
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.
विखे पाटलांनी “राजकीय पराभव विसरलेले नाहीत” असा चिमटा थोरातांना काढला.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनाही मराठा समाजावर टीका करू नये असे सुनावले.
यामुळे अहिल्यानगर आणि राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष पुन्हा एकदा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
Ahilyanagar News : अहिल्यानगर येथील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजप नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचले आहे. थोरात यांच्यावर टीका करत त्यांनी, काही लोक राजकीय पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत, असा चिमटा काढला आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना देखील विनाकारण मराठा समाजावर टीका करण्याची आवश्यकता नाही असे खडे बोल सुनावले आहेत. यामुळे सध्या अहिल्यानगरसह राज्यातील राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे.
विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका करताना, काही लोक अद्याप राजकीय धक्क्याच्या सदम्यातून बाहेरच पडलेले नाहीत. त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सध्या अशा पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येतं का? याचा विचार मी करतोय, असा खोचक टोला विखेंनी थोरातांना लगावला.
तसेच थोरातांना जोरदार टोला लगावताना, कधी काळी हे स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते, असाही निशाना विखेंनी साधला आहे. विखे पाटील म्हणाले, मला कधी कधी काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटतं. स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून हे मिरवत होते. पण झालं काय?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील विखेंनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना त्यांना चांगलेच फटकारलं आहे. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र ते कोर्टात तुम्ही घालवलं. हे तुमचं पाप काँग्रेसवाल्यांचे असल्याचे सांगत आरक्षणाबद्दल काँग्रेसवाल्यांना काहीही सोईर सुतक नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही असे तुमचे जाणते राजे म्हणायचे अशीही टीका विखे पाटलांनी केली आहे.
यादरम्यान विखे पाटलांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी यात्रेवर प्रतिक्रिया देताना, हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करू नये असा सल्ला दिला आहे. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही हा सरकारचा शब्द आहे. हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करू नये आणि हाकेंनी मुक्ताफळे उधळायची बंद करावीत. हाकेंना समाजाचे पुढारपण करायला बंदी नाही, मात्र त्यांना दुसऱ्या समाजावर टीका करण्याचा अधिकार नाही असेही खडे बोल विखे पाटलांनी हाकेंना सुनावले आहेत.
सध्या मराठा समाजाच्या आरक्षणावरून सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. विविध जिल्ह्यात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. यावरून ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने विरोध केल्याचे एकही उदाहरण नाही. मग आता मराठा समाज जेव्हा त्यांच्या हक्कासाठी लढतोय, त्यावेळी ओबीसींकडून आक्षेप घेण्याचे कारण काय? हे फक्त अपघाताने पुढारी झालेले लोकच करतात. तेच अशा पद्धतीने राजकारण करतात असेही विखे-पाटलांनी म्हटलं आहे.
प्र.१: विखे पाटलांनी कोणावर टीका केली?
उ. त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली.
प्र.२: टीका कोणत्या कारणावरून झाली?
उ. विखे पाटलांनी थोरात “राजकीय पराभव विसरले नाहीत” असा टोला लगावला.
प्र.३: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना काय सांगितले?
उ. त्यांनी मराठा समाजावर विनाकारण टीका करू नये असे स्पष्ट केले.
प्र.४: या वक्तव्याचा काय परिणाम झाला?
उ. अहिल्यानगर व राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
प्र.५: याचा आगामी निवडणुकांवर परिणाम होईल का?
उ. हो, या वक्तव्यामुळे भाजप-काँग्रेस संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.