

Beed Politics : केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, काल रमेश घुले यांनी पुणे येथील सीआयडी कार्यालयात जाऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात आमदार सुरेश धस हे देखील सीआयडी कार्यालयात धडकले.
धस यांच्या महानिरीक्षकांच्या भेटीनंतर याला आता वेगळेच वळण लागले आहे. यावरून विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. ‘माझ्या निष्पाप भावाचा बळी गेला आहे, तुम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका, पण तपासावर दबाव आणू नका’, अशा शब्दांत घुले यांनी धस यांच्या सीआयडी कार्यालयातील महानिरीक्षकांच्या भेटीवर शंका उपस्थित केली.
आमच्या भेटीनंतर दहा मिनिटांनी सुरेश धस सीआयडी कार्यालयात कशासाठी गेले होते? तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? असा सवालही घुले यांनी केला. पुण्यातील सीआयडी कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेण्यासाठी रमेश घुले रविवारी गेले होते.
या भेटीदरम्यान, रमेश घुले यांनी अनेक खुलासे केले. विशेषतः खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांना हत्याकांडादरम्यान आरोपींनी तब्बल ५७ फोन कॉल का केले, असा सवाल उपस्थित केला. सीडीआर अहवालात हे स्पष्ट झाल्याचे त्यांनी म्हटले होते. सौरभ सोनवणे याचे नाव या प्रकरणात आल्यापासून सुरेश धस हे त्याच्या बचावासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोपही घुले कुटुंबीयांकडून केला जात आहे.
अशावेळी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात रमेश घुले भेटून गेल्यानंतर काही मिनिटांतच आमदार सुरेश धस तिथे दाखल झाल्याने वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. आमदार धस तिथे काही अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी आले होते का? त्यांनी आरोपींची बाजू घेऊ नये, मी माझा भाऊ गमावला आहे, हे समजून घ्यावे, असे घुले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
धस यांची सावध भूमिका..
विलास घुले हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी सुरुवातीपासून ‘दोषी कोणत्याही राजकीय व्यक्तीचा असो, निष्पक्ष तपास झाला पाहिजे आणि विलासला न्याय मिळाला पाहिजे’, अशी भूमिका घेतली होती. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव पुरवणी जबाबात आल्यानंतरही त्यांनी थेट राजकीय आरोप न करता तपासाच्या निष्कर्षावर कारवाई व्हावी, अशी सावध भूमिका घेतली.
सुरेश धस यांनी २३-२४ जूनच्या सुमारास या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, विलास घुले यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही. त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराचे कोणीही समर्थन करू शकत नाही आणि विलासला न्याय मिळालाच पाहिजे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणीही सुरेश धस यांनी केली होती.
विलास हा तरुण होता आणि हॉटेलवरील भांडण सोडवण्यासाठी तो गेला असताना त्याची हत्या झाली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसत असल्याचा संदर्भ देत उर्वरित आरोपींनाही तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव समोर आल्यानंतर धस यांनी त्यांच्यावर थेट राजकीय हल्ला करण्याऐवजी दोष असेल तर सोनवणेंवर कारवाई होईल, असे म्हटले होते. तपासात दोष सिद्ध झाला तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका धस यांनी घेतली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.