Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency: कधी काळी संभाजीनगरात मुस्लिमांचा धार्मिक उन्माद होता, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सर्वप्रथम 'खान पाहिजे की बाण' अशी घोषणा दिली होती. दरम्यान, शिवसेनेने धार्मिक उन्माद संपवला आणि तेव्हापासूनच 'खान-बाण'चे राजकारण संपले. आमचा खान नावाला विरोध नाही तर वृत्तीला विरोध होता; असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं आहे.
'एमआयएम'चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर टीका करताना 'खान की बाण' या मुद्द्यावर चार वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या खैरे यांचा बाण कुठे गेला? असे म्हणत ओवेसी यांनी टीका केली होती. ओवेसींच्या याच टीकेला आता अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दानवे म्हणाले, आज मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पाठीशी उभा राहतोय, हीच खरी ओवेसी यांची पोटदुखी आहे. म्हणून त्यांनी 'खान-बाण कहा गया' असे म्हणत जुना वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा जन्मच मुळी प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेतून झाला आहे. परंतु, म्हणून शिवसेना कधी प्रामाणिक आणि या देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांच्या (Muslim) विरोधात गेली नाही.
बाळासाहेब ठाकरे यांनी कायम आपली भूमिका स्पष्ट करताना ज्या मुस्लिमांचे या देशावर प्रेम आहे ते आमचेच आहेत, पण देशातील दहशतवादी कारवायांमध्ये हात असलेले, त्यांची पाठराखण करणारे आमचे शत्रू, असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. संभाजीनगरचा शिवसेनेच्या स्थापनेपूर्वीचा इतिहास आठवा, म्हणजे खान-बाण मागचा इतिहास समजेल, असा टोलाही दानवे यांनी ओवेसींना लगावला.
आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे आहे, घर पेटवणारे नाही. ओवेसी मात्र भाजपला मदत करतात, त्यांच्या पक्षावर सातत्याने भाजपची बी टीम म्हणून टीका होते. मुस्लिम समाज आता मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत येत आहे, याचा खरा ओवेसींना पोटशूळ उठला आहे. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी 'खान-बाणचे राजकारण' संपल्याचे सांगितले आहे, ते खरे आहे. राज्यात आणि देशातील राजकीय परिस्थितीला मुस्लिम समाजही कंटाळला आहे. हा समाज मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंसोबत येत आहे, याचा आम्हाला आनंद असल्याचंही दानवे या वेळी म्हणाले.
(Edited By Jagdish Patil)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.