

Beed Politics : सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि राजकीयदृष्ट्या वजनदार असलेला बीड जिल्हा मागील दोन वर्षांपासून राज्यात आणि देशात ओळखला जातोय तो वेगळ्याच कारणाने. आधी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यात वंजारी समाजाविरोधात मराठा समाज एकत्र आला होता. तर आता विलास घुले हत्या प्रकरणात मराठा समाजाविरोधात, नेत्यांविरोधात वंजारी समजा एकत्र आला आहे. या घडामोडींमुळे शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा अभिमानाने सांगणाऱ्या आपल्या राज्यात सध्या जातीय द्वेष, धार्मिक तेढ याला प्रोत्साहन दिले जात आहे का? असा प्रश्न निश्चितच पडतो.
तीन वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला होता. त्याच दरम्यान बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं खंडणी प्रकरणातून अपहरण आणि हत्या झाली. यातील हल्लेखोर वंजारी असल्याचे समोर आले. या दोन्ही घटनांनी जिल्ह्यातील राजकारण बिघडले. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलन आणि देशमुख हत्या प्रकरणाली आरोपी वंजारी समाजाचे होते. यावरून मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादाची ठिणगी पडली आणि पुढे त्याचे रुपांतर वणव्यात झाले.
गावागावात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पोहचला. अगदी एकमेकांवर बहिष्कार टाकण्यापर्यंत या वादाने पातळी गाठली. दोन्ही बाजूंनी राजकीय नेत्यांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले, खालच्या पातळीवर जाऊन एकेरी भाषेत केलेला उद्धार यातून बहुसंख्य असलेल्या या दोन जातींमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी, बीडसह अनेक जिल्ह्यांत सर्वपक्षीय मूक मोर्चे व जनआक्रोश आंदोलने झाली.
आंदोलनात मनोज जरांगे पाटील, भाजपाचे आमदार सुरेश धस, बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, माजलगांवचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणात उडी घेत देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात न्याय मोर्चे काढले. वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव निष्पन्न झाल्याने सगळे मुंडे विरोधक एकवटले होते.
मराठा नेते आणि संघटनांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची उघड मागणी केली. परभणी येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून निघालेल्या मूक मोर्चात जिल्ह्यातून आलेले हजारो नागरिक, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. सर्वपक्षीय मोर्चात मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 'संतोष देशमुख यांना न्याय मिळावा' अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले होते.
आंदोलकांचा मुख्य रोख धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर होता. आमदार प्रकाश सोळंके यांच्या म्हणण्यानुसार, मुंडे पालकमंत्री असताना आपले सर्व अधिकार त्यांनी वाल्मिक कराड याला दिले होते. त्यामुळे कराड हा सत्तेचे घटनाबाह्य केंद्र झाला होता. त्याच्या माध्यमातून सर्व गुंडगिरी, खंडणी आणि जिल्ह्यातील सामाजिक वातावरण बिघडून गेले. परभणीच्या मोर्चात सर्वच नेत्यांनी मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
आरोपींनी पोलिसांना दिलेल्या कबुलीत वाल्मिक कराडसह सर्व गँगचा उल्लेख आहे. हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हत्येमागील आरोपींना पुण्यात कोणी मदत केली? आरोपींना मदत करणाऱ्या मंत्र्याला कधी हाकलणार? असे सवाल मोर्चात उपस्थित करण्यात आले. आरोपींना फाशीची शिक्षा, वाल्मिक कराडला अटक, धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी या प्रमुख मागण्या तेव्हा करण्यात आल्या.
विधानसभा अध्यक्षांनीही गृह विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले. या घडामोडीमुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला बीडमधील गुंडगिरी विरुद्ध जनता आणि 'मराठा समाजाचा आक्रोश' असे स्वरूप आले. थोडक्यात काय तर या हत्या प्रकरणावरून मराठा समाजातील प्रत्येक नेत्याने आपले आपले स्कोअर सेटल केले. प्रत्येकाने स्वतःचे राजकारण साधले. अगदी आता अडचणीत आलेले बजरंग सोनवणे हेही याच लाटेवर स्वार होत खासदार झाले.
विलास घुले हत्या प्रकरणाने मुंडेंना संधी?
आता पुन्हा एकदा बीड जिल्हा, केज तालुका आणि गाव टाकळी. हॉटेल चालवणाऱ्या विलास घुले यांच्या हॉटेलमध्ये 20 जून रोजी जेवायला आलेल्या 8-9 जणांच्या टोळक्यामध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, हे भांडण सोडवायला विलास घुलेमध्ये पडला. याचा राग आलेल्या या टोळक्याने विलास घुले याच्यावरच चाकूने जीवघेणा हल्ला केला. वार इतके खोलवर झाले होते की रुग्णालयात जाण्यापूर्वीच विलास घुले याचा मृत्यू झाला होता.
या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. खून केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले, त्यांना पळून जाण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याने मदत केल्याचा आरोप घुले यांच्या भावासह कुटुंबिय आणि ग्रामस्थांनी केला. हल्लेखोर आरोपी आणि खासदार पुत्राला अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करत घुले कुटुंबिय आणि गावकरी रस्त्यावर उतरले. कारवाई झाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात आले.
पुन्हा या प्रकरणाला जातीय रंग दिला जाऊ लागला. घडलेली घटना दुर्दैवी, चीड आणणारी असली तरी त्याचा गैरफायदा घेत राजकारण सुरु झाले. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव या प्रकरणात घेतले गेल्याने मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, प्रतीम मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणात उडी घेतली. ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात तिघे मुंडे भाऊ-बहीण शांत होते तेच घुले हत्या प्रकरणात पोटतिडकीने बोलताना दिसू लागले.
पंकजा-प्रीतम-धनंजय मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांचे किंवा त्यांच्या मुलाचे थेट नाव घेतले नाही. पण विधीमंडळात विलास घुले याची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि या हत्येमागचे खरे सूत्रधार शोधून त्यांना शासन व्हावे, अशी आक्रमक भूमिका घेतली. प्रतीम मुंडे, धनंजय मुंडे हे घुले कुटुंबियांना भेटायला गेले. ही भेट सांत्वनपर असली तरी याकडे राजकीयदृष्ट्याही पाहिले गेले. त्यामुळे विलास घुले याच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात पुन्हा राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडले आहे.
विलास घुले यांच्या हत्येनंतर केज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरु असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी हे विलास घुले यांच्या पत्नीशी संवाद साधायला गेले होते. तेव्हा माझा पतीचा कोणाशीही कधी वाद झाला नाही, तो कोणाच्या भांडणात नव्हता मग त्याला का मारले? असा सवाल त्यांनी केला. मनोज जरांगे यांनी या राज्याचे, देशाचे वाटोळे केले, त्यांच्यामुळे गावागावात जातीय तेढ निर्माण झाला. आधी असे वातावरण कुठेच नव्हते? असा थेट आरोप केला.
तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी विलास घुले यांची हत्या दुर्दैवी आणि दुखःद असल्याचे सांगतानाच या प्रकरणाचा राजकीय वापर धनंजय मुंडे यांच्याकडून केला जाऊ शकतो, अशी थेट शक्यताच बोलून दाखवली. एकूणच बीड जिल्ह्यात घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांवरून सुरू असलेले राजकारण पाहता पिडित कुटुंबांना खरंच न्याय मिळणार का? असा प्रश्न निश्चितच पडतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.