Marathwada : बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या पक्षाने सहा महिन्यातच महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना दखल घ्यायला भाग पाडले. (BRS News) आपल्या पक्षाचा देशभरात विस्तार करायचा सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्याला लागून असलेल्या महाराष्ट्राची यासाठी निवड केली. त्यात नांदेड जिल्हा महाराष्ट्रात एन्ट्री करण्यासाठी सर्वात योग्य असल्याचे लक्षात घेत बीआरएसचा प्रवास सुरू झाला.
सुरूवातीला फारसे चर्चेत नसलेले चेहरे पक्षात घेवून केसीआर यांनी महाराष्ट्रात चंचू प्रवेश केला. नंतर माजी पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांच्या गळाला लागले. (Nanded) नांदेडमध्ये एन्ट्री केल्यानंतर त्यांनी मराठवाड्यातील बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसंडी घेतली. (K.Chandrashekhar Rao) बीआरएसच्या आतापर्यंतच्या पक्ष प्रवेशात सर्वाधिक पदाधिकारी हे मराठवाड्यातून गेले आहेत. त्यानंतर आता केसीआर यांनी आपली व्याप्ती वाढवत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात आपले जाळे घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
नांदेड, छत्रपती संभाजीनगरात केसीआर यांनी जाहीर सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पण तोपर्यंत या पक्षाच्या हालचालींकडे राज्यातील प्रस्थापित पक्षांनी फारसे लक्ष दिले नाही. (Marathwada) पण सगळ्याच राजकीय पक्षातील नाराजांना आपल्याकडे खेचण्याचा, त्यासाठी वाट्टेल ते करण्याचा बीआरएसचा प्रयत्न यशस्वी होतांना दिसतो आहे. अब की बार किसान सरकार आणि तेलंगणा पॅटर्नची भूरळ महाराष्ट्रातील नेत्यांना पडू लागली आहे.
आपला पक्ष चर्चेत कसा राहील? याची काळजी केसीआर आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी घेतांना दिसत आहेत. एखाद्या चर्चेतल्या चेहऱ्यांचा पक्षात प्रवेश करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी चार्टड प्लेन पाठवून त्यांना हैदराबादेत बोलावून घेण्याची पद्धत तर कमालीची यशस्वी ठरत आहे. मोठे प्रवेश सोहळे, सभा घेत केसीआर यांनी आता मोठ्या पक्षांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे.
पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांवर हेलीकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी केसीआर आपल्या मंत्रीमंडळासह सोलापूरात दाखल झाले आहेत. पक्षाची जाहीर सभा, मेळावा असो की मग एखाद्या प्रवेशासाठी संबंधित नेत्याला स्वतंत्र विमान पाठवण्याची पद्धत पाहता केसीआर यांची कार्यपद्धती काहीसी शोमन प्रमाणे सुरू आहे. त्यामुळे बीसीआरमध्ये एखादा तालुका पातळीवरचा अडगळीत पडलेला नेता जरी दाखल झाला, तर त्याची चर्चा राज्यभरात होवू लागली आहे.
आतापर्यंत बीआरएसवर बोलणे म्हणजे त्यांचे महत्व वाढवणे असे म्हणत नाकडोळे मुरडणाऱ्या राज्यातील प्रमुख पक्षांना त्यांची दखल घ्यावी लागत आहे. त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त कराव्या लागत आहेत. शरद पवार, नाना पटोले, अजित पवार, संजय राऊत आदी नेत्यांनी या पक्षावर आता टीका सुरू केली आहे.
नाना पटोले, राऊत यांनी तर बीआरएस हा पक्ष देखील एमआयएम प्रमाणेच भाजपची बी टीम असल्याचे म्हटले आहे. बीआरएस बी टीम आहे की, सी टीम हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईलच. पण सहा महिने इतक्या कमी काळात दुसऱ्या राज्यातला एखादा पक्ष महाराष्ट्रात येतो आणि प्रस्थापित पक्षांना घाम फोडतो हे पहिल्यादांच पहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.