
Maharashtra Forest Department : बीडमधील सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याने शिरूर वन परिसरात केलेल्या वन्यप्राण्यांच्या शिकारीची दखल भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दखल घेतली असून, अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्याचे सांगितले.
मंत्री नाईक यांनी माध्यमांमध्ये अशी प्रतिक्रिया देताच, वनविभागाच्या बीडमधील अधिकाऱ्यांनी सतीश भोसले याच्या घरी छापेमारी केली. यात भोसलेच्या घरी वन्य प्राण्यांचे मांस, गांजा, शिकारीसाठी लागणारी जाळीसह इतर महत्त्वाचे साहित्य वन अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. बॅटने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आणि त्यानंतर त्याचे इतर व्हिडिओ समोर आल्यापासून खोक्याभाई पसार आहे.
वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) म्हणाले, "सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईच्या शिकारीची माहिती वृत्तवाहिन्यांमधून समजली. मी माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना, संबंधित वृत्ताची खातरजमा करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच त्याने अशा प्रकाराचा गुन्हा केला असेल, तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. गुन्ह्यात सजा होईपर्यंत तपास करण्याचा आदेश आहे".
मंत्री गणेश नाईक यांनी इकडं माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत असतानाच, तिकडं वनविभागाच्या बीडमधील (BEED) अधिकाऱ्यांनी खोक्याभाईच्या मुसक्या आवळण्याची तयारी करत, त्याच्या घरी छापेमारी केली. यासाठी मोठा फौजफाटा वनविभागाने उभा केला होता. खोक्याभाईच्या घराची झाडाझडतीत वन प्राण्यांचे मांस आढळून आले. हरीण, काळवीट आणि मोर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्या देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सापडल्या आहेत.
सतीश भोसलेच्या घरातून वन्य प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी वाघूर चित्र, वन्य प्राण्यांना पकडण्याचे जाळी, सत्तुर, सुरी, डब्यामध्ये चरबी, दोन पुड्या गांजा, वाळलेले मांस वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले आहे. विभागीय अधिकारी अमोल गरकळ, वन परिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे, पोलिस निरीक्षक गणेश धोक्रड यांच्यासह पथक कारवाई सहभागी झाले होते. मांस तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहे.
सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईच्या शिकारीवरून बीडमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी खोक्या वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस डब्बे भर भरून भाजप आमदार सुरेश धस यांना पाठवत होता, असा आरोप केला आहे. यासंदर्भात शिरूरमध्ये रविवारी मोर्चा काढून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तक्रार करणार असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.