

Parbhani News : परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेनेऐवजी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत भाजपाने गेम फिरवला होता. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी इच्छा नसताना वरिष्ठाच्या आदेशाचा मान राखत राष्ट्रवादीला सत्तेत घेत त्यांना उपाध्यक्ष पद दिले होते. त्यामुळे शिंदेची शिवसेना नाराज होती. विषय समिती सभापती पदाच्या निवडीत मात्र भाजपाने ही नाराजी दूर करत त्यांना एक सभापती पद देत युती धर्म पाळल्याचे दिसून आले.
भाजपाने गुरुवारी (ता.2 एप्रिल) झालेल्या विषय समिती सभापतीपदांमध्ये दोन पदं आपल्याकडे घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक सभापतीपद देण्यात आले. अध्यक्ष आणि दोन महत्वाची सभापती पद भाजपाकडे असल्याने जिल्हा परिषदेवर आता या पक्षाने मजबूत पकड मिळवली आहे. आजच्या निवड प्रक्रियेत राजकीय समन्वय तडजोडीचे राजकारणही दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेत चारही सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 12 अशी वेळ देण्यात आली होती. समाजकल्याण समितीवर गंगाखेड तालुक्यातील कोद्री गटाच्या पार्वती प्रल्हाद मुंढे यांनी भाजपाच्या कोट्यातून निर्विवाद निवड झाली.
महिला व बालकल्याण समितीवर पोखर्णी (ता. परभणी) येथील ऐश्वर्या अजय चव्हाण यांचीही बिनविरोध निवड झाली, ज्यामुळे भाजपाचा या दोन महत्त्वाच्या समित्यांवर प्रभाव अधिक दृढ झाला आहे. उर्वरित दोन समित्यांसाठी मात्र सुरुवातीला चुरशीचे वातावरण निर्माण झाले होते. ज्यात सविता मुरकुटे, वैशाली पंकज जाधव, दीपाली अजय चौधरी, संग्राम जामकर, कौशल्या शिंदे, सुचिता आनंद भरोसे, माणिकराव हरकळ, सरुबाई शंकर जाधव, ऐश्वर्या अजय चव्हाण आणि कौशल्या तुकाराम शिंदे यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज सादर दाखल केले.
एका समितीसाठी सहा तर दुसऱ्यासाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल झाल्याने स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे होती. मात्र, छाननीनंतर आणि माघारीच्या कालावधीत राजकीय पातळीवर हालचाली घडल्या. या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताडबोरगाव (ता. मानवत) गटातील वैशाली पंकज जाधव यांना संधी देण्यात आली. तर शिवसेना (शिंदे गट) यांच्या केकरजवळा (ता. मानवत) गटातील कौशल्याबाई शिंदे यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली.
विशेष म्हणजे, या निवडीत शिवसेना (उबाठा गट) यांनीही काही ठिकाणी भूमिका बजावत समन्वय साधल्याचे बोलले जात आहे. एकूणच, जिल्हा परिषदेत सभापतीपदांच्या वाटपात भाजपाने आघाडी घेतली असली तरी, इतर पक्षांना समाविष्ट करून सत्ता संतुलन राखण्याचा प्रयत्नही केल्याचे दिसून आले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महायुतीत कुठे खडा पडणार नाही याची दक्षता घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.