Raosaheb Danve : महायुती असताना हात दाखवणाऱ्या खोतकरांविरुद्ध दानवेंनी टाकला डाव..
BJP Jalna Politics News : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकर यांची भेट घेऊन प्रचार करण्याची विनंती माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या घरी जाऊन केली होती. एवढेच नाही तर खोतकर समर्थकांनी मनात कुठलीही शंका, भिती बाळगू नये. आम्ही एकत्र आहोत, विधानसभेला महायुतीचा धर्म माझ्याकडून पाळला जाईल, असा शब्द दानवे यांनी जाहीरपणे दिला होता.
पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे अर्जून खोतकर यांनी यावेळी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आपल्या समर्थकांना त्यांनी गुप्तपणे द्यायचा तो संदेशही दिला. परिणामी रावसाहेब दानवे यांचा लोकसभेच्या जालना मतदारसंघातून पराभव झाला.
कोणत्या नेत्यामुळे नाही, जनतेने माझा पराभव केला, असे जरी रावसाहेब दानवे सांगत असले तरी अर्जून खोतकर, मंत्री अब्दुल सत्तार सध्या त्यांच्या निशाण्यावर आहेत. (Jalna) महायुती असूनही विधानसभेला हात दाखवणाऱ्या खोतकरांविरुद्ध रावसाहेब दानवे यांनी आता विधानसभेसाठी डाव टाकला आहे. जालना विधानसभेची जागा भाजपला सुटावी, अशी मागणीच भाजपच्या जालन्यातील अधिवेशनातून पुढे आली आहे.
दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी जालना विधानसभेची जागा भाजपला देण्यात यावी, अशी मागणी करत खोतकर यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. भास्कर दानवे यांनी ही मागणी केली असली तरी या मागे रावसाहेब दानवे यांचीच राजकीय खेळी असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. महायुतीमध्ये जालना विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला येते.
गेल्या निवडणुकीत इथे काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हे शिवसेनेच्या अर्जून खोतकर यांचा पराभव करून विजयी झाले होते. तेव्हा रावसाहेब दानवे यांनी लोकसभेला दिलेला शब्द फिरवत विरोधात काम केल्याचा आरोप अर्जून खोतकर यांनी केला होता. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अर्जून खोतकर पुन्हा मैदानात उतरणार आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.
महायुतीत भाजपकडून जालना विधानसभेच्या जागेवर दावा सांगण्यात आला आहे. तशीच काहीसी परिस्थिती महाविकास आघाडीत उद्धभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कैलास गोरंट्याल हे जालन्याचे विद्यमान आमदार असल्यामुळे सहाजिकच काँग्रेस ही जागा सोडणार नाही. गेल्या निवडणुकीत गोरंट्याल यांनी शिवसेनेचा पराभव केला होता. तर शिवसेनेत फूट पडल्यामुळे अर्जून खोतकर यांच्याविरोधात उमेदवार देण्याची इच्छा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची देखील असणार आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत जालना मतदारसंघा बाबत ठाकरे गट नेमकी काय भूमिका घेतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तुर्तास महायुतीत भाजपने जालन्याच्या जागेवर दावा सांगत खोतकर यांचा पत्ता लढण्याआधीच कट करण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर झालेली ही मागणी भाजपचे नेते मुंबईत वरिष्ठ नेत्यांकडे करतात का? की मग हा दावा फुसका बार ठरतो? हे लवकरच स्पष्ट होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.