
Mumbai News : भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात CID चा तपासात, खंडणीच्या गुन्ह्यात मोठे भाकीत वर्तवताना, विनाकारण वितरीत करण्यात आलेली परवाना अग्निशस्त्र, अवैध शस्त्र, अभिनेत्री प्राजक्त माळी हिच्या वादाबरोबरच बीडमधील वाढलेल्या गुन्हेगारीवर मोठं भाष्य केले.
"खंडणीच्या गुन्ह्यात 'आका' आहे, हे सांगताना वाल्मिक कराड याचे नाव घेण्याचे टाळून यात 'आका'चा 'आका' सापडू नये, अशी प्रार्थना करतो. तसे ते सापडणार नाहीत", असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टेन्शन वाढवले.
भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील परवाना आणि अवैध परवानाधारकांची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी 105 जणांचे शस्त्र परवाने रद्द केले आहेत. बीड जिल्ह्यात खूपच लग्नात, ढाब्यावर कोठेही ठाॅय.., ठाॅय.., सुरू असायचे. त्यामुळे कोणत्या पोलिस अधीक्षकांच्या कार्यकाळात शस्त्र परवाने अधिक वितरीत झाल्याची माहिती मागवली असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.
पोलिस (Police) उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक यांनी चिरीमिरी घेऊन शस्त्र परवान्यांसाठी शिफारशी दिल्या आहेत का? याची चौकशीची देखील मागणी केली आहे. शस्त्र परवान्यांसाठी कोणत्या लोकप्रतिनिधींनी शिफारशी दिल्या आहेत, त्याची देखील माहिती उघड करा. माझे नावे असेल, तर ते देखील सांगा, अशीही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित आरोपींच्या प्राॅपर्टी अटॅच करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेला आदेश योग्यच असून, तो आता थांबवू नये. यातून आकाबरोबर कुणाची प्राॅपर्टीची याची माहिती समोर येणार आहे. उलट कारवाईला वेग यावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID करत असलेल्या तपासावर आमदार धस यांनी समाधान व्यक्त केलं.
मोबाईलमधील डाटा डिलिट करतील, यावर बोलताना, 'आका' आणि त्यांचे सहकारी हा उद्योग करायला गेले, त्याचा फायदा होणार नाही. संतोष देशमुख यांना झालेली मारहाणीचा व्हिडिओ 'आका'ला दाखवला आहे, असा आरोप सुरेश धस यांनी वाल्मिक कराड याचे नाव न घेता केला. तुम्हाला व्हिडिओ दाखवला म्हणजे, तुम्ही खुनाच्या गुन्ह्यात सरळ-सरळ आरोपी आहात. तुमच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा आहे. मग सरेंडर व्हायला का घाबरता? असा सवाल सुरेश धस यांनी केला.
फक्त देवाकडे एक प्रार्थना करतो, यात 'आका'चे 'आका' सापडू नये. मला वाटतं, ते नाही सापडणार. ते सापडणार देखील नाहीत. मी त्यांच्यावर आज तरी आरोप करणार नाही. मात्र 'आका'वर निश्चितपणे करणार आहे. 'आका'ला फोन घेऊन कोणाला कोणत्या भाषेत बोलायचं, याची स्टाईल मला माहीत आहे. फेसबुक आणि व्हाॅट्सअपमुळे त्यांची ही स्टाईल जास्तच बदलत गेल्याचा टोला सुरेश धस यांनी लगावला.
'आका'वर सध्या खंडणीचा गुन्हा आहे. हा कंपनीने दाखल केलेला आहे. दोन कोटीच्या खंडणीच्या गुन्हा दाखल केलेला आहे. असाच प्रकार ओ-टू कंपनीबरोबर, झाला आहे. हा सर्व प्रकार 'आका' पकडल्यावर सांगेल. लोक समोर येऊन बोलण्यास घाबरतात. हे पालकमंत्री होतात की काय, त्यामुळे घाबरतात. पण मी घाबरत नसतो. बीडमधील जंगलराज संपवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री व्हावे, या मागणीचा पुनरुच्चार आमदार धस यांनी केला.
अभिनेत्री प्राजक्त माळी यांच्यावर केलेल्या विधानावर आमदार सुरेश धस म्हणाले, हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. मेन फोकस संतोष देशमुख हत्याप्रकरण आहे. जे काही झालेले आहे, त्याला समोरे जाण्याची माझी तयारी आहे. माझी बाजू अनेकांनी मांडली आहे. संतोष देशमुख यांचा झालेला अतिभयानक खून, बीडमधील जंगलराजवर फोकस हलवू देऊ नका, अशी आमदार धस यांनी ठाम भूमिका मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.