एकूण १३०० वर विकासकामांची घोषणा करण्यात आली होती. यात प्रामुख्याने महसूल भवनाचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले आहे. ग्रंथालय, सहकार भवनाचा प्रस्ताव व विकास आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष पुढील अंमलबजावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आरोग्य सुविधांच्या दृष्टीने कॅथलॅब, एमआरआय,माता-बाल रुग्णालय, डायलिसीस आदींचे काम वेगाने सुरू आहेत. या पैकी काही कामे पूर्णत्वास गेली असून त्यांचे लोकार्पण देखील झाले आहे. बीडमध्ये रेल्वे सुरू झाली असली तरी बीड-परळी हा टप्पा अद्याप अपूर्ण आहे. या कामासाठीचे भूसंपादन व विद्युतीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे.

बीडचे विमानतळ ड्रीम प्रोजेक्ट

बीडमधून विमानसेवा सुरू व्हावी हा अजित पवारांचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी सांगितले होते की, बीड विमानतळासाठी जागा निश्चिती आणि पूर्वव्यवहार्यता चाचणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यानंतर प्रकल्पाने प्रत्यक्ष प्रशासकीय टप्पा गाठला. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्वव्यवहार्यता अभ्यास पूर्ण झाला, त्यासाठी ४०.५३ लाख खर्च करण्यात आले.

त्यानंतर विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे OLS (Obstacle Limitation Surfaces) सर्वेक्षण मार्च २०२६ मध्ये पूर्ण झाले, त्यासाठी ४८.४९ लाख निधी उपलब्ध झाला. जमिनीच्या बाबतीत तीन गावांमधील एकूण ३०८.३२ हेक्टर जमीन प्रस्तावित आहे. ११७.०४ हेक्टर शासकीय आणि १९१.२८ हेक्टर खासगी जमीन यासाठी घेण्यात येणार आहे.

विमानतळ अजून प्रत्यक्ष बांधकामाच्या टप्प्यावर गेलेला नाही. मात्र हा केवळ घोषणेपुरता राहिलेला प्रकल्प नाही. पूर्वव्यवहार्यता आणि OLS सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता भूसंपादन, अंतिम तांत्रिक मंजुरी, प्रकल्प खर्च आणि पुढील प्रशासकीय मंजुरी हे निर्णायक टप्पे आहेत.

सी-ट्रिपल आयटी प्रकल्प

युवकांना तंत्रज्ञानाधारित कौशल्य प्रशिक्षण मिळावे म्हणून Tata Technologies आणि MIDC यांच्या सहकार्याने सुमारे १९६ कोटींचा ‘सी-ट्रिपल आयटी’ प्रकल्प उभारण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती. ऑगस्ट २०२५ पर्यंत या प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले होते. प्रकल्प अजित पवारांच्या निधनानंतरही रद्द झालेला नाही. त्यांच्या उत्तराधिकारी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनीही त्यांच्या विकास आराखड्याची कामे पुढे नेण्याची भूमिका घेतली आहे.

बीड जिल्हा क्रीडा संकुल

अजित पवारांनी बीड जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देऊन त्याच्या विस्तारासाठी २५ कोटींचा अतिरिक्त निधी देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर या कामाला आणखी एक प्रशासकीय टप्पा पार करावा लागला. जुलै २०२६ मध्ये मंत्रिमंडळाने २४.९५ कोटींच्या कामांना अंतिम मान्यता दिली. यापूर्वी क्रीडा संकुलाला ८ कोटी निधी वितरित झाला आहे. निधी मंजुरीच्या दृष्टीने हा अजित पवारांच्या निर्णयांपैकी पुढे गेलेला प्रकल्प म्हणता येईल.

Ajit Pawar Tour Beed News
Amruta Fadnavis: अमृता फडणवीस येणार, त्याआधीच पुरातत्त्व विभागाची नोटीस! संरक्षित शिवलिंगाच्या बांधकामावर आक्षेप, ‘काम थांबवा’चे आदेश

निधी मंजूर, पण काम रखडले

बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरुस्तीची मागणी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे ठरवले. जानेवारी २०२६मध्ये मुंबईहून बीडकडे येताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि अवघ्या काही वेळात ८ कोटी १९लाख ७० हजारांचा निधी मंजूर केला होता.

परंतु २८ ऑगस्ट २०२६च्या अहवालानुसार निधी मंजूर होऊन आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असूनही प्रत्यक्ष दुरुस्ती सुरू झालेली नाही. निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून ती अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे बीड नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून बीडच्या विविध भागांतील १३६३ विकासकामांचे भूमिपूजन,उद्घाटन केले. जानेवारी २०२६च्या कार्यक्रमात या कामांचा मोठा टप्पा प्रत्यक्षात आणण्यात आला. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा परिषद, स्थानिक विकासकामे, रस्ते, पाणी, ग्रामविकास, सामाजिक सभागृहे, क्रीडा आणि इतर मूलभूत सुविधांचा समावेश होता. ५७५ कोटी एवढी या कामांची एकत्रित किंमत असल्याचे सांगीतले जाते.

उद्यानांचे प्रस्ताव रखडले..

सीएसआर फंडातून बीड शहरात आठ उद्याने विकसित करण्याचा प्रस्ताव होता. परंतु फंड मिळवण्यात नगरपालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे उद्यान विकसित करण्याचे प्रस्ताव रखडले आहेत. ९ कोटी रुपयांचा आराखडा यासाठी तयार करण्यात आला होता. सत्ताधाऱ्यांची उदासिनता आणि प्रशासनाचे ढिसाळ नियोजन यामुळे बीडकरांना चांगली उद्याने मिळण्याचा मार्गही सध्या खडतर झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com