K.Chandrashekhar Rao News : तेलंगणात सत्तेवर राहिलेल्या केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचे भवितव्य आजच्या मतदानानंतर मतपेटीत बंद होणार आहे. राज्याबाहेर महाराष्ट्रातून देशात आपल्या पक्षाचा विस्तार करू पाहणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला मराठवाडा, महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. (BRS In maharashtra News) आता तेलंगणात केसीआर यांचा पक्ष पुन्हा सत्तेवर आला तरच त्याची `कार` महाराष्ट्रातही धावेल, अन्यथा विस्ताराआधीच या पक्षाला ब्रेक लागेल.
तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर तिसऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आज प्रत्यक्षात मतदान होत आहे. या निवडणुकीत बीआरएस विजयाची हॅटट्रिक साधणार, की काँग्रेस सत्तेवर येणार हे 3 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. या निवडणुकीत बीआरएसच्या जयपराजयाचा परिणाम या पक्षाच्या (Maharashtra) महाराष्ट्रातील विस्तारावर होणार आहे. पहिल्या टप्प्यात नांदेडमार्गे मराठवाड्यात आणि नंतर राज्यात एन्ट्री करताना सभांच्या माध्यमातून तेलंगणा पॅटर्नचा वापर केला गेला.
नागरिकांना तेलंगणातील विकासकामे, विविध योजनांची माहिती देत गुलाबी स्वप्नं दाखवण्यात आली. वाहनांच्या ताफ्यांचा धुरळा उडवत राज्यातील राजकारणात बीआरएसने चंचू प्रवेश करत मोठा परिणाम साधला होता. (Marathawad) आत्ता दुसऱ्या टप्प्यांतील पक्ष विस्तारावर तेलंगणा राज्याच्या निवडणुकीतील कामगिरीचा परिणाम होणार असल्याने या पक्षात गेलेल्या नेत्यांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहे. बीआरएसचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांनी आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी नांदेडची भूमी निवडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या पक्षाच्या नांदेड येथील पहिल्या सभेचा चांगला गाजावाजा झाला होता. यानंतर राज्यातील विविध भागात सभा घेऊन बीआरएसने आपली हवा निर्माण केली होती. राज्यातील विविध पक्षांचे नेते, माजी आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने या पक्षात सामील झाले. नांदेड जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा राज्याला लागून असल्याने काही गावांनी तेलंगणा राज्यात जाण्याचा ठरावही केला होता.
नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षांतील पदाधिकारी व नेत्यांनी तेलंगणातील निवडणुकीत प्रचार सभाही घेतल्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पंधरा विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच आजी, माजी आमदार प्रचारात सहभागी झाले होते. बीआरएसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा, यासाठी पहिली सभा तेलंगणा राज्याच्या बाहेर झाली ती नांदेडमध्ये.
या निवडणुकीत पूर्ण शक्तीने बीआरएस उतरली आहे. या पक्षांत गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. या निवडणुकीत या पक्षाने तिसऱ्यांदा विजय संपादन केला तर राज्यातील नेत्यांच्या आशा पल्लवित होतील. जर निकालात उलटफेर झाला तर या पक्षाचे व त्यात प्रवेश केलेल्या नेत्यांचे महाराष्ट्रात काय होणार? हे येणारा काळच ठरवेल.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.