Marathwada Political News : मोठ्या अपेक्षेने या पक्षातून त्या पक्षात घेतलेली उडी कधीकधी चांगलीच अंगलट येते. विशेषतः लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेले पक्ष प्रवेश फार काळ टिकत नाहीत किंवा अपेक्षाभंगाचे ओझे घेऊन अडगळीत पडल्यासारखी स्थिती होती. (BJP Political News) सध्या अनेक नेत्यांना असा अनुभव येत आहे. माजी खासदार गणेश दुधगावकर आणि त्यांचे पुत्र समीर यांनी केलेले पक्षांतर त्यांना काही फायदेशीर ठरले नाही.
अॅड. गणेश दुधगावकर राष्ट्रवादीत तर समीर दुधगावकर भाजपमध्ये अडगळीत पडल्यासारखेच. समीर दुधगावकर यांनी मोठ्या अपेक्षेने गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. (Parbhani) उद्योग आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आणि जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने सोपवली, पण समीर दुधगावकर (BJP)भाजपमध्ये मनाने कधी रमलेच नाही. पक्षानेही त्यांना प्रवेश देताना दाखवलेला उत्साह पुन्हा दाखवला नाही.
परिणामी पाच वर्षांत कडु-गोड अनुभव घेत अखेर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा आधार घेत समीर दुधगावकर यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. (Marathwada) हा राजीनामा देताना दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश करण्याऐवजी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परभणीतून अपक्ष लढण्याची घोषणाही केली. आता समीर यांच्या अपक्ष लढण्याचा फटका राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार राजेश विटेकरांना बसतो, की मग शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय (बंडू) जाधव यांना हे लवकरच दिसले. मुळात समीर दुधगावकर लोकसभा लढवण्याच्या आपल्या घोषणेवर ठाम राहतात का? हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी मंत्री व खासदार गणेश दुधगावकर यांचे चिरंजीव समीर यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. तसेच परभणी जिल्ह्यात विस्तार असलेल्या ज्ञानोपासक शिक्षण संस्थेचे ते सहसचिवही आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर समीर दुधगावकर यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. जिंतूर विधानसभा मतदारसंघातून लढण्याचाही त्यांचा प्रयत्न होता.
परंतु नातेवाईक असलेल्या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना यांची उमेदवारी निश्चित झाल्याने दुधगावकर यांचा पत्ता कट झाला. नुकत्याच झालेल्या पक्ष कार्यकारिणीतही समीर यांना स्थान मिळाले नाही. पक्ष दखल घेत नसल्याने समीर दुधगावकर पक्षाच्या वर्तुळात फारसे सक्रिय दिसत नव्हते.
महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार असताना मंत्रिपदी राहिलेल्या गणेश दुधगावकर यांनी २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवली व विजयी झाले. मात्र, शिवसेनेचे माजी खासदार स्व. अशोक देशमुख, सुरेश जाधव व तुकाराम रेंगे यांच्या पक्ष सोडण्याच्या परंपरेला अनुसरून त्यांनीही शिवसेना सोडली.
पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. समीर दुधगावकर २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय झाले असले तरी गणेश दुधगावकर हे मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच होते. भारतीय जनता पक्षात डावलले जाण्यामागे हेसुद्धा महत्त्वाचे कारण असू शकते. गणेश दुधगावकर यांचा व्यक्तिगत संपर्क, शैक्षणिक संस्थेमुळे त्यांच्या उमेदवारीचा प्रस्थापित पक्षांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.